नवखा वाचक ते नवखा लेखक : माझा मराठी साहित्यातील प्रवास
मी मराठी भाषेचा एक चाहता आहे. तशी मराठी भाषेविषयी मला आपुलकी निर्माण झाली खूप उशिराने.
शाळेत माझे मराठी खूपच साधारण होते. हस्ताक्षर देखील कामचलाऊ, वाच्य पण सुवाच्य नाही असे. आणि ते सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न देखील केला नाही. मराठी वाचनाचा मला छंद होता. अगदी पुस्तकी किडा नसलो तरी, दहावीपर्यंत स्वामी, श्रीमान योगी, पानिपत, आणि मृत्युंजय या कादंबऱ्या वाचून झाल्या होत्या. पु. ल. देशपांड्यांचे बटाट्याची चाळ वाचले होते. भा. रा. भागवतांचे फास्टर फेणे, रॉबिन हूड व त्याचे रंगेल सवंगडी वाचले योते. आनंद, छत्रप्रबोधन, आणि मराठी विज्ञान परिषदेची पत्रिका नियमित वाचवायचो. चांदोबा, चंपक, षटकार तर खूप आवडायचे. राशिंगकरांचे व्यक्तिमत्व विकासावरची पुस्तके वाचली होती. माझी थोरली आत्या डॉ. शकुंतला वायंगणकर व काका डॉ. प्रमोद वायंगणकर यांचेकडे आम्ही सर्व भावंडे उन्हाळ्याच्या सुटीत जात असू. त्यांच्याकडे मराठी पुस्तकांचे खूप चांगले कलेक्शन होते. त्यामुळे वाचन हा त्या सुटीमधला महत्त्वाचा कार्यक्रम असे.
एवढे वाचून देखील मराठी विषय काही आवडीचा बनला नाही. त्यामुळे असे झाले की, मला दहावीच्या पूर्वपरीक्षेत १०० पैकी ३९ गुण मिळाले आणि पालकांची पाचावर धारण बसली. निदान नापास होऊ नये इतके तरी मराठी मुलास यावे, ही इच्छा. त्यावेळेस मिरजेच्या कन्या महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री. विष्णू आपटे यांची शिकवणी मला माझ्या आईवडिलांनी लावली. रोज तासभर असे तीन आठवडे आपटे सरांच्या शिकवणीत मी होतो. पण त्या दोन-तीन आठवड्यात मराठीची कधीही न लक्षात आलेली अंगे माझ्या लक्षात आली. मराठीचे व्याकरण शिकण्यात मला गोडी वाटू लागली उदा. श आणि ष यांचे उच्चार नेमके वेगळे कसे हे कळाले. पण केवळ मराठीचा अभ्यास करावा हे तेव्हा शक्य नव्हते, तरीही मला ६९ गुण बोर्डाच्या परीक्षेत पडले आणि मराठीचा शैक्षणिक विषय म्हणून माझा संबंध कायमचा संपला.
पुढे अकरावी, बारावी आणि MBBS चे प्रथम वर्ष कसे गेले समजले नाही. MBBS चे दुसरे वर्ष उजाडले आणि आता वाचनास थोडी फुरसत मिळू लागली. सेकंड MBBS हे दीड वर्षाचे असते व चार विषय अभ्यासावयाचे असतात त्यामुळे खूप फावला वेळ मिळतो. सेकंड MBBS चा फावला वेळ आणि मुंबई शहर ही युती माझ्यातील वाचकाच्या भाग्योदयास फारच फलदायी ठरली. मुंबईत किंग्स सर्कल, फोर्ट भागात हरप्रकारची पुस्तके स्वस्त दारात मिळायची. दर वर्षी strand चा सेल लागायचा. मुंबईत इंग्रजी माध्यमात शिकलेले मित्र झाल्यामुळे इंग्रजी साहित्य कसे आस्वादावे हे कळू लागले. आर्चरच्या “not a penny more, not a penny less” पासून सुरु झालेला प्रवास दोन तीन महिन्यात तेवढेच डझन पुस्तके खरेदी करून आणि त्यातली निम्मी वाचून संपला.
आयुष्यात एवढे non-textual वाचन परत कधी जमले नाही आणि तेवढा फुरसतीच्या काळ देखील परत मिळाला नाही. पण या इंग्रजी वाचनाच्या तडाख्यात थोडेफार मराठी वाचनही जमून गेले. माझ्या सुदैवाने माझा रूम पार्टनर अमोल खोत हा दहावीत मराठीत कोल्हापूर विभागात प्रथम होता. त्यामुळे त्याच्याकडून देखील मराठीत वाचण्यासारखे काय आहे ते काळत गेले. मुख्यत्वे पु. ल. देशपांड्यांनी लिहिलेली सर्व पुस्तके आयडियल , दादर येथून विकत घेऊन त्यांचा फडशा पाडला. दुसऱ्या एका मित्राकडे असलेला “मराठीचा गाळीव इतिहास” हे पु. ल. यांनी लिहिलेले पुस्तक वाचले. त्या पुस्तकाचा विनोद आणि उपहास याहून अधिक मला मराठी भाषेच्या इतिहासाबद्दल उत्सुकता जाणवू लागली. पण ज्या पुस्तकाचे गाळप पु. ल. नी केले होते ते मूळ पुस्तक वाचावयास अजून एक दशक उलटावे लागले. कारण mbbs चे तिसरे वर्ष चालू झाले आणि अभ्यास परत मानगुटीवर बसला. आणि पुढे जेव्हा जेव्हा फावला वेळ मिळाला तो माझ्या कॉम्पुटरच्या वेडाने आणि नंतर मोबाईलने खाऊन टाकला. आणि माझे वाचन खुंटले.
आता मी वाचले तर nonfiction वाचतो. कादंबरी वाचून मला दोन दशके उलटली आहेत. माझ्या वाचनाच्या रुक्ष आणि तुसड्या अभिरुचीवर मला घरी टोमणे देखील खावे लागले आहेत.
पण या काळात मी इंटरनेट वर २००६ पासून ऍक्टिव्ह आहे. इंटरनेटने मला जेवढे मराठी शिकवले तेवढे इतर कोणत्याही शिक्षकाने शिकवले नाही. गूगल ने इतकी मराठी ज्ञानभांडारे माझ्यासाठी खुली केली आहेत की, “मला मराठीत विषयी जे काही तांत्रिक ज्ञान आले किंवा मराठीचा इतिहास काळाला तो गुगल नसते तर शक्यच नसता” असे म्हणणे वावगे ठरणार नाही,. आणि या प्रवासात माझा एका बालमित्राने, शंतनू बेडेकरने, माझी मदत केली. सुरवातीला मी नागपूरला असताना तो हैदराबाद ला होता. मी हैदराबाद ला गेल्यावर तो युरोपला गेला व मिरजेला आलयावर अमेरिकेला गेला व सध्या कॅनडा येथे राहतो. त्याने मला किंडल, गुडरीड्स, शिकागो युनिव्हर्सिटी चे DSAL पोर्टल, मायबोली पोर्टल, आणि काय काय दर्जेदार वाचावे हे कायम सुचवले. इंटरनेट नसते तर मला माझ्या मित्राबरोबर ही आदानप्रदान प्रक्रिया करताच आली नसती. मला उपयुक्त ठरलेली इंटरनेटवरची मराठीची साधने मी एका लेखात नमूद करून ठेवली आहेत.
मराठी लेखनाचे तंत्र मला कधीच अवगत नव्हते. जे लिहिले ते मागच्या चुका सुधारत व ठेचकाळत. कारण मराठी लेखनासाठी शालेय जीवनात केलेला आळस आणि नंतर मराठी विषयाचा तुटलेला संबंध. २०१६ मध्ये आवड म्हणून ट्विटर वर ऍक्टिव्ह झालो. तेव्हा फारच थोडे मराठी लोक त्यावर लिहीत त्यामानाने फेसबुक मराठी लेखकांनी समृद्ध होते. पण फेसबुक बोअर होऊ लागले होते. पण एकदा सुरवातीचे पाच सहा महिने लोटल्यावर माझ्या असे लक्षात आले की ट्विटरचा नेमकेपणा फेसबुकपेक्षा मोठा आहे, जे काही आहे ते १४० अक्षरांत लिहिण्याचा तेव्हा शिरस्ता होता. शिवाय त्याची संरचना अशी आहे की तुम्ही तुमच्या मित्रांच्या घोळक्यात न घुटमळता पूर्ण तिऱ्हाईत लोकांशी देखील विचारांची देवाणघेवाण करू शकता. अनेक लेखकांशी मी ट्विटर वर बोलू शकलो. अर्थात ट्विटरला या ओल्या बाजूबरोबर सुकी बाजू पण आहे ती निनावी खात्यांची आणि वादात गुरफटून टाकण्याची. पण थोडी सावधगिरी बाळगली तर माध्यम म्हणून विचार व्यक्त करण्यासाठी आणि विविध क्षेत्रातील मातब्बर लोकांशी लगेच संवाद साधण्यासाठी ते एक उत्कृष्ट माध्यम आहे.दोनेक वर्षाम्पूर्वी इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतले आणि त्याला स्वतः च्या मुलाचे नाव X दिले. असो. पण या समाजमाध्यमाच्या आवडीमुळे मी लिहिता झालो. माझे विचार मुक्तपणे प्रकट करू लागलो.त्याला अल्पसा का होईना पण प्रतिसाद मिळत गेला, तसे त्यावर लिहिणारे चांगले लोक कोण हे देखील कळू लागले. व्युत्पत्तीशास्त्राबद्दल (etymology) मला रस आहे. त्यामुळे हिंदी व्युत्पत्तीशास्त्रातील तज्ज्ञ काय लिहितात त्यातून शिकू लागलो. त्यांना प्रत्यक्ष शंका विचारू शकलो. हाच प्रत्यय मला माझ्या विषयात म्हणजे सर्जरीबाबत देखील आला आणि इतर आवडीच्या पण माझ्या व्यावसायिक नसलेल्या विषयांबाबत देखील म्हणजे संस्कृत, इतिहास, भाषांतरे, मिरज इत्यादि.
असेच एका रविवारी मी “मराठीचे नेमके वेगळेपण” या विषयावर एक ब्लॉग लिहिला व तो ट्विटरवर शेअर केला. तो दिवंगत लेखक डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी वाचला आणि आपल्या लेखक मित्रांशी तो शेअर केला. त्या एका लेखामुळे मी अनेक मराठी लेखकांच्या संपर्कात असा अपघाताने आलो. त्यामुळे मला अनेक लेखकांच्या उत्तमोत्तम पुस्तकांबाबत त्यामध्ये माहिती मिळत गेली. मराठी साहित्यक्षेत्र विस्तीर्ण आहे याची जाणीव झाली.
गेल्या वर्षभरापासून प्रत्येक समाजमाध्यमात स्वतःचे ए आय टूल पण समाविष्ट झाले आहे. त्यामुळे रिसर्च साठी खूप उपयोग होतोय त्याबरोबरच लेख लिहितानापण फायदा होतो. ए आय टूलने निर्मिलेली साहित्यकृती तशीच डकवणे हा वाङ्मयचौर्याचा तद्दन अभिनव मार्ग आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. त्याचा सांगाडा म्हणून खचित वापर करावा पण सजावट स्वतःच्या कलाकुसरीने करावी असे माझे ठाम मत आहे.
मराठीच्या भाषेच्या अनुषंगाने मी जे लिहिलेले त्यांच्या लिंक्ससह खाली यादी दिली आहे. निळ्या शब्दांवर टिचकी मारा तो लेख इंटरनेट ब्राउजर (क्रोम किंवा तत्सम) मध्ये उघडेल
२. श्व अनुलोप ही भाषाशास्त्रीय संकल्पना समजून घेताना केलेली धडपड व त्यातून मला आलेला अनुभव
३. मराठी विज्ञान लेखन याविषयावर लेख
४. डॉ. नीलिमा गुंडी यांचे वसंत व्याख्यानमालेत भाषण ऐकून त्यावर लिहिलेली प्रतिक्रिया

Leave a Reply