डॉ. शंतनू अभ्यंकर : इंटरनेटने परिचित करून दिलेल्या एका डॉक्टर लेखकास श्रद्धांजली
डॉ. शंतनू अभ्यंकर यांचे निधनाची वार्ता व्हाट्सअॅप वर समजली आणि अत्यंत दुःख झाले. शक्यतो लेखक वाचकाला मराठीच्या पाठ्यपुस्तकांत धड्यांमधून, वृत्तपत्रांमधील पुस्तकपरिचयांतून, किंवा लेखांमधून माहित होतात. आणि तुम्ही लेखनक्षेत्रातील नसाल आणि त्यांचे मित्र किंवा नातेवाईक नसाल तर त्यांचा परिचय होणे दुरापास्त. आणि तो कोणत्यातरी सामायिक मित्रातून किंवा नातेवाईकांतून होतो . पण माझ्यासाठी डॉ. शंतनू अभ्यंकर त्यास अपवाद! त्यांचा परिचय एका ऑनलाईन लेखातून झाला. त्यानंतर काही वर्षे मी त्यांचे ऑनलाईन लेख वाचत असे. पण त्यांचे आणि माझे प्रथम संभाषण मात्र ट्विटरवर एका ट्विट च्या उत्तराने झाले. व नंतर आम्ही एकमेकास ट्विटर वर फॉलो करू लागलो. नंतर माझ्या एका तेलुगू भाषेत दिलेल्या उत्तरामुळे त्यांना उत्सुकता वाटली व मला त्यांनी पर्सनल मेसेज धाडून माझा फोन नंबर मागितला. ते त्या दरम्यान एका तेलुगू पुस्तकाचे मराठी भाषांतर करण्यात व्यग्र होते. त्यांना मी माझ्या तेलुगूचे अत्यल्प आकलन तेव्हाच स्पष्ट केले. त्यानंतर आम्ही खूपवेळा नाही , पण अधून मधून व्हाट्सअप वर संपर्कात राहिलो.
मराठी भाषेवर त्यांचे नुसते प्रभुत्व नव्हते तर प्रेमही होते आणि तिच्या संवर्धनासाठी काय करता येईल ह्याचा फक्त विचार न मांडता ते आपल्या लेखनाच्यावेळी प्रत्यक्ष कृतीत आणत. मेडिकल क्षेत्रातील पूर्ण माहिती मराठी वाचकास उपलब्ध करून देणारे खूप वैद्यकीय पत्रकार, लेखक, व डॉक्टर्स आहेत, पण डॉ. अभ्यंकरांचे वैशिष्ट्य म्हणजे ते चपखल बसतील पण मराठी असतील असे प्रतिशब्द तयार करत. मेडिकल जार्गन च्या जटीलतेला ते आपल्या लेखांमध्ये सामान्य वाचकास कळेल अश्या रूपात सादर करत. सायन्स च्या जड तांत्रिक भाषेबद्दल बाबतीतलं देखील तेच धोरण.
प्रतिशब्द बनवण्यासाठी ते सरकारी परिभाषा कोशांचा टेकू न घेता स्वतःचे स्वातंत्र्य जपत. उदा. Gynaecology या शब्दाला मराठीत रूढ प्रतिशब्द आहे स्त्रीरोगतज्ज्ञ! पण अभ्यंकर डॉक्टर स्वतःला स्त्रीआरोग्यतज्ज्ञ म्हणत. ग्लोबल वॉर्मिंग इतके सर्रासपणे तत्सम म्हणून वापरले जाते तरी त्यांनी त्यासाठी “धराज्वर” हा प्रतिशब्द त्यांच्या एका लेखात वाचला. त्यांनी केवळ वैद्यकीय लिखाण नाही तर विज्ञानाच्या परिघातील इतरही पुस्तके मराठीत आणली आहेत उदा. डॉकिन्स चे जादुई वास्तव. पण त्यांचं सर्वात शेवटी केलेले भाषांतर म्हणजे क्युटरस आणि ते करताना घडलेले भाषेविषयीचे विचारमंथन याविषयी ते प्रांजळपणे म्हणतात “‘क्यूटरस’चं भाषांतर करायला मी होकार दिला आणि मराठीच्या मरणाला आता आपणच कारणीभूत ठरतो की काय असं मला वाटू लागलं.” हा प्रांजळपणा हल्ली फार अभावाने दिसतो. एका बाजूस इराच्या कविता हा बाळबोध तरी खूप मार्मिक कवितासंग्रह, तर दुसऱ्या बाजूस थोडा उघड न बोललेला विषय तरुणाईच्या हॉस्टेल हिंग्लिश मध्ये व्यक्त करणारे क्युटरस हे पुस्तक मराठीत भाषांतरित करणे व दोन्ही एकाच दिवशी प्रकाशित करणे त्यांचा भाषेच्या आकलनाचा व व्यक्त करण्याचा पैस (स्पॅन) दर्शवते .
मी पुस्तके लिहिलेली नाहीत आणि खूप वाचली आहेत असेही नाही. पण गेली दोन दशके इंटरनेटवर मराठी साहित्य वेगवेगळ्या समाज माध्यमांवर व पोर्टल्सवर मराठी लेख वाचत आलेलो आहे. सामान्य वाचकास डॉक्टरकीचे किस्से वाचण्यास आवडते हे प्रतिक्रियांमधून जाणवते. माझी समजूत आहे की आम्हा डॉक्टरांना डॉक्टरकीवर लिहिताना थोडी तारेवरची कसरत करावी लागते. पेशंट गोपनीयता बाळगावी लागते. त्याचे इतके अवघड नाही, पण नकळत हे भान कधीकधी सुटते . पण डॉक्टर अभ्यंकरांच्या लिखाणात ही गोष्ट कधीच आढळली नाही. ट्विटरवर असच का केलं? तस का नाही केलं? असं ट्रोलिंग होते कारण फेसबुक किंवा व्हाट्सऍप प्रमाणे ते आपल्या मित्रांचे माध्यम नसून तेथे कोणीही येऊन टपली वाजवून जाते. फेसबुकचीही दुखणी आहेत. फेसबुकवर मित्राचा उल्लेख असाच का केला म्हणून राग, तर अनुल्लेख केला म्हणून रुसाफुगी होते. त्यामुळे समाजमाध्यमावर काहीही लिहिलं गेलं ते काल्पनिकतेने लिंपून किंवा ‘सगळं कसं? छान! छान!’ च्या पाकात घोळून लिहावे लागते. पण असे लिहून प्रतिसादाची मापटी पदरात पडण्या (engagement farming) ऐवजी आपल्या विचारांवर ते सोशल मीडियावर आपल्या मतांशी परखडपणे ठाम असत.
वैद्यकीय क्षेत्रातील पॅथीभेद काही नवा नाही आणि सध्याच्या काळात तो थोडासा बळावलाय. गेल्या वर्षी मिरजेच्या वसंत व्याख्यानमालेत त्यांचे छद्मविज्ञान आणि वैद्यक यावर भाषण झाले. त्यांची भूमिका तर्कसंगत असली तरी समन्वयसाधू नव्हती असे मला जाणवले. त्यानंतर झालेल्या चर्चेत डॉक्टरांच्या बरोबर मी हा मतभेद व्यक्त केले असता त्यांनी त्याची निव्वळ हेटाळणी न करता उत्तर दिले.

सोशल मीडियाची दुसरी एक खोड म्हणजे ते आपापल्या विचारसरणीच्या लोकांमध्ये कंपू बनवून राहण्यात, आणि त्यात धन्यता मानावयास प्रोत्साहित करते (encouragement of echochambers). त्यामुळे विरुद्ध विचारसरणीचा एखादा सापडला की त्याची रास्त टीका समजूनही न घेता त्यावर पूर्वग्रहदूषित कंपूने टोळधाड घातलीच समजा. ह्या ट्रोलिंगला कंटाळून कित्येक विचारवंत एकतर ते व्यासपीठ वापरायचे बंद होतात किंवा अशाच एका कंपूचे पायिक होतात. अशावेळेस काही बाबतीत मतभिन्नता असूनही साधकबाधक चर्चा करण्यास तयार असणारी खाती जेव्हा X (पूर्वाश्रमीचे ट्विटर) वर दिसतात तेव्हा बरे वाटते. डॉक्टर अभ्यंकर यांचा ट्विटर वरील वावर त्यामुळे भावत होता. ते नास्तिक होते तर मी रोज देवाची एकतारी पोस्ट एक्स वर टाकतो/ पुनर्रउद्धृत (Repost) करतो त्यामुळे त्यांनी याचा बाऊ करून कधीच मी आस्तिक असल्याने माझ्या भाषाविषयक पोस्ट्स ना प्रतिक्रिया दिली नाही असे झाले नाही. उलट एकदा एका निवांत रविवारी मी ‘मराठी भाषेचे नेमके वेगळेपण’ यावर एक ब्लॉग लिहून ट्विटर वर टाकला होता. त्यांना तो आवडला होता आणि फोन करून त्यांनी माझे त्याबद्दल कौतुक केले. एका प्रस्थापित लेखकाने एखाद्या हौशी ब्लॉगरचे केलेले कौतुक त्या ब्लॉगलारला म्हणजे मला लिहित राहण्याची प्रेरणा देऊन गेले आणि इतर काही प्रस्थापित लेखकांच्या, साहित्यप्रेमींच्या संपर्कात त्यांच्यामुळे मी आलो, मराठी साहित्य जगतात ताजे काय चालू आहे हे त्यांना ट्विटर वर फॉलो केल्यामुळे कळू लागले.
लेखक, नाट्यकर्मी व विज्ञाननिष्ठ म्हणून जेवढे डॉक्टर अभ्यंकरांचे कौतुक होते तेवढे त्यांनी केलेल्या डॉक्टरी सेवेचे होणेही गरजेचे आहे. वाई सारख्या ठिकाणी जिथे पुण्यामुंबई सारख्या सुविधा सुलभ नाहीत अश्या ठिकाणी तीन दशके प्रसूतिगृह चालवणे हे येरगबाळ्याचे काम नाही. त्यांनी विविध वैद्यकीय परिसंवादात आपले काम देखील मांडले आहे. मी एकदा वाईला गेलो असताना त्यांना त्यांच्या दवाखान्यात भेटायचा योग आला. बाहेरील गर्दीमुळे त्यांच्याबारोबर खूप वेळ दवडणे मलाच योग्य वाटले नाही. पण डॉक्टरांनी आदरातिथ्य त्या अल्पवेळेत देखील केले. त्यांच्या बसायच्या जागेशेजारी खालील कविता लावली आहे, त्यांचे वैद्यकीय क्षेत्रावरील प्रेम व त्यांचा वैद्यकीय सेवेकडे पाहण्याचा दृष्टीकोण या कवितेतून व्यक्त होतो.
“ भाग्य माझे हे थोर म्हणूनी मजला
संधी सेवेची लाभते कितीदा
प्रेम, आशा, कारुण्य जागवू या
रुग्ण सेवा जाणून ईश सेवा.ज्ञानमार्गी ही बुध्दी सदा राहो,
शल्यकर्मी कौशल्य प्राप्त होवो
थांग नाही तन मनाच्या तळाचा
थिटे सारे; पण यत्न सदा राहो.डॉ. शंतनू अभ्यंकर”
डॉ. शंतनू अभ्यंकर याना माझ्यातर्फे व माझ्या कुटुंबीयांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!
डॉ. सुधन्वा रा. पाठक
मिरज
१८-८-२०२४

यथायोग्य व्यक्ती व कार्य परीचय.. त्यातून शंतनंचे बहुआयामी व्यक्तित्व समजायला मदत झाली.