स्वातंत्र्यपूर्व काळातील मिरजेची वैद्यक परंपरा
आमचे शहर मिरज तसे किमान हजार वर्षे जुने. तसे पहिल्यास रामायणात वर्णलेले मरीची क्षेत्र हे मिरजच असा काहींचा दावा आहे, असो.
मिरज या शहराने अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. विसाव्या शतकात जेव्हा भारताची सर्वंकष प्रगती होत गेली व भरभराट झाली त्या काळात मिरज मात्र काहीसे सुषुम्नावस्थेत गेले पण गेल्या शतकात जेव्हा मिरजेची इतर क्षेत्रात वाढ खुंटली होती तेंव्हा दोन क्षेत्रांनी मिरजेचे नाव केले त्यात पहिले म्हणजे संगीत व दुसरे वैद्यकीय.
परवाच अनेकानी “मिरज वैद्यकीय सेवांचा मागोवा” हा मथळा असलेला सोलापूरच्या लेखिका व माहेरच्या मिरजेच्या असणाऱ्या नीला गोडबोले महाबळ यांचा एक लेख वाचला. मागे एकदा त्यांचा मिरजेच्या आठवडी बाजारावर आलेला लेख वाचला होता. त्यांनी मिरजेबद्दल खरोखरीच अत्यंत माहितीपूर्वक व खुमासदार शैलीत अनेक लेख लिहिले आहेत. त्यामुळे मिरजेला प्रकाशझोतात आणण्यासाठी सर्वप्रथम लेखिका गोडबोले यांचे आभार.
पण या लेखाच्या निमित्ताने मला खालील गोष्टी नमूद कराव्याश्या वाटतात.
१. डॉ. विल्यम वानलेस हे १८९२ ला मिरजेत आले. त्यांचे कार्य हिमालयाप्रमाणे प्रमाणे उत्तुंग आहे व मिशन हॉस्पिटलची स्थापना व वाढ करून करून त्यांनी मिरजेचे नाव जगभर प्रसिद्ध केले हे निर्विवाद सत्य आहे. पण बऱ्याच जणांना अशी कल्पना असते की मिरजेत त्यापूर्वी आधुनिक वैद्यकाचा दवाखानाच नव्हता. पण मिरजेत आधुनिक वैद्यक दवाखाना हा मिरजेचा सरकारी दवाखाना असून त्याची स्थापना १८६४ साली श्रीमंत गणपतराव तात्यासाहेब पटवर्धन, मिरजेचे तत्कालिक संथानिक, यांनी केली. त्यामुळे या दवाखान्याचे व त्यातील डॉक्टरांचे मिरजेच्या वैद्यक क्षेत्रात योगदान विसरून चालणार नाही. संस्थानकाळात हा मिरजेचा दवाखाना सर्वसोयींनी युक्त होता व मिशनपूर्व काळात एकमेव आधुनिक वैद्यकाचा स्रोत होता. पुढे स्वातंत्र्यानंतर प्रथम मुंबई सरकार नंतर महाराष्ट्र सरकार व मिरज नगरपालिका असे त्याचे स्वामित्व बदलले. संस्थानकाळी हा दवाखाना मिशन हॉस्पिटलनंतर पूर्णपणे सज्ज असा शहरातील दवाखाना होता. तेथे प्रसूती, शस्त्रक्रिया अश्या सगळ्याच विभागांची सोय होती. आता ते सा. मि. कु. महापालिकेचे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र बनले आहे. मिरज नगरीचे प्रमाणेच त्या दवाखान्याचे भाग्य!
२. मिरजेचे मूळचे असणारे डॉक्टर, ज्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मिरजेबाहेर जाऊन मिरजेचे नाव केले त्यांचे उल्लेखाशिवाय लेख पूर्ण होऊ शकत नाही.
३. माझे आजोबा डॉ. एन. आर. पाठक यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा गुणगौरव होतो पण तेव्हडाच गुणगौरव त्यांच्या वैद्यकीय कार्याचा होणे गरजेचे आहे. यासंदर्भात मी काही वर्षांपूर्वी ब्लॉग लिहिला होता, तसेच गोडबोले यांच्या लेखामध्ये देखील ते केले गेले आहे. म्हणून पुनरावृत्ती करत नाही.
म्हणून या लेखाचे प्रयोजन! केवळ एका लेखात मिरजेचा वैद्यकीय इतिहास बसू शकत नाही इतका तो विस्तीर्ण आहे. त्यासाठी लेखमाला किंवा पुस्तक लिहावे लागेल. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळ ( १९४७ पर्यंत) ही मर्यादा आखून घेतली.
मिशन पूर्वीचे मिरज वैद्यक
डॉ.गोपाळ गोविंद वाटावे , हे मिरजेतील पहिले डॉक्टर . ते मुंबईच्या ग्रांट मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी होत. त्यांच्याबाबत फार माहिती उपलब्ध नाही.
पूर्वी उल्लेखलेल्या मिरज सरकारी दवाखान्याबाबत बोलायचे झाले तर सुरुवातीच्या काळात कोण मेडिकल ऑफिसर्स होते ह्याची माहिती मिळू शकली नाही. १८७८ मध्ये डॉ. त्रिंबक सखाराम शिरवळकर LMS हे ह्या दवाखान्याचे प्रमुख होते. त्यांनी देवीच्या लसीकरणावर एक पुस्तक लिहिले होते, त्यात खूप शास्त्रीय रीतीने या रोगाचे व त्यावरील प्रतिबंधाचे विवरण आले आहे. ते ग्रांट मेडिकलचे विद्यार्थी होते. त्यांचे पुस्तक इतिहास अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर यांच्या संग्रही आहे. त्यात त्या काळच्या आरोग्यसेवेची देखील माहिती मिळते. त्यात दिलेल्या माहितीनुसार शेकडो रुग्णांची सेवा व आंतररुग्ण विभाग या सरकारी दवाखान्यात उपलब्ध होते.
मिशनच्या काळातील मिशन बाहेरचे मिरज वैद्यक
याची आपणास दोन विभागात विभागणी करता येईल
- मिरज सरकारी दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी
- असे डॉक्टर्स जे मिशन व सरकारी दवाखाना दोन्हीकडे नव्हते
मिरज सरकारी दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी
वरील उल्लेख केलेले डॉ. शिरवळकर यांच्यानंतर डॉ. बळवंतराव भडभडे १८९८ मध्ये रुजू होऊ पर्यंत काळात कोण वैद्यकीय अधिकारी होते याची माहिती उपलब्ध नाही , पण त्यांचे योगदान मात्र नक्कीच अनुल्लेखित करता येत नाही.
डॉ. शिवराम गोविंद (उर्फ बळवंतराव) भडभडे L.M.S.
हे मुंबईच्या ग्रांट वैद्यकीय महाविद्यालयातून १८९४ साली LMS ही पदवी घेऊन उत्तीर्ण झाले. त्यांनी १८९८ ते १९१९ अशी दोन दशके मिरजेच्या चीफ मेडिकल ऑफिसरची जबाबदारी पार पडली. ते निष्णात सर्जन व फिजिशियन होते. डोळ्याच्या उपचाराकरिता विष्णू दिगंबर पलुस्कर त्यांच्याकडे आले होते. त्यांनी त्यांची गायनातील क्षमता ओळखली व मिरजेच्या संस्थानिकांचा त्यांना राजाश्रय मिळवून दिला. याच पलुस्करांनी अभिजात भारतीय संगीताचे पुनरुथ्थान केले. डॉ. शि. गो. भडभडे यांचा होमियोपॅथीचा व्यासंगही मोठा होता.
डॉ. दत्तात्रय शिवराम भडभडे M. B. B. S.
हे देखील मुंबईच्या ग्रांट वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी. मिरजेच्या दवाखान्यात १९१९ साली रुजू झाले व १९४५ पर्यंत चीफ मेडिकल ऑफिसर म्हणून सेवा दिली. गरिबांचे प्रिय डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती होती.
डॉ. कृ. गो. गोसावी L.C.P.S.
हे पुण्याच्या बयरामजी जीजीभॉय मेडिकल स्कूल चे विद्यार्थी. १९२५ मध्ये L.C.P.S. ची पदवी त्यांना मिळाली. १९२६ साली मिरजेच्या दवाखान्यात रुजू झाले. त्यांनी व डॉ. द. शि. भडभडे यांनी पुढाकार घेऊन इंडियन मेडिकल अससोसिएशन च्या मिरज शाखेची सुरुवात केली. मिरज आय. एम. ए. च्या सभागृहास त्यांचेच नाव आहे. वैद्यकीय क्षेत्राबरोबर सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात देखील त्यांचे योगदान होते.
डॉ. न. रा. पाठक L.C.P.S.
हे १९४१ साली मिरज मेडिकल स्कूल मधून उत्तीर्ण झाले. त्यानंतर ते काही काळ कर्नाटक हेल्थ इन्स्टीट्युट घटप्रभा होते व नंतर मुंबईस ग्रांट मेडिकल कॉलेज मध्ये DOMS च्या शिक्षणास होते. १९४५ साली मिरजेतील सरकारी दवाखान्यात जागा रिक्त होती व वाढलेला भर संभाळणेसाठी वैद्यकीय अधिकाऱ्याची तातडीची गरज होती त्यामुळे त्यांना DOMS ची परीक्षा सोडून द्यावी लागली व मिरजेस परतावे लागले. पण मिरजेच्या सरकारी रुग्णालयात त्यांना खूप काम मिळाले व डॉ. गोसावी यांनीही त्यांना कामाचे पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. १९४६ साली त्यांनी स्वतःचे रुग्णालय सुरु केले.
मिरज सरकारी दवाखान्यातील मेडिकल ऑफिसर्स ना मोडनिंब,शिरढोण व लक्ष्मेश्वर येथील उपकेंद्रांना ही भेट द्यावी लगे. तसेच मिरज हायस्कूल मधील मॅट्रिक इयत्तेतील विद्यार्थ्यांना हेल्थ अँड हायजिन हा विषय देखील शिकवावा लागे.
मिरजेतील या दोन्ही हॉस्पिटल्स ना संलग्न नसलेले डॉक्टर्स
डॉ. दादासाहेब भडकमकर
मूळचे मिरजेचे असले तरी वैद्यकीय शिक्षणासाठी त्यांनी मिरज सोडले ते कायमचे. ते सुटीच्या काळात मिरजेला येत तेव्हा त्यांच्या वाड्यात त्यांच्या सल्ल्यासाठी पेशंट्सची रीघ लागे. मुंबईच्या नॅशनल मेडिकल स्कूल ची स्थापना त्यांनी इतर डॉक्टर मित्रांबरोबर त्यांनी केली. तेच स्कूल आज टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज म्हणून प्रसिद्ध आहे व मुंबईतील लॅमिन्गटन रोडला आता डॉ. भडकमकर मार्ग म्हणतात. भारतात आयुर्वेदाच्या पुनरुथ्थानासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यात त्यांचे नाव अग्रगण्य आहे.
डॉ. आर. एम. शिंदे L.D.Sc. हे मिरजेतील पहिले दंतवैद्य. त्यांनी लाहोर येथे प्रशिक्षण घेऊन मिरजेत आले व मिरजेतील पहिला दातांचा दवाखाना सुरु केला.
डॉ. ओथनियल देवदत्त L.C.P.S. D.T.M. यांनी मिरजेत पॅथॉलॉजी विषयाच्या बाबत स्वतंत्र प्रॅक्टिस ची सुरुवात केली. २३ वर्षे मिशन मध्ये काम केल्यावर १९३९ मध्ये ते मिशन मधून रिटायर झाले. त्यांचे सेंट ल्युक क्लिनिक हे मिरजेतील पहिली मिशन व्यतिरिक्त खाजगी पॅथोलॉजी लॅब होती. ते मिरजेचे पहिले ट्रॉपिकल मेडिसिन एक्सपर्ट होत.
डॉ. आर. डी. प्राणी M.B.B.S.
हे १९२२ साली ग्रांट मेडिकल कॉलेज मधून उत्तीर्ण झाले त्यानंतर मिरजेत प्रायव्हेट प्रॅक्टिस केली.
डॉ. व्ही. एम. गोखले L.C.P.S.
हे १९२९ साली मिरज मेडिकल स्कूल मधून उत्तीर्ण झाले व १९३६ साली प्रायव्हेट क्लीनिक सुरु केले
डॉ. एम. एस. करंदीकर L.C.P.S.
मिरज मेडिकल स्कूल मधून उत्तीर्ण झाले व १९४० साली प्रायव्हेट क्लीनिक सुरु केले. IMA मिरज च्या स्थापनेत विशेष सहभाग. तसेच समाजकार्यात रस.
डॉ. भोजराज चिडगुपकर L.C.P.S.
मिरज मेडिकल स्कूल मधून उत्तीर्ण झाले व १९४२ साली प्रायव्हेट क्लीनिक सुरु केले
डॉ. एच. पी. पटवर्धन प्रायव्हेट प्रॅक्टिस त्याबरोबर आरोग्यविषयक लिखाण केले
याशिवाय मिरजेत आयुर्वेदिक उपचार करणारे पिढीजात वैद्य घराणी म्हणजे वैद्य करमरकर, वैद्य अडिवरेकर, वैद्य जोशी हे होते. तसेच वैद्य पारसनीस हे नगरपालिकेच्या आयुर्वेद दवाखान्याचे प्रभारी होते.
मिशनचे भरीव कार्य
मिशन च्या कार्याचा आढावा एका लेखात घेणे निव्वळ अशक्य. उत्सुक वाचकांनी डॉ. डी. पी. गोर्डे यांचे मिशनच्या सुवर्णमहोत्सव वर्षानिमित्त प्रकाशित केलेले पुस्तक जरूर वाचावे. त्याची लिंक खाली देत आहे.
पण मिशन मधील सर्व डॉक्टरांचा उल्लेख एकाच लेखात शक्य नाही पण काही ठळक उल्लेख केल्याशिवाय हा लेख पूर्ण होऊ शकत नाही.
डॉ. सर विलियम वॉन्लेस M.D. F.A.C.S. : मिशनचे संस्थापक व मिरजेला विश्वस्तरावर नेऊन ठेवणारे
डॉ. चार्ल्स ए. व्हेल M.D. F.A.C.S.: अतिशय निष्णात सर्जन. मिरजेत कँसरवर रेडिएशन उपचार सुरु करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा.
डॉ. गोहीन : सर्जन व मिशनचे डायरेक्टर. मानसोपचाराची सोय केली
डॉ. डी. पी. गोर्डे L.C.P.S.
हे १९३१ साली बी. जे. मेडिकल स्कूल पुणे मधून उत्तीर्ण झाले व १९३५ साली मिरजेत रुजू झाले. केराटोप्लास्टी (बुबुळ प्रत्यारोपण) चा प्रयोग करणाऱ्या भारतातील सुरवातीच्या सर्जन्स पैकी एक. मिशन मध्ये स्वतंत्र आय – ई. एन. टी. विभाग त्यांनी चालू केला. मिरजेचे काही काळ नगराध्यक्ष . मिशनचे पहिले भारतीय वंशाचे डायरेक्टर.
डॉ. एस. डी. अरवट्टीगी L.C.P.S.
हे १९२८ साली मिरज मेडिकल स्कूल मधून उत्तीर्ण. डॉ चार्ल्स व्हेल यांनी त्यांना प्रशिक्षित केले गेले होते. त्यांचे पट्टशिष्य. जरी ते प्रसूती आणि स्त्रीरोग विभागाचे प्रमुख होते, तरीही त्यांनी सर्जरी विभाग देखील सांभाळला. त्यांनी १९४८ मध्ये स्वतःचे हॉस्पिटल सुरु केले त्यास डॉ. व्हेल यांचे नाव दिले.
डॉ. विल्हेम आयरन L.C.P.S.
हे १९२९ साली मिरज मेडिकल स्कूल मधून उत्तीर्ण झाले. १९३५ साली डॉ. व्हेल यांनी त्यांना स्वित्झर्लंड येथे रेडिएशन थेरपी चे ट्रेनिंग साठी पाठवले व एक वर्षाने ते मिशन मध्ये परतले आणि मिशनमध्ये तो विभाग सुरु केला. ‘एक्स रे’ च्या वरून अचूक निदानात देखील त्यांचा हातखंडा होता.
डॉ. विल्यम आर्थर सेसिल L.C.P.S.
मिशन मधील निष्णात सर्जन.
डॉ. रामप्रकाश संतराम मोहन L.M.S. D.M.R.E. M.B.B.S
हे १९४६साली मिरज मेडिकल स्कूल मधून उत्तीर्ण झाले. १९४७ साली मिशन मध्ये रुजू झाले. पुढे जाऊन स्वातंत्र्योत्तर काळात MBBS व DMRE च्या देखील पदव्या मिळवल्या व मिरजेतील पहिले पदवीप्राप्त रेडिओलॉजिस्ट म्हणून त्यांना मान मिळतो. पुढे त्यांनी अनेक संशोधनपर निबंधही लिहिले.
मिशनचे मिरज मेडिकल स्कूल १८९७ साली सुरु झाले १९४४ पर्यंत या स्कूल ने ४०० डॉक्टर तयार केले जे मिरजेतून निघून भारताच्या कानाकोपऱ्यात पोहचले व त्यांच्या सेवेने मिरजेचे नाव उज्ज्वल केले. पूर्वी स्कुल व कॉलेज अशी दुहेरी वैद्यक शिक्षण पद्धती भारतात असे. स्कुलला कॉलेज ऑफ फीजिशियन्स व सर्जन्स बॉम्बे बरोबर संलग्नता घ्यावी लागे व तेथील विद्यार्थ्यांना L.C.P.S. ( Licentiate of the College of Physicians and Surgeons of Bombay) ही पदवी मिळे. कॉलेज मधील विद्यार्थ्यांना M.B.B.S. ही पदवी मिळे. प्रॅक्टिस साठी दोन्ही पदव्यांमध्ये समाधिकार होते पण शिक्षक व्हावयाचे असेल तर मात्र M.B.B.S. करावे लागे कारण L.C.P.S. नंतर स्नातकोत्तर पदविका अभ्यासक्रमास प्रवेश मिळायचा पदवी अभ्यासक्रम हवा असेल तर M.B.B.S. लागे. दुसरी एक गोष्ट म्हणजे M.B.B.S. कॉलेजेस फक्त ब्रिटिश मुलुखात होती संस्थानातील विद्यार्थ्यांना तेथे प्रवेश मिळणे म्हणजे दुरापास्त. या मेडिकल स्कूल चे वैशिष्ठ्य म्हणजे विद्यार्थ्यांबरोबर विद्यार्थिनींना ही प्रवेश होता. डॉ. कदररर्स हे बरीच वर्षे या स्कूल चे इंचार्ज होते.
मिरजेतील पहिली महिला डॉक्टर कोण हे नक्की सांगता येणार नाही पण डॉ. सुमन बेडेकर L.C.P.S. याच स्कूल च्या १९४३ च्या विद्यार्थिनी नंतर जयपूर येथे प्रॅक्टिस केली. डॉ. मालिनी रामप्रकाश मोहन L.C.P.S. पण याच स्कूल च्या विद्यार्थिनी १९४७ साली त्यांनी मिरजेत जनरल प्रॅक्टिस चालू केली.
१९४७ नंतर सरकारने कायदा करून मेडिकल स्कुल्स मध्ये थेट प्रवेश प्रवेश बंद केले. १९४७ नंतर काही स्कुल्स त्वरित कॉलेज मध्ये रूपांतरित झाली उदा. बी. जे. मेडिकल स्कुल पुणे चे १९४७ मध्येच कॉलेज झाले. पण मिरजेच्या दुर्दैवाने मेडिकल स्कुल ते मेडिकल कॉलेज ह्या स्थित्यंतरात १५ वर्षे ही परंपरा खंडित झाली होती. १९६२ साली मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन झाले.
मिशनने क्षयरोगासाठी वॉन्लेसवाडी येथे टी. बी. सॅनेटोरियम व चंदनवाडी येथे कुष्ठरोग्यांसाठी रिचर्डसन लेप्रसी हॉस्पिटल या दोन संस्थातून अनेक रुग्णांची सेवा केलेली आहे.
उपसंहार
अशाप्रकारे मिरजेची आरोग्यपंढरी बनण्यामागे या अनेक डॉक्टर्स चे योगदान आहे. असे म्हणता येईल या काळात खूप मजबूत पायाभरणी झाली. त्यामुळेच आरोग्यपंढरीचा डोलारा व पुढील सुवर्णकाळ नीट उभा राहू शकला. त्यामुळेच अनेक नवनवीन विषयांचे तज्ज्ञ, भारतातील प्रथमच होणारी ऑपरेशन्स, विविध आरोग्य संघटनांचे अध्यक्ष, पुस्तकांचे लेखक हे मिरजेनेच दिले.
याच वेळी शिवाय मिरजच्या पंचक्रोशीत प्रॅक्टिस करणारे डॉक्टर्स उदा. घटप्रभा येथे अमेरिकेतून शिकून परत आल्यावर डॉ. जी. आर. कोकटनूर M.D. यांनी कर्नाटक हेल्थ इन्स्टिट्यूट ची स्थापना केली व नंतर काही काळ ते मिरजेत होते , तसेच शेडबाळ येथे डॉ. जी. के. लोकूर L.C.P.S. होते, तेथील डॉटरांच्यामुळे देखील मिरजेच्या वैद्यकीय क्षेत्रातील उत्कर्षास हातभार लागला असणार.
आमच्या आधीच्या व वरील नंतरच्या पिढ्यानी ही परंपरा अधिक समृद्ध केली आहे. त्यामुळे या समृद्ध परंपरेस पात्र होण्याची व तिला वृद्धिंगत करण्याची माझ्या पिढीतील सर्व मिरजकर डॉक्टरांची जबाबदारी आहे. मिरजेची ही परंपरा आजचे डॉक्टर्स देखील आणखी उंची गाठून देतील याबाबत दुमत नाही. त्यामुळे मिरजेचा नागरिक असण्याचा व डॉक्टर होऊन येथे प्रॅक्टिस करण्याचा सार्थ अभिमान वाटतो.
डॉ. सुधन्वा रा. पाठक
मिरज : २४/१२/२०२२
तळटीप:
अशाप्रकारे हा एक ओझरता आढावा आपण घेतला. यात मिरजेतील अनेक डॉक्टर्स ची नावे राहून गेली असतीलच. मिरजेच्या आसपास गावांतील उदा. तासगाव, अष्टा ,शेडबाळ, म्हैसाळ येथील डॉक्टर , सांगलीतील डॉक्टर्स यांची नावेही यात नाहीत.
मिशन हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टर्सचा समावेश यात करू शकलो नाही.
काही चुका दुरुस्ती सुचवावयाची असेल तर ब्लॉग च्या प्रत्युत्तरात जरुर कळवा. अनावधानाने मिरजेतील एखादे डॉक्टरचे नाव राहिल्यास/ चुकीचे लिहिले असल्यास प्रत्युत्तरात जरूर कळवा म्हणजे लेखात घालता येईल. तसेच छायाचित्रे उपलब्ध असतील तरी कळवा.
संदर्भ:
- मिरज संस्थानचा परिचय : श्री. गु. रा. अगरवाल
- मिरजेचा इतिहास : डॉ. सौ. सुवर्णा प्रकाश पाटील
- A story of Miraj: Dr D. P. Gorde https://dspace.gipe.ac.in/xmlui/bitstream/handle/10973/34225/GIPE-038001.pdf?sequence=3&isAllowed=y
- Some posts on this topic by Mr Mansingrao Kumthekar and personal communication.
- Some modifications are done thanks to the feedback received in replies to the blog.

I love my Miraj I proud of my Miraj people and Miraj city
bat wats kadishan in today mishan hospital?
Thanks, but that question is, though bothersome, beyond the scope of this blog.
Dr Ramprakash Santaram Mohan Mbbs Dmre 1st radiologist of miraj ex Hod miraj mission hospital he was trained radiologist and dedicated work as radiologist and radiation therapist and retired as Hod miraj mission hospital and also contributed and Co author with Dr gosavi sir with research publication in elsevier journal regarding a new view in ear pathology in study of internal acoustic meatus and started his first private practice at uma nivas madhav peth near water tank miraj as first radiologist of this medical hub town and performed direct vascular carotid angiography in those good old days with no catheters available for eminent neurosurgeon Dr joshi for his neurosurgical cases patients and continued legacy for 3rd generation till date with grandson being the first interventional radiologist of the sangli district .
Thanks for suggestion
Dr. Sudhanwa, Let me first congratulate you for painstaking work of compilation done by you. The medical history of Miraj is definitely an inspiration to the generations to follow.
Also, Dr. Dadasaheb Prani, Dr. H. P. Patwardhan & Dr. Kokatnur have their contribution in the medical services of Miraj upto 1947 & after. Also, I would like to suggest you that you can form a committee of your generation & come out with a complete atlas of the proud medical history of Miraj.
Definitely shall update the names, also nice of you to suggest the idea of compiling a proper history. But it is no single man’s job. will require a team
डाॅ. सुधन्वा,
प्रथमतः तुझे अप्रतिम लेख तसेच उत्तम compilation व तू घेतलेले कष्ट यासाठी विशेष अभिनंदन!
तुझ्या लेखात उल्लेख केलेली लग्नापूर्वीची सुमन बेडेकर ( तुझ्या लेखात चुकीने ‘बेडकर’ असा उल्लेख आहे तो बेडेकर असा हवा) (लग्नानंतरची सौ. सुमन पंड्या) ही माझ्या वडिलांची सख्खी बहिण म्हणजेच माझी सख्खी आत्या होय. डॉक्टर पंड्या हेही मिरज मेडिकल स्कूलचे तिच्याच बॅचचे विद्यार्थी होते. त्या दोघांनी प्रथम बागलकोट येथे दवाखाना व मॅटर्निटी होम सुरू केले व नंतर डॉ. पंड्या यांचे बंधू जे जयपुर येथे इंजिनिअर होते त्यांचे निधन झाल्याने व घरी त्यांचे वृद्ध वडील एकटेच असल्याने ते दोघे बागलकोट येथील उत्तम चालू असलेली प्रॅक्टिस बंद करून जयपूरला गेले. आता त्यांचा डॉक्टर मुलगा व सून जयपुर येथे तो दवाखाना चालवतात.
—–ऍड्. अनंत बेडेकर.
धन्यवाद!
फोनेटिक किबोर्ड मुळे अनावधानाने बेडकर झाले होते, ते दुरुस्त केले आहे.