‘मराठीची सद्यस्थिती’ : एक भाषण व एक प्रतिक्रिया
मराठी भाषेला नुकताच अभिजात दर्जा केंद्राने जाहीर केला, आणि मिरज विद्यार्थी संघाच्या व्याख्यानमालेचे १०० वे वर्ष चालू आहे. या दोन्ही गोष्टींचा योग जुळून आला आणि विद्यार्थी संघाने जागर मराठी म्हणून एक व्याख्यानमाला आयोजित केली. या हेमंत व्याख्यानमालेत अनेक तज्ज्ञांनी आपले विचार प्रगट केले.
सौ. मंगला गोडबोले या एक नावाजलेल्या व ज्येष्ठ मराठी लेखिका आहेत, शिवाय त्यांनी भाषाशास्त्रात मुंबई विद्यापीठातून एम. ए. सुवर्णपदकासह प्राप्त केले आहे. त्यामुळे त्यांचे भाषण ऐकण्यास मिळणे हे माझ्या सारख्या हौशी मराठी अभ्यासकांसाठी व मराठी विषयी आस्था बाळगणाऱ्या लोकांसाठी एक सुसंधी होती.
गोडबोले ताई या विषयावर तासभर विस्तृत बोलल्या. त्यांचे बोलणे म्हणजे बोलण्यातील मार्दव, वेळोवेळी नर्मविनोद आणि हे दोन्ही मुद्द्यावरील ठामपणा सांभाळून होते. तासभर प्रत्येक मुद्द्यासरशी उदाहरणं येत होती, किंवा उदाहरणातून मुद्दे प्रगट केले जात होते.सुरवातीला मराठीच्या वापरावर, मराठीच्या उगमावर थोडेसे बोलल्यावर त्यातील व्यापक इतिहास व तांत्रिक बाबी यामध्ये न रमता १९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळ यशस्वी होऊन मराठी महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यापासून आजच्या काळापर्यंतच्या बदलांचा त्यांनी नेमका आढावा घेतला. मी आजवर या विषयावरील ऐकलेल्या भाषणातील उत्तम भाषणांपैकी हे एक आहे.
या भाषणांत मी काय शिकलो ?
मराठीच्या सद्यस्थितीला म्हणजे वाईट अवस्थेला खालील कारणे त्या प्रमुख मानतात
१. राजकीय धोरण: मराठीसाठी शासनातर्फे मराठी शिक्षणाबाबतीत किती आग्रही राहावे याबाबत स्पष्ट धोरण नव्हते. महाराष्ट्र भारतातील एकमेव असे राज्य असेल जेथे मराठी विषय न शिकता बालवाडी ते पदव्युत्तर पर्यंत शिक्षण घेता येते. सुदैवाने नवीन शिक्षण धोरणानुसार अलीकडच्या काळात त्यात बदल झाला आहे.
२. मराठी बाबत मराठी लोकांचीच तीव्र अनास्था :
मराठी लोक ऑफिस व सरकारी कामे इंग्रजीत करतात, करमणुकीसाठी हिंदी / इंग्रजी, घराबाहेर टॅक्सी/रिक्षावाल्याला हिंदी, संस्कार पूजा यासाठी संस्कृत आणि यांच्यात मराठी कशाला उरली तर घरगुती नातेसंबंध भाऊ बहिण बहिणी कौटुंबिक घडामोडी याला
३. मराठीशिवाय महाराष्ट्रात पोट भरता येते :
मराठी न शिकताही या राज्यात आपल्याला पोट भरता येईल याची लोकांना खात्री आहे.
.
ही कारणे दिल्यावर मराठी भाषेचे चांगले गुण देखील उदाहरणांनी दर्शवून दिले. मराठीचे शब्दभांडार कसे विपुल आहे याचा दाखला देताना त्यांनी पानवलकर यांच्या सूर्य या कथेचा दिला. या कथेतील नायक कसा हसतो याचे २७ वेगवेगळ्या प्रकारांनी वर्णन श्री. दा. नी त्यात केलेले आहे.
मराठी साहित्याचे इतर भाषांत होणारे भाषांतर तुलनेने कमी आहे याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
नंतर भाषेच्या बदलत्या स्वरूपाबद्दल त्यांनी जी उदाहरणे दिली त्यातली दोन खूप भावली. पहिले म्हणजे भाषेचे होणारे सपाटीकरण त्यासाठी त्यांनी मोदक, भात, चहा या सर्वाना बनवणे हेच क्रियापद वापरलं जाते पण त्याऐवजी मोदक वळणे, भात वैरणे, आणि चहा टाकणे असे वापरले तर अधिक चांगले कारण त्यात वर्णनाची दृश्यात्मकता आणि दुसरे म्हणजे “हल्लीची मुले आईस आई म्हणत नाही. ती आई म्हणत नाही याचे फार दुःख नाही पण आई हा शब्द जर वापरातून समजा गेला तर आजवर आई या विषयावर अनेक कविता, लेख व साहित्य निर्माण झालेले आहे ते सर्व विलुप्त होईल याचे अधिक दुःख आहे”
समारोपाच्या टप्प्यात त्यांनी मराठी संवर्धनासाठी उपाय सांगितले
त्यात प्रामुख्याने
१. रोज मराठी वृत्तपत्र घेणे
२. पुस्तकांना वजनाच्या नियमातून सूट देणे जेणेकरून अधिक पुस्तके विमानाने परदेशी नेता येतील
३. घरातील लहान मुलांशी मराठीतच बोलावे
४. उद्योगात मराठीचा अधिक वापर करणे
५.. मराठीची लाज न बाळगणे. दोन मराठी माणसे बाहेर एकत्र भेटली तरी मराठीतून बोलत नाहीत. त्यामुळे मराठीची पिछेहाट होतेय
६. मराठी चित्रपट सिनेमागृहात पाहून त्यांना प्रोत्साहन देणे
हे भाषण आता यु ट्यूबवर उपलब्ध आहे.आपण ते प्रत्यक्ष ऐकू/पाहू शकता.
आपला परिपेक्ष माझ्यापेक्षा वेगळा असेल व त्यावरील प्रतिक्रिया देखील!
भाषणाची लिंक खालीलप्रमाणे देत आहे
जागर मराठीचा २०२४ | पुष्प ४: मराठीची सद्य:स्थिति | सौ.मंगला गोडबोले | Current Situation of Marathi.
आता माझ्या प्रतिक्रियेकडे वाळूयात.
हे भाषण मी प्रत्यक्ष ऐकले होते, पण हा लेख लिहीपर्यंत ते युट्युबवर आले. युट्युबवर व्हिडियोचा गोषवारा/ त्यात काय आहे हे कळावे म्हणून एक चित्र चॅनेलवाल्यानी डकवले असते.त्याला थमनेल( thumbnail) म्हणतात. हे थंबनेल पाहिल्या पाहिल्या माझी प्रतिक्षिप्त क्रिया घडते त्याप्रमाणे (इंग्रजीत knee jerk reaction) प्रतिक्रिया आली ‘ विषयाला समर्पक thumbnail जमले आहे!’. वक्त्या ऐवजी वकत्या आणि सद्यस्थिती ऐवजी सद्यःस्थिती लिहिले आहे आणि थंबनेलला मराठीत काय म्हणायचे हे मला माहित नाही.आणि कहर असा की शासनमान्य परिभाषा कोषांमध्ये याला प्रतिशब्द नाही’.
या प्रतिक्षिप्त क्रियेचा आवेग ओसरल्यावर मी थोडा सद्यःस्थिती या शब्दाचा इंटरनेटवर धांडोळा घेतला, मला तीन चार दशके मराठी शिकून झाली तरी सद्यस्थिती शब्द बरोबर आणि सद्यःस्थिती चुकीचा वाटला या गोष्टीने थोडे वरमल्या सारखे वाटले. संस्कृत ‘सद्यस्’ पासून आला असल्यामुळे सद्यःस्थिती असा लिहिणे अधिक सयुक्तिक आहे सद्यस्थिती नाही. जर सद्य वरून आला असता तर तो तसा असता . पण सद्यःस्थिती शब्द सद्यस्थिती असा लिहिणारा मी एकटा नाही हे देखील गूगल मावशी ने मला दाखवून दिले. त्यामुळे शीर्षकातील सद्यस्थिती मराठीच्या सद्यःस्थितीचे द्योतक म्हणून मी बदलले नाही .
या पूर्ण भाषणात दिलेल्या उदाहरणांवरून मला हे वारंवार जाणवत राहिलं की मराठीच्या खालावलेल्या स्थितीला मराठी भाषेतील शब्दांचे आणि वाक्प्रचारांचे चुकीचे उपयोजन, काही ठिकाणी उच्चारण देखील जबाबदार आहे.
पण मी विचार करू लागलो तर मला जाणवले की हे उपयोजन आहे ते मी नैसर्गिकरित्या शिकलो. म्हणजे माझ्या आईवडिलांच्या, भावंडांच्या, सवंगड्यांच्या आणि अर्थातच शिक्षकांच्या भाषेतून अनुकरण करून. जसा मी प्रौढ होत गेलो आणि वाचत गेलो तसा लेखकांच्या भाषाशैलीचा प्रभाव माझ्या बोलण्यावर थोडा पडला. पण मराठीच्या पुस्तकांत , अगदी व्याकरणाच्या पुस्तकांच्या बाबतीत ही बाब वेगळी अशी शिकवली गेली नाही कदाचित त्या काळात अशा पुस्तकाची गरज नसेल, पण या काळात या प्रकारचे पुस्तक मराठीत असावे असे खूप वाटते. आज तरी मला असे मराठी पुस्तक ठाऊक नाही. मराठीत कोशवाङ्मय खूप समृद्ध आहे, पण भाषावापराचा शब्दकोश मला अद्यापि ठाऊक नाही.प्रत्येक क्षेत्रात मराठी भाषातज्ज्ञ नेमणे शक्य नाही, पण असे पुस्तक या तज्ज्ञांची उणीव अंशतः का होईना भरून काढेल आणि मराठीची हेळसांड थोडी कमी होईल असे मला वाटते.
मी सर्जन झाल्यावर सन २००८ मध्ये प्रोफेसर इयान आयर्ड यांचे “ The making of a surgeon” (Butterworth Pub. १९६१) वाचले. त्यात सर्जन होण्यासाठी माणसात काय गुण असावेत ह्यावर लिहिताना एकेठिकाणी ते म्हणतात “A man who reads this chapter and fails to find an error in any of these phrases badly needs a prolonged and intensive therapeutic course of Fowler.” अर्थात आमच्या पिढीस मेडिकलच्या अभ्यासात भारतात तरी इंग्रजी भाषेचे इतके महत्त्व उरलेले नाही, पण या वाक्यामुळे फाऊलर बद्दल उत्सुकता वाढली आणि ते पुस्तक मिळवले. फाऊलर हे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस च्या कन्साईज ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी चे संपादक होते त्यांनी १९२६ साली “a dictionary of the modern English usage” लिहिले. ते खूप गाजले व त्याला काही लोकांनी डोक्यावर घेतले (वरील वाक्य त्याची प्रचिती देते) आणि काही लेखकांनी ते लेखकाच्या भाषेला व्याकरणाच्या नियमांनी जखडून टाकते व तिची लवचिकता कमी करते अशी टीकाही केली. पण मी जेव्हा ते पुस्तक वाचले तेव्हा मला इंग्रजीसाठी त्याचा खूप फायदा झाला.
इंग्रजी ऑक्सफर्ड प्रमाणे मराठीत मोल्सवर्थ आहे, इंग्रजी रेन अँड मार्टिन प्रमाणे मराठीत वाळिंबे आहे पण मला अजून मराठी फाऊलर सापडले नाही.
मराठी भाषा पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिकवणाऱ्या वर्गात विद्यार्थी येत नाहीत, कारण भारतात फक्त ज्याने अर्थार्जन अधिक होते ते अभ्यासक्रम प्रथम निवडायचे हा पायंडा आहे. आणि त्यासाठी लोकांना दोष आपण देऊ शकत नाही. काळाची गरज आहे की मराठीभाषेसाठी सरकारनेच शिष्यवृत्त्या व मराठी भाषातज्ज्ञ पदांसाठी भरघोस पगाराच्या सरकारी नोकऱ्या सुरु कराव्यात. हमखास हुशार मुले पुन्हा मराठीकडे वळतील. सधन मराठी लोकांनी भाषेवरील प्रेम अशा नोकऱ्या व शिष्यवृत्त्या जाहीर करून व्यक्त करावे.हे घडू दे त्यामुळे मराठी लिखाण आणि वापर सुधारेल.
माध्यमांना विशेषतः टीव्हीला सरकारनेच मराठी भाषातज्ज्ञ नेमणूक करण्याची सक्ती करावी. त्यामुळे मराठी मध्यमकर्मी भाषेचा अधिक सुलभ, नेमका आणि नेटका वापर करू लागतील.
मराठी ललित साहित्य इंग्रजीत नेणे फार महत्त्वाचे आहे, कारण इंग्रजी वाचकवर्ग अफाट मोठा आहे.लोक संस्कृत शिकतात ती दैनंदिन बोलण्यासाठी नाही तर संस्कृत वाङ्मयाची गोडी चाखण्यासाठी! तद्वत इंग्रजीत भाषांतरित मराठी वाङ्मय अमराठी लोकांच्या मध्ये मराठीची गोडी उत्पन्न करू शकले तर मराठी भाषासंवर्धनासाठी त्याचा खूप फायदा होईल. हा मुद्दा या भाषणाने मला पटवून दिला.
मराठी भाषेतील पारिभाषिक शब्दांविषयी वक्त्यांनी ‘जनुक’ या संज्ञेचा दाखला दिला. पण पारिभाषिक शब्दाविषयी मला एका मुद्याकडे लक्ष वेधावेसे वाटतं. तो मी तीनेक वर्षामागे एका ब्लॉग मध्ये लिहिला होता तो तसाच इथे उद्धृत करत आहे.
- पर्यायी शब्द निवडताना सोपे असावेत. लिहायला वाचायला व बोलायला सोपे शब्द निवडा. संस्कृत समृद्ध भाषा आहे. इंग्रजी पारिभाषिक शब्द तयार करताना जो मान लॅटिन ला मिळतो तो संस्कृतला मिळाला पाहिजे. पण मराठीचे बळजबरीने अतिसंस्कृतीकरण नको! डोळ्याला अक्ष म्हणण्यात व कुत्र्यास श्वान म्हणण्याने त्या गोष्टी बदलत नाहीत पण तद्दन कृत्रिमता जाणवते. त्याउलट दिनांक हा शब्द संस्कृत साहित्यात कोठे नाही पण तो १००% संस्कृत आहे व आज मराठीत सर्वमान्य झाला आहे कारण तो वापरायला, उच्चारास सुटसुटीत आहे. कॉम्पुटर चा संगणक सहजपणे होतो कारण उच्चार सोपा. पण पेन ला लेखणी, झरणी म्हणताना सहजता जाणवत नाही. जे सोपे ते टिकते.
- एकदा एक शब्द ठरवला की त्यावर ठाम राहा. गेल्या वर्षी हृदयाचे कप्पे कर्णिका व जवनिका होते व पुढील वर्षी अलिंद व निलय होतात म्हणजे मुले संभ्रमात पडणार नाहीत का? आज भ्रमणध्वनी म्हणायचे व उद्या चलभाष
- तज्ज्ञांना सांगून पारिभाषिक शब्दांसाठी सूची आहेत त्यांची पुनरावृत्ती काढा. एक मुख्य शब्द व एक पर्याय एवढेच ठेवा. व या वर्षीच्या अमुक तारखेपासून तुम्ही हेच शब्द इंग्रजी शब्दांना प्रतिशब्द म्हणून वापर म्हणून प्रसारमाध्यमांना एकच शासन प्रमाणित मराठी प्रतिशब्द वापरण्याची विनंती करा.
समाजमाध्यमांवरील मराठी लिखित भाषा ही मराठीत अभिव्यक्तीप्रधान आहे, तज्ज्ञप्रमाण नाही. ती तज्ज्ञप्रमाण करावयाची असेल तर भाषातज्ज्ञानी समाजमाध्यमांवर अधिक सक्रिय होणे गरजेचे आहे असे मला वाटते.
मराठीतून वैद्यकीय व तांत्रिकी उच्चशिक्षण प्रत्यक्षात कधी उतरेल हे सांगणे अवघड आहे, ते मराठीच्या भविष्यासाठी पोषक असले तरी नजीकच्या काळात घडेल असे मला वाटत नाही.
मराठीला येणाऱ्या काळात हिंदी,इंग्रजीच्या दबावाखाली राहत एकीकडे बोलीभाषांचे अस्तित्व व स्वातंत्र्य टिकवायचे आणि दुसरीकडे सुलभ, सर्वमान्य, व्याकरणास धरून राहणारी प्रमाणभाषा सर्वांच्या लेखनी उतरावावयाची ही तारेवरची कसरत मराठी लोकांना करावी लागणार आहे. आणि भाषाप्रेमापोटी आपली मराठी टिकवण्यासाठी हे श्रम माझ्या पिढीचे मराठीप्रेमी नक्की करतील अशी आशा व्यक्त करून माझे मत मांडणे संपवतो.
डॉ. सुधन्वा रा. पाठक
मिरज : १२/०१/२०२५

Leave a Reply