युरोपच्या दौऱ्यावर…. डॉ. एन्. आर. पाठक यांचीं पत्रे !पत्र पहिलें
माझे आजोबा कै. डॉ. न. रा. पाठक व आजी हे आपल्या प्रथम विदेश प्रवासास युरोपला १९५६ साली सप्टेंबर महिन्यात गेले होते. त्यांच्याबरोबर IMA या संघटनेचे इतरही काही डॉक्टर्स होते.
जर्मनीतली प्रसिद्ध दवाखाने त्यांनी पाहिले तसेच इतर स्थळांना ही भेट दिली. त्यांनी त्या प्रवासादरम्यान काही पत्रे आपल्या मुलांना लिहून पाठवली होती. त्यातील काही मिरजेत त्यांचे सहकारी डॉ. कृष्णानंद गोगटे यांनी चिरायू या डॉ. पाठक यांच्या नियतकालिकात दिवाळी अंकात छापली. परवा ती पत्रे सहज माझ्या वाचनात आली. त्यातील वर्णने मनोरंजक आहेत तसेच त्यांची सूक्ष्म निरीक्षणशक्ती दिसते. तसेच १९५६ चे वर्णन व जवळजवळ सत्तर वर्षांनंतरची सद्यस्थिती पहिली तर असे जाणवते की बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत व काही तशाच आहेत. त्या पात्रांमधील काही भाग ब्लॉग द्वारे शेअर करावा असे वाटले.
– डॉ. सुधन्वा पाठक मिरज २-९-२४
पत्र पहिले
सप्टेंबर १ ९ ५ ६
चि. शकुंतलास,
रात्री ११-५५ ला आम्ही सांताक्रूझ विमानतळावरून एअर इंडिया इंटर नॅशनलच्या ‘सुपरकान्स्टेलेशन’ विमानानें प्रवासास निघालों. विमानांत गेल्यावर आंत काम करणाऱ्या बाईनें आम्हांला कानांत बोळे घालण्यासाठीं कापूस दिला. तिला ‘एअर होस्टेस’ या नांवानें संबोधितात. नंतर अपघाताच्यावेळीं कसें वागावें याबद्दल थोडक्यांत माहिती सांगितली. नंतर कमरेस पट्टा बांघण्याची सूचना देण्यांत आली. विमान सुरू झाल्याचा आवाज ऐकत असतांच आम्ही थोड्याच वेळांत अंतराळांत चढू लागलों. यावेळी एकदोघांना त्रास झाला. मला त्रास झाला नाही.
विमानांत पुढच्या बाजूस वैमानिकासाठीं जागा, नंतर एकामागें एक अशा तीन खोल्या होत्या. त्यांत दोन्ही बाजूस बसण्यासाठीं खुर्च्या व मधून वाट होती. खुर्ची सरळ किंवा आराम खुर्चीसारखी करतां येते. आंत उजेड व वारा भरपूर असतो. वाचण्यासाठीं वर्तमानपत्रे असतात. लिमलेट, चॉकलेट, लवंग, वेलदोडे, संत्र्याचें सरबत, चहा, कॉफी वगैरे खाण्यापिण्यास देतात.विमान सुरू होऊन दहा मिनिटें झाल्यावर होस्टेसनें मायक्रो-फोनवरून सांगितलें कीं, हें विमान आतां समुद्र सपाटीवरून पंधरा हजार फुटांहून अधिक उंचीवरून जाऊं लागेल. पण विमानाच्या आंतील हवेचा दाब ४००० फूट उंचीवर जितका असती, तितकाच ठेवला जाईल. (महाबळेश्वर ४००० फूट उंचीवर आहे). कांहीं वेळानें बहुतेक सर्वांना झोपा लागल्या. आंत बसणाऱ्याना विमानाच्या वेगाची कल्पना येत नाहीं. आमचे विमान ताशीं ३०० मैल वेगानें जात होतें, पण आंत आम्हांला घरांत खुर्चीवर बसल्याइतके आराम वाटत होतें. मधूनमधून जाग यावयाची, पण पुन्हां झोप येई.
दिवस उजाडतांना आम्ही सौदी अरेबियाच्या वाळवंटावरून जात होतों. वाळूचे ढीग चित्रांत काढलेल्या उंचवट्याप्रमाणे दिसत.थोड्या वेळानें डोंगर व ओसाड भाग दिसू लागला. आतां आम्ही इजिप्तवरून जात होतों. समुद्राचे पाणी दिसू लागले. एअर होस्टेसनें पुन्हां सांगितलें कीं. आपण आतां सुवेझ कालव्याच्या पूर्व टोकाजवळून जात आहोंत. उंचावरून सुवेझचा काला निळया रंगाचा ६ ते १५ फूट रुंदीचा पट्टा मारल्याप्रमाणे दिसत होता. त्यांतील बोटी खेळांतील कागदी नावांप्रमाणें दिसत.पुढे कांहीं वेळ ओसाड भागांतून जावे लागले. वाळवंटांतील व ओसाड डोंगरावरील प्रदेशांत एकाही ठिकाणी झाडी नव्हती. मधून मधून काळचा शाईनें रेघा मारल्याप्रमाणे डोंगरांवरील रस्ते दिसत. याही बाजूला झाडी नव्हती. कांहीं ठिकाणी राखी रंगाच्या ठिपक्यांप्रमायें पेट्रोलच्या टाक्या दिसत.थोड्या वेळानें हिरवे पट्टे एकमेकांना जोडल्याप्रमाणे दिसावयास लागले. आम्ही आतां नाईलच्या खोऱ्यावर आलो होतों. नाईल नदीकाठी कैरो आहे. थोड्याच वेळांत विमान विमान-तळावर उतरले.
कैरोची सकाळची वेळ ६-५५ म्हणजे आपल्याकडील वेळ सकाळी १०-२५ असेल. जसजसें पश्चिमेकडे जावें तसतसा दिवस उशिरा सुरू होतो. विमानतळावर उतरून तोंड धुवून आम्ही फराळ केला. येथे इंगजी वर्तमानपत्र- “इजिप्शियन गॅझेट” वाचावयास मिळाले. त्यांत सुवेझ परिषदेत डलेसनें सुचविलेल्या मसुद्यावर टीका केली होती. पण भारताचे मेनन यांनी सुचविलेल्या मसुद्याची वाहवा केलेली होती.विमानांत तेल भरून होतांच आम्ही सर्वजण विमानांत बसलों. कैरोच्या वेळेप्रमाणें सकाळी सव्वा आठला विमान सुटलें.
नाईल नदीचे निरनिराळे फाटे काढून लोकांनों चालविलेली शेती पहावयास मिळाली. पुढें अलेक्झांड्रियापर्यंत झाडें व पिके होतीं. थोड्याच वेळांत विमान उंच जाऊं लागलें. मायक्रोफोनवरून आम्हांला सांगण्यांत आलें कीं, आम्ही १८५०० फूट उंच अंतराळांत जात असून, विमानांतील हवेचा दाब ६५०० फूट उंचीइतका केला आहे.
कांहीं वेळानें क्रीट बेट लागलें. तें ओलांडून होतांच पुन्हां समुद्र. हा समुद्र ओलांडून होतांच इटलीची जमीन लागली. नंतर आम्ही रोमचे विमानतळावर उतरलों.
तिथे पासपोर्ट दाखविलें. आमच्याकरितां बस होती. स्टेशनवर येतांच उन्हाचा त्रास होऊं लागला. उकाडा फार, कपडे घामानें भिजण्याइतका. आमचे हॉटेल रेल्वेस्टेशन जवळचे.
इथें येण्यापूर्वी आम्हांला विमानांत जेवण मिळालें होतें. सेल्युलाईडचे ताटांत उकडलेला मका, भात, भाजी, लोणी, पाव व मीठ या वस्तू होत्या. इथे आल्यावर दीडला पुन्हां जेवण मिळालें. जेवणांत पाव, भाजी व लोणी होते.
जेवण झाल्यावर तार करावयास तेथील पोस्टांत गेलों, तो तेथील बाईना आमचे बोलणें कळेना व आम्हांला त्यांचें कळेना.
इथे वजनें किलोग्रॅमनी करतात. फळेसुद्धां बजन करून विकतात. संध्याकाळी आम्ही फिरावयास गेलों. सांतामारियाची इमारत पाहिली. तेथे लोकांची प्रार्थना चालू होती. नंतर रस्त्यावरील रहदारी पहात आम्ही स्टेशनवर गेलों.
येथे मोटारी व इतर वहाने उजव्या बाजूनें चालवितात. कोपऱ्याकोपऱ्यावर पोलीस असतो. तो ट्राफिक कंट्रोलपेक्षां म्हाताऱ्या पादचऱ्यांस मदत करी व नवख्या लोकांना माहिती देई.
मी दोन पौंडांचे लिरा घेतले. हॉटेलांत एका पौडाला १६२० लिरा मिळतात. टुरिस्ट ब्यूरोमध्ये १७३२ लिरा मिळतात. तार करण्यास मला २६० लिरा लागले. आपल्यापेक्षां इकडे महागाई आहे. दाढी करणेंस २०० लिरा, हजामत ४०० लिरा, बूटपॉलीश १०० लिरा, व कपड्यांना इस्त्री करण्यास २५० लिरा. यावरून तुला इथल्या महागाईची कल्पना येईल.
( इथून पुढील मजकूर कौटुंबीक तपशील असल्याने वगळला आहे)
—डॉ. एन्. आर. पाठक

Leave a Reply