डॉक्टर्स डे आणि बेंदूर
“सुध्या कसला डॉक्टर्स डे रे! आज आपला आणि परवाला बैलांचा एवढाच काय फरक!” काल डॉक्टर्स डे होता आणि उद्या बेंदूर आहे. (बेंदूर म्हणजे दक्षिण महाराष्ट्रातील बैल पोळ्यासारखा सण) त्या ओघाने माझ्या एका डॉक्टर मित्राने केलेली बैलांच्याबरोबरची तुलना मनास बोचली. मी विचारले ‘का वैतागलायस ?’
मग त्याने मला एक फॉरवर्ड झालेला WhatsApp मेसेज पाठवला आणि वाच सांगितले. त्याचा थोडक्यात आशय असा की, “वर्षभर राबराब राबवून, मग एका दिवसापुरते बैलांना गोडधोड खायला घालून, रंगीत झूल चढवून मिरवायचे. तसेच समाजाने वर्षभर डॉक्टरांच्या नावाने वर्षभर खडे फोडायचे आणि डॉक्टर्स डेला हार, तुरे, शाल, श्रीफळ देऊन शालजोडीतले द्यायचे जणू !”
मन अंतर्मुख झाले, थोडा विचार करू लागलो.
काल डॉक्टर्स डे साजरा झाला. पण हे डे असतात मुळात टोकन म्हणून. कृतज्ञता व्यक्त करणेसाठी सोयीचा ठरवलेला सार्वजनिक मुहूर्तच जणू. विमेन्स डे, मदर्स डे असे डे असतातच मुळी प्रतीकात्मक. आपल्याला पण माहिती असते की, एका दिवशी फूल दिल्याने व सत्कार केल्याने आईच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही. तरी आपण ते दिवस साजरे करतो कारण कृतज्ञता मनात न ठेवता, व्यक्त केलेली कधीही चांगली असते. त्यामुळे चांगले काम करणाऱ्यास अधिक हुरूप येतो, इतराना चांगले काम करण्यास प्रोत्साहन मिळते.
अर्थात काही जण ही कृतज्ञता थोडक्यात व्यक्त करतात काही जण सोहळे करतात, प्रत्येकाची रीत वेगळी. मार्केटिंगच्या लोकांना अशा डेज चे तर भारी आकर्षण , कारण जाहिरातीसाठी नामी संधी. आणि इन्स्टा, रील्स च्या जमान्यात मस्त फोटो ऑपॉर्च्युनिटी!
डॉक्टर्स डे १ जुलै ला का साजरा करतात?
भारतरत्न, पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री डॉ. बिधान चंद्र रॉय यांची आठवण म्हणून १ जुलै दिवस ‘डॉक्टर्स डे’ आहे!
तो भारताचा राष्ट्रीय डॉक्टर्स डे आहे. इतर देशांचा इतर दिवशी असतो. डॉ. रॉय हे स्वतः कुशाग्र बुद्धिमत्तेचे डॉक्टर होते. MRCP ही फिजिशियन ची व FRCS ही सर्जनची अशी दोन्ही बिरुदे मिरवणाऱ्या मोजक्याच डॉक्टर्स मध्ये त्यांची गणती होते. त्यांच्या नावे सर्वोत्कृष्ठ वैद्यकीय शिक्षकाचा देखील पुरस्कार दिला जातो. त्यांचा जन्म व मृत्यु दोन्ही १ जुलैलाच झाले त्यामुळे १ जुलै ला राष्ट्रीय डॉक्टर्स डे म्हणून साजरा करण्याचे भारत सरकारने १९९१ साली ठरवले . तेव्हापासून हा दिवस डॉक्टर्स डे म्हणून साजरा होतो.
डॉक्टर : समाजाचा बदलता दृष्टिकोन
गेल्या शतकातील सुरुवातीच्या काळातील डॉक्टरांची वर्णने, त्यांची चरित्रे वाचल्यास आपल्या सहज लक्षात येते की डॉक्टर म्हणजे कोणीतरी देवमाणूस आणि त्याला इतर लोकांपेक्षा खूप मानमरातब मिळे. तो काळच तसा होता. कारण, ज्या रोगांनी हमखास लोक मरायचे त्याला वैद्यकीय क्षेत्रात रामबाण उपाय निघत होते. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी वैद्यकीय क्षेत्राने केलेले काम ठळकरित्या लोकांना भावत होते. डॉक्टर ही व्यक्ती ही त्याकाळी दुर्मिळ होती. डॉक्टर होणे ही त्याकाळी अवघड होते. मोजकीच वैद्यकीय महाविद्यालये होती. त्यामुळे जे काही डॉक्टर्स तयार होत त्यांचा कल शहरांमध्ये राहण्याच्या होता, त्यामुळे खेडोपाडी डॉक्टर म्हणजे आणखीनच अप्रूप. ही परिस्थिती जवळजवळ पूर्ण शतकाच्या प्रथामार्धात तशीच होती. जसा देश स्वतंत्र झाला, तसे शिक्षणाचे महत्त्व वाढले. वैद्यकीय शिक्षण सरकारने आटोक्यात असणाऱ्या फिया घेऊन ठेवले त्यामुळे सर्वांसाठी डॉक्टर बनणे शक्य झाले. नवीन महाविद्यालये त्या काळात निघत होती. त्यामुळे ज्यांच्यात बुद्धीची मशागत करायची धमक आहे त्यांच्यासाठी वैद्यकीय पेशा हा आकर्षक होता. त्या काळात डॉक्टर्स ची संख्या मर्यादित होती. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राकडे वळायचा कल वाढू लागला. डॉक्टर होणे ही पांढरपेशी, कायद्याला भिऊन राहणाऱ्या लोकांसाठी अर्थार्जनासाठी गुरुकिल्ली ठरली.
थोडक्यात डॉक्टरकी मध्ये लोकसेवेचे पुण्य पण पदरी पाडता यावयाचे व अर्थार्जन देखील चांगले होई.
असा वैद्याराणा : गेल्या शतकातील वरील वर्णन केलेल्या काळातील एक कविता
गेल्या शतकात एडगर गेस्ट हा एक अमेरिकन कवी होऊन गेला. त्याची ‘The Doctor ‘ ही कविता प्रसिद्ध होती. त्याचा मिरजेच्या डॉ. कृष्णानंद गोगटे यांनी केलेला समर्पक मराठी पद्यअनुवाद देखील जोडला आहे. ही कविता मिरज येथील चिरायू या नियतकालिकाच्या १९५५ च्या अंकात प्रसिद्ध झाली होती. त्यात जे दिलेले वाक्य आणि वाक्य आहे ते सध्या देखील रेसिडेंट म्हणून सरकारी दवाखान्यात काम करणाऱ्या कोणत्याही डॉक्टरला शब्दशः लागू होईल. आणि इतर डॉक्टर्स वर त्यातील दिलेली वेळ अगदी रोज येत नसली तरी नक्कीच असे वारंवार येणारे क्षण असतात जेव्हा सगळे विचार झुगारून पेशंटसाठी पळावे लागते.

मग कुठे बदलत गेले?
वरील कविता आणि सुरवातीस दिलेला व्हाट्सअप मेसेज किती विरोधाभासी आहेत ना? मग हे चित्र कुठे आणि कधी बदलत गेले?
ह्या प्रश्नाचे उत्तर देण्याइतका प्रदीर्घ अनुभव माझा नक्कीच नाही; पण माझ्या आधीच्या पिढीतील डॉक्टर्सची मनोगते व माझ्या पिढीतील डॉक्टरांची मते पाहिल्यास काही मुद्दे जाणवतात.
- डॉक्टरांची फुकट राबणारी त्यागमूर्ती प्रतिमा : जणू काही डॉक्टरांनी पैसे कमावणे म्हणजे गुन्हा आहे. या प्रतिमेच्या छटा आपणास वरील कवितेत देखील दडलेल्या दिसतील. वर्षानुवर्षे हा स्टीरियोटाइप झाल्याने तो मोडणे न पेशंटना शक्य आहे न डॉक्टरना. दुसऱ्याच्या दुःखातून पैसे कमावणे हे येथे प्रासंगिकपणे (incidentally) घडत असते जाणूनबुजून (intentionally) नाही. या बाबीस व्यवस्थित दोन्ही पक्षांना समजल्या तर पिळवणूकीची भावना (exploitation) निर्माण होणार नाही. त्यासाठी डॉक्टर पेशंट सुसंवाद घडणे फार गरजेचे आहे. पेशंटने उपचार सुरु करण्या पुरवी अंदाजित खर्च किती येईल याची कल्पना घेणे गरजेचे ठरते. त्याचप्रमाणे डॉक्टरांनी तो अंदाज पेशंटला कळवणे सोयीचे ठरेल.
- डॉक्टरकीचा ग्राहक संरक्षण कायद्यात समावेश. या कायद्यात १९८६ सालपासून वैद्यकीय व्यवसायास पकडले गेले. मुळात कायद्याचा उद्देश चांगला व रुग्णहिताचा आहे. पण या कायद्याचा वापर विधायक कार्याबरोबर डॉक्टरांना केसचा बागुलबुवा दाखवून त्रास देण्यासाठी पण होऊ लागला. या कायद्यामुळे डॉक्टर पेशंटचे नाते व्यावसायिक-ग्राहक या स्तरावर नेण्यात आले.
- कायद्याच्या कटकटीला घाबरून जोखमीच्या जबाबदाऱ्या स्वतःवर न घेता इतर वैद्यकीय तज्ज्ञांचे मत घेणे, उच्चतर केंद्राकडे पेशंट पाठवणे या गोष्टी वाढल्या. पेशंटला कराव्या लागणाऱ्या तपासण्यांचे प्रमाण देखील वाढले. त्यामुळे खर्चही वाढत गेला.
- गेल्या पाच सहा दशकांत वैद्यक क्षेत्राने नवतंत्रज्ञानाच्या साहायाने इतकी प्रगती केली आहे की, गुंतागुंत होणे व प्राणसंकट उद्भवणे ही गोष्ट पन्नास साठ वर्षांपूर्वी जेवढी घडायची तेवढी आता घडत नाही त्यामुळे, जेव्हा ती घडते तेव्हा ती लक्षणीयच (significant) बनते. त्यामुळे अशी गुंतागुंत घडू शकते ही गोष्ट मान्य करायची तयारी हल्ली पूर्वी इतकी नाही पण दर वेळेस अशी गुंतागुंत होणारच नाही हे वचन देणे डॉक्टरांच्या हातातले देखील नाही. इकडे वाढत्या अपेक्षांचे ओझे आणि तिकडे कायदे तक्रारीची भीती अशा इकडे आड तिकडे विहीर अवस्थेत डॉक्टर्स सापडतायत. त्यामुळे डॉक्टर्स ची डिफेन्सिव्ह मेडिसिन प्रॅक्टिस करण्याची वृत्ती साहजिक वाढते आहे.
- १९९० मध्ये ग्लोबलायझेशन व २००० च्या दशकात आयटी क्रांती झाली. त्यामुळे लोकांचे राहणीमान झपाट्याने बदलले व बदलत आहे. आर्थिक सुबत्ता आली तशी महागाई देखील वाढली. वैद्यकीय शिक्षण घेण्याचा खर्च वाढला. नवीन दवाखाना टाकणे आता मागील पिढी इतके सोपे नाही. त्याला लागणाऱ्या परवानग्या , खर्च हे खूप वाढत गेले आहे. त्यामुळे १९७०-८० पर्यंत डॉक्टर झाले , एखादे नर्सिंग होम चालू केले आणि प्रॅक्टिस चालू झाली यासाठी लागणारा खर्च आणि हीच गोष्ट आताच्या काळात करण्यासाठी लागणारा खर्च यात महागाईदर विचारात घेऊन देखील हिशोब लावला तरी खूपच लक्षणीय वाढ झालेली आहे. त्यामुळे हा खर्च पेशंटच्या माथी पडतो आहे, व तो रोखण्याचे डॉक्टरांच्या हातात फारसे राहिले नाही.
- फॅमिली डॉक्टर ही संस्था आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. पेशंटना प्रथम फॅमिली डॉक्टरने पाहून मग तज्ज्ञांकडे निर्देशित करावे असे सध्या होत नाही.
- पूर्वी छोटी नर्सिंग होम्स मध्यम वर्गासाठी वैयक्तिक लक्ष घालून ट्रीटमेंट मिळवण्याची हक्काची ठिकाणे होती. पण वाढत्या खर्चामुळे, जाचक अटी नियमांमुळे अशी नर्सिंग होम्स बंद होऊन एक तर फक्त सरकारी रुग्णालये किंवा कॉर्पोरेट रुग्णालये असे दोनच पर्याय नजीकच्या भविष्यकाळात शिल्लक राहतील. पेशंट डॉक्टर यांचे वैयक्तिक संवाद न घडता निव्वळ व्यावसायिक संवाद होतायत.
- डॉक्टर्स हे आकाशातून पडत नाहीत. सर्वसामान्य जनतेतूनच घडतात. त्यामुळे समाजाला लागलेली भ्रष्टाचाराची, घसरत्या नीतिमूल्यांची व स्वार्थी आत्ममग्नतेची लागण थोड्याफार फरकाने त्याच प्रमाणात वैद्यकीय क्षेत्रास लागली आहे. त्यामुळे जसा समाज बदलतो त्याचे प्रतिबिंब वैद्यकीय क्षेत्रावर देखील उमटते. २१व्या शतकातील समाजाने २०व्या शतकातील नीतिमूल्यांच्या तराजूत वैद्यकीय क्षेत्रास जोखणे अप्रस्तुत ठरते.
- मेडिकल जाउस्टिंग : डॉक्टरची संख्या विशेषतः शहरात सध्याच्या काळात खूप वाढली आहे त्यामुळे स्पर्धा होणे स्वाभाविक आहे पण ही स्पर्धा स्वच्छ असावी. पण दुर्दैवाने ती तशी राहत नाही, इतर सहव्यवसायिकांच्या वर त्यांना चुकीचे ठरवण्यासाठी पेशंटपुढे टीकाटिप्पणी होते. त्यातून चुकीचा अर्थ निघून पेशंटची इतर तज्ज्ञाच्या बाबत सहज गैरसमजूत होते.
- गेल्या शतकाच्या सुरवातीपासून मध्यापर्यंत डॉक्टर ही समाजातील विशेषाधिकारप्राप्त व्यक्ती ( privileged personality) होती पण या शतकात डॉक्टरला असे कोणतेच प्रिव्हिलेज नाही ही गोष्ट विशेषतः डॉक्टरांनीच लक्षात घेतली पाहिजे.
- आजची पिढी ऍस्पिरेशनल पिढी आहे. इंटरनेटच्या युगात माहितीचे लोकशाहीकरण झालेले आहे. त्यामुळे आजचा पेशंट हा पूर्ण वाचून आलेला, आपल्या कडूगोड अनुभवांबद्दल व्यक्त होणारा, डॉक्टरऐवढाच किंवा अधिक आर्थिक सक्षम आहे. अशा पेशंट मिळणे गेल्या शतकात दुरापास्त, पण आजची परिस्थिती ती नाही.
- बुद्धिजीवी व आर्थिक सक्षम वर्ग मागच्या शतकात समाजात जेवढ्या प्रमाणात होता तो कैकपटीने सध्या वाढला आहे.असा समाज स्वतःच्या हक्कांबाबत बोलका (vocal) असतो तसेच निव्वळ आर्थिक अपेक्षा नसून सेवक्षेत्रात सेवेबरोबर वैचारिक वागणुकीच्या (behavioural) देखील अपेक्षा असतात. त्यामुळे वैद्यकीय सेवा जरी चोख असली तरी ती घेताना इतर बाबी कशा आहेत उदा. वेटींग रूम मध्ये घालवलेला वेळ, बोलण्यातला tone and tenor ह्या गोष्टीही महत्त्वाच्या ठरतात.
या सर्व मुद्यांमुळे १९५० च्या आशावादी दशकात असणारा आदर्श डॉक्टर पेशंटनी २०२३ मध्ये अपेक्षू नये आणि डॉक्टरांनी पेशंटला देखील गृहीत धरू नये. डॉक्टर पेशंट या सुंदर नात्यास अलीकडे बरेच तडे गेलेले आहेत त्यामुळे हे नाते टिकविण्यास व सुधारण्यास सुरुवात करण्याआधी हे तडे गेलेले मान्य करणे देखील गरजेचे वाटते.
मग काय करता येईल ? (उपसंहार)
व्यावसायिकतेचा स्वीकार करणे डॉक्टर्स व पेशंटना क्रमप्राप्त आहे. त्यामुळे पारदर्शिता वाढेल. अनाठायी अपेक्षा कमी होतील त्यामुळे अपेक्षाभंगही कमी होतील. पण व्यावसायिकता म्हणजे चांगल्या अर्थाने व्यावसायिकता लुबाडणूक नाही हे डॉक्टर मंडळींनी पेशंटना पटवून देणे गरजेचे आहे. डॉक्टरला म्हणताना ‘ वैद्यो नारायणो हरिः’ नको आणि ‘ यमराजसहोदर ‘ देखील नको. पेशंटला मिळणारी सहवेदना किंवा empathy मिळणे जेवढी गरजेची आहे तेवढेच गरजेचे आहे त्या पांढऱ्या डगल्यामागील माणसास जाणणे गरजेचे आहे. डॉक्टर हा माणूस आहे, त्याचा देव किंवा भावनाशून्य अथक यंत्र करू नये.
आमचे मिरज हे गाव आरोग्यपंढरी म्हणून ओळखले जाते. येथे दूरवरून पेशंट येतात. त्या पेशंटनी दिलेल्या प्रेमामुळेच मिरजेचा नावलौकिक आहे. त्यासाठी आमच्या तरुण पिढीतील डॉक्टर्सना मिरजेतील सिनियर डॉक्टर्स चा सार्थ अभिमान आहे. त्यांचा काल डॉक्टर्स डे निमित्त आय एम ए या वैद्यकीय संघटनेने सत्कार केला बरे वाटले. त्यांच्याकडून आमच्या पिढीला खूप शिकण्याजोगे आहे.
आम्हा डॉक्टरांना देखील या काळात देखील मिळणारे पेशंटचे प्रेम, सद्भावना व आशीर्वाद यांची जाणीव नक्कीच आहे. वरील निर्देशित केलेल्या व्हॉट्सॲप मधील उद्वेग खेदकारी असला तरी काही अंशी त्यात तथ्य आहे. पण त्यामुळे तुम्ही दिलेल्या प्रेमाचे महत्त्व तसूभरही कमी होत नाही. ते खरोखरीच उत्साह वाढवणारे आहे व बेगडी नाही ही नक्कीच नाही याची पूर्ण खात्री आहे. माझे गुरु (उद्या गुरुपौर्णिमा देखील आहे) डॉ. जी. व्ही. राव यांनी पाठवलेला डॉक्टर्स डेचा मेसेज मला सर्वात जास्त भावला . तो शेअर करून हा लेख इथेच थांबवतो.
डॉ. सुधन्वा रा. पाठक
२-७-२३
मिरज


Leave a Reply