संकष्टी पावावे की संकटी पावावे?
सध्या गणेशोत्सव चालू आहे आणि सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. रोज आपल्या कानी श्री गणेशाची ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ ही आरती कानी पडते. तसे पाहता समर्थ रामदासस्वामींनी रचलेली ही आरती आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. मग त्यावर काय लिहायचे? पण लिहिण्यास कारण असे की एक दोन वर्षांपूर्वी त्यातील लोक करणाऱ्या चुकांबद्दल एक लेख वाचला होता. संकष्टी पवावे कसे चुकीचे आहे अशा व्हाट्सअप पोष्टी व मिम्स चा खच होता. (सुदैवाने त्यामानाने या वर्षी त्यांचा एवढा मारा झाला नाही.)
एक मुद्दा पण नक्की खटकत होता. संकटी पावावे की संकष्टी पावावे? तसे पाहता फार मोठा महत्त्वाचा हा मुद्दा नाही, पण मनाची उत्सुकता शांत बसू देत नव्हती कारण लहानपणी आजीला आरती म्हणताना कायम संकष्टी पावावे असा असा उच्चार करायची. आणि ती खूप धार्मिक होती, पोथ्या वाचायची, ती एवढी घोडचूक करेल असे वाटत नव्हते.
मग रविवारचा फावला वेळ या कमी दवडला. गुगल बुक्स सर्च उघडले आणि ‘सुखकर्ता’ ही query घातली. आलेल्या निर्णयांना चाळण लावली व सर्वात जुने पुस्तक निवडले.
१९ व्या शतकातील निवडलेले पुस्तक Selections from the Maráṭhí poets by Parashurám Pant Goḍbole किंवा नवनीत हे १८६४ इसवी सन मध्ये छापलेले होय. त्यातील ३१३व्या पानावर ही आरती सापडली.

आता सर्वात जुनी आरती छापील स्वरूपात सापडली ती पाहता त्यात संकष्टी असा उल्लेख आहे.
त्यामुळे संकष्टी हा अशुद्ध प्रयोग नसून पाठभेद आहे हे नक्की होते. कारण या पुस्तकाचे लेखक शासन नियुक्त भाषांतरकार होते त्यामुळे त्यांनी मुद्रणशोधन नक्कीच केले असावे. डॉ. एम. एस. माटे यांचे १९३५ इसवी च्या आसपास छापलेले टेम्पल्स ऑफ महाराष्ट्र म्हणून इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध आहे. ते डेक्कन कॉलेज पुणे येथील प्राध्यापक होते. त्यांच्या पुस्तकात त्यांनी मोरगावच्या देवळावर लिहिलेल्या लेखात आरती उद्धृत केली आहे. तेथे देखील संकष्टी असाच उल्लेख आहे. त्यामुळे या विचारास पुष्टी मिळते.
संकष्ट या शब्दाचा संस्कृत डिक्शनरी मध्ये अर्थ शोधला तर तो संकट असा आहे. तुळपुळे व फेल्डहॉउस यांच्या जुन्या मराठी भाषेच्या शब्दकोशात देखील संकष्ट चा अर्थ संकट आसा दिला आहे. ज्ञानेश्वर , रामदास यांच्या रचनांमध्ये देखील हा शब्द आढळतो. त्यामुळे दोन्ही समानार्थी व पाठभेद मानावयास हरकत नाही. पण आधुनिक मराठीत संकष्टी चा अर्थ संकष्टचतुर्थी असाच सीमित झाल्यामुळे संकटी हा रूढ शब्द झाला असावा.
मराठीत छापील पुस्तके आली १८०६ इसवी पासून, त्यामुळे त्याआधीचे साहित्य एक तर मौखिक परंपरेने किंवा हस्तलिखित रूपाने एकाकडून दुसऱ्याला हस्तांतरित होई. त्यामुळे मूळ रामदास स्वामींनी सांगितलेले हस्तलिखित या प्रश्नाचे खरे उत्तर देऊ शकेल. ( तसे उपलब्ध असल्यास कृपया संदर्भ दुवा पुरवावा)
आता या आवृत्तीची तुलना विकिपीडिया वर दिलेल्या आरतीशी केल्यास काही ठळकपणे दिसून आलेले मुद्दे पाहुयात.
१. एकोणिसाव्या शतकातील पुस्तकात सर्व पद्य, शब्द न तोडता. लिहिलेले आहे. मोडी लिपी तेव्हा प्रचलित होती व त्या लिपीत शब्द न तोडता लिहितात. पूर्वीचे शिलालेख पहिले तरी ध्यानात येते की पद्य शब्द न तोडता लिहितात. त्यामुळे कवितेत शब्द तोडून लिहिणेची पद्धत अर्वाचीन आहे असे वाटते.
२. दंड सोडल्यास इतर विरामचिन्हे दिसत नाहीत.
३.अनुच्चारित अनुस्वार न लिहिण्याचा नियम १९६० च्या आसपास झाला त्यामुळे नवीन छपाईत ती गाळलेली आहेत त्यात काही नवल नाही.
४. मुगुट हा शब्द आधुनिक आरतीत मुकुट असा लिहितात. संस्कृतच्या विसाव्या शतकात झालेल्या अतिसानिध्याने मराठीतील तद्धीते जाऊन तत्सम शब्द त्यांची जागा घेऊ लागतात असा माझा कायास आहे. (यावर कुणाचे संशोधन उपलब्ध असल्यास कृपया संदर्भ द्या). दुखहर्ता चे दुःखहर्ता याच शुद्धीने झाले असावे का ? का तो टंकलेखनदोष आहे कारण पुढे मन:कामना मध्ये विसर्ग वापरला आहे.
५. गौरीकुमरा हे मीटर चुकू नये म्हणून गौरीकुमारा चे केलेले रूपांतर आहे का ?
या लिखाणाचा उद्देश फक्त माझ्या या विषयावरील उथळशोधात (कर्सरी सर्च) मध्ये आढळलेली निरीक्षणे एका ठिकाणी नमूद करणे आहे. धार्मिक किंवा भाषाशास्त्रीय दृष्ट्या काय बरोबर याचा निर्णय योग्य त्या अधिकारी व्यक्तींनी घ्यावा. ते माझे क्षेत्र नोहे.
सर्वाना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा व सर्वाना गणपती बाप्पा विघ्नहरण करून सुखात ठेवो ही प्रार्थना.

Leave a Reply