जागतिक पुस्तक दिवस

आज २३ एप्रिल , प्रख्यात इंग्रज कवी, लेखक, नाटककार विल्यम शेक्स्पीयर, यांचे याच दिवशी १६१६ साली निधन झाले. काही लोक त्यांची जन्मतारीख २३ एप्रिलच गृहीत धरतात; पण त्याला ठोस पुरावा नाही असे विकिपीडिया सांगते ( आज तरी!). तब्बल ३९ नाटके, १५४ सुनीते (सॉनेट्स) व इतर विपुल साहित्य यांचा लेखक! त्याचे स्मरण ठेऊन याच दिवशी जागतिक पुस्तक व मुद्रणाधिकार दिवस म्हणून दर वर्षी युनेस्को १९९५ पासून हा दिवस साजरा करते. लोकांनी अधिकाधिक वाचावे व लिहावे व पुस्तके प्रकाशित करावीत हा यामागील हेतू.

तसे भारतात वैदिक साहित्य मौखिक गुरुशिष्य परंपरेने हजारो वर्षे जतन करून ठेवले आहे. सुमेरियन व सरस्वती संस्कृतीतील लोकांना लिपी अवगत होती तशीच ती इजिप्शन लोकांना देखील होती. पूर्वी मातीच्या पाट्या करून त्यावर मजकूर लिहायचे. नंतर दगडात कोरून शिलालेख लिहायचे त्यानंतर इजिप्त मध्ये पापायरस (पेपर शब्दाचे मूळ) व आपल्याकडे भूर्जपत्रावर लेखन कला विकसित झाली. ताम्रपट देखील वापरात येऊ लागले. ही भूर्जपत्रे एकत्र वस्त्रात गाठ बांधून ठेवली की त्याचा ग्रंथ (गाठ बांधलेला) होतो. मग पुढे जाऊन कापड व भूर्जपत्रे यांच्या ऐवजी पर्याय कागदाचा शोध लागला व पुस्तकांचा टिकावू पणा वाढला. पण या सर्व प्रगतीत प्रत्येक वेळीस नव्याने लिहावे लागे त्यामुळे ही प्रक्रिया किचकट होती. पण अशा किचकट प्रक्रियेत देखील आपल्या पूर्वजांनी अनेक महत्त्वाचे ग्रंथ जपून ठेवले मग अगदी नालंदाचे विश्वविद्यालय असो किंवा होमरचे ग्रीक साहित्य, अरीस्टोटल प्लेटो इत्यादींचे तत्वज्ञान असो किंवा सुश्रुत, चरक, वाग्भट यांच्या संहिता! ज्ञानेश्वर माउलींच्या भावार्थदीपिकेपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रापर्यंत ही सगळी साहित्यसंपदा छापखान्या शिवाय जपून ठेवणे यासाठी खरोखरीच जुन्या पिढीचे कौतुक करावेसे वाटते.

गुटेनबर्ग ने यूरोप मध्ये छापखान्याचा शोध लावला व पवित्र बायबल हे इंग्रजीतले पहिले छापील पुस्तक ठरले. नंतर १६व्या शतकापासून युरोपचे सांस्कृतिक पुनरुज्जीवन झाले व युरोपियन लोकांनी वसाहती करून मिळवलेल्या पैश्यावर औद्योगिक क्रांती घडवून आणली. त्यातूनच १८ व १९ व्या शतकात वर्तमानपत्रे, व नियतकालिके तयार होऊ लागली. १८०५ मध्ये मिरज येथे पटवर्धन सरकारांनी छापलेली श्रीमद्भगवद्गीता हे पहिले संस्कृत व देवनागरी छापील पुस्तक ठरले. त्यानंतर अनेक मराठी छापील पुस्तके तयार होऊ लागली. सर्व धार्मिक पुस्तके आदरणीय आहेत. तथापि त्यांचा सविस्तर विचार सदर लेखाच्या आवाक्याबाहेरचा आहे.

पुस्तकातून ज्ञानप्रसाराबरोबर इंग्रजविरोधी साहित्य पसरवले जाऊ शकते याची पूर्ण दखल घेतली होती. १९व्या शतकातील प्रत्येक मराठी छापील पुस्तकाच्या सुरवातीला हमखास छापलेले “हें पुस्तक सन १८६७ च्या आक्टाप्रमाणे नोंदिले असून सर्व हक्क स्वाधीन ठेविले आहेत.” हे वाक्य कॉपीराईट(मुद्रणाधिकार) हा प्रकार किती जुना आहे याची व इंग्रजांच्या पुस्तकांवर करडी नजर ठेवायच्या धोरणाची साक्ष देते. त्यात वाङ्मय चौर्य काबूत ठेवण्याची क्षमता होती. पण नाण्याची दुसरी बाजू म्हणजे पुस्तक सिद्ध करणे, छापणे हे निवडक प्रकाशक व मुद्रक यांची मक्तेदारी बनली. तसेच त्या काळात हा प्रकार तौलनिकतया फार खर्चिक होता. त्यामुळे गावोगावी वाचनालये (लायब्ररी) निघाली व पुस्तक वर्गणीवर वाचता येऊ लागले.

जसजसे तंत्रज्ञान प्रगत होत गेले छपाई अधिक सुबक झाली. पैसे वाचवण्यासाठी हार्डबाऊंड ऐवजी पेपरबॅक सारखे पर्याय झाले. कम्प्युटराइज्ड डेस्कटॉप पब्लिशिंगने कॉम्पोझिटर हा हुद्दा नामशेष केला. पण हे करता करता वाङ्मयचौर्य सोपे झाले. ऑफसेट प्रिंटिंग मुळे वेगाने छपाई करता येऊ लागली, झेरॉक्स च्या जादूने छापील पुस्तके पाहिजे तेवढाच भाग, फाँट व गडदपणा कमी जास्त करून हवा तेवढ्याच प्रति काढता येऊ लागल्या. पण त्यामुळे लेखक व प्रकाशक पैसे न कमावता झेरॉक्स सेंटर वाला कमावू लागला. सामान्य वाचकास काय? एकदा स्वस्तात सोय झाली हे महत्त्वाचे. २१ वे शतक उगवले व इंटरनेट ‘सर्वदूर’ (खास २१व्या शतकातील मराठी शब्द) पसरले. मोबाईल रुपी ते प्रत्येकाच्या खिशात विसावले. पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट हा प्रकार छपाईसाठी सोयीस्कर ठरावा म्हणून शोधणाऱ्या तंत्रज्ञाना पुढे जाऊन तो कॉपीराईट चा कर्दनकाळ ठरेल याची पुसटशी कल्पनाही नसेल. पण व्हाट्सअप व टेलिग्राम ने PDF वाटप बोटाच्या टिचकीवर आणून ठेवले. त्यामुळे लेखकमंडळी व प्रकाशकही विचार करू लागले. कायदेशीर लढा तर लढले पण त्याबरोबर अमेझॉन किंडल सारखे ईबुक माध्यम देखील तयार केले, जेणेकरून वाचकाची ज्ञानपिपासा शमेल व लेखकाचे आर्थिक नुकसानही होणार नाही. पण इंटरनेटबद्दल वाईटच का बोला? चांगले पण बरेच आहे. आता इंटरनेटबद्दल चांगले बोलू.

इंटरनेट वर १. गूगल बुक्स २. इंटरनेट अर्काइव्ह ३. शोधगंगा ४. नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया ही संकेतस्थळे तुम्ही जर पुस्तकवेडे असाल तर तुम्ही नक्कीच पाहा. त्यावर कॉपीराईट संपलेली सर्व पुस्तके मुक्तपणे उपलब्ध आहेत. आता आपण संवदतोय ते माध्यम म्हणजे इंटरनेटच नाही का?

व्हाट्सअप टेलिग्राम भले वाङ्मयचोरांनी बोकाळलेले असो त्यावरच लेखक, रसिक व सामान्यजन वाङ्मय चर्चा करतायत. फेसबुक व इतर समाज माध्यमांनी लेखनाचे लोकशाहीकरण केलय. Goodreads सारखे पुस्तक प्रेमिंचे समजमाध्यम आहे. Let’s read India सारखी चळवळ वाचन प्रोत्साहन देतेय. बुकगंगा मराठी साहित्याला वाव देतय. फार दूर काय, आमच्या शेजारच्याच मालगाव गावातील तरुणांनी चालवलेले वॉल्डन बुक डेपो म्हणून फेसबुक पेज आहे त्यावर अनेक दुर्मिळ मराठी पुस्तकेही मिळतात. तुम्ही पत्ता दिला ऑनलाईन पेमेंट केले तर घरपोच येतात. असाच एक गठ्ठा माझ्याकडे एकदा आला. तो गठ्ठा आता माझा कॅनडा मध्ये स्थायिक मित्र सुटीत आला की घेऊन जाईल. कॅनडा येथे तो मराठी वाचनालय चालवतोय.

इंटरनेट ने जसे साहित्याचे लोकशाहीकरण केले तसा उपलब्ध असणाऱ्या माहीतिचा विस्फोट देखील घडवला. विकिपीडिया तर माणसांनी रचलेला भला मोठा ज्ञानकोश आहे. मराठी व इतर भारतीय भाषांतील सर्व शब्दकोष युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो च्या संकेतस्थळावर मोफत उपलब्ध आहेत. महाराष्ट्र शासनाचे मराठी संचानालय अनेक चांगली पुस्तके उपलब्ध करून देतय. भारतातील सर्व विद्यापीठातील सर्व शोधप्रबंध शोधगंगेवर मिळतात. इंग्रजीत ज्यास ‘Problem of Plenty’ म्हणतात ती अवस्था आहे. पण या सगळ्यात मुख्य प्रवाहातील भरणा अधिक असतो त्यामुळे माझी सर्व ग्रंथालयांना विनंती आहे की त्यांच्यादे दुर्मिळ व स्थानिक लेखकांनी लिहिलेली पुस्तके असतील तर अवश्य डिजिटाईझ करावी. मराठीची फार मोठी सेवा होईल.

समाज माध्यमांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मूळ लेखकाशी तुम्ही थेट संवाद साधू शकता. दहावीनंतर शैक्षणिक मराठीशी संबंध तुटूनही केवळ औत्सुक्यामुळे इंटरनेटमुळे मी मराठीच्या अनेक लेखक, लेखीकांशी संवाद साधू शकलो व माझे मराठी सुधारू शकलो. हिंदी व्याकरणकार व भाषातज्ज्ञ डॉ. सुरेश पंत यांच्याशी असो किंवा मराठी लेखक डॉ. शंतनू अभ्यंकर असोत किंवा गोष्ट पैसापाण्याची लिहिणारे श्री. प्रफुल्ल वानखेडे असोत ट्विटर या समाजमाध्यमामुळे त्यांच्याशी थेट संवाद साधता आला. डॉ. नीती बडवे, डॉ. सुधीर राशिंगकर यांच्याशी देखील असाच समाजमाध्यमाद्वारे संपर्क साधता आला. इंग्रजी लेखकांमध्ये डॉ. उदय कुलकर्णी, डॉ. संजीव सन्याल, डॉ. डालरिम्पल यांना त्यांच्या पुस्तकाचे अभिप्राय थेट कळवू शकलो. विसाव्या शतकात हे केवळ पोस्टाद्वारेच शक्य असे व लेखकांपार्यंत आपण पोचतोय का याची शाश्वती नसे. मायबोली नावाचे मोठे पोर्टल मराठीची वाङ्मयसेवा दोन दशकांहून अधिक काळ करतय. पुस्तकप्रेमिंच्या दोन व्हाट्सअप ग्रुप मध्ये मी सदस्य आहे, त्यांत सक्रिय नसलो तरी मला माहिती खूप मिळते व खूप शिकण्यास मिळते. अतिमाहितीच्या गदारोळात अशी निवडक व वेचक (curetted) माहिती व अभ्यासू परीक्षणे मिळणे हे ही खूप महत्त्वाचे! आणि रसग्रहण शिकल्यावर पुस्तक वाचताना अधिक पोक्तपणा येतो.


इंटरनेट बाबत बोलताना एक गोष्ट अवश्य नमूद करावीशी वाटते; सध्या युट्युब व इंस्टाग्राम या दृक्श्राव्य माध्यमांची चलती आहे. त्यामुळे पुस्तकांची चर्चा तिथेही रंगते. पॉडकास्ट हा अभिवाचनाचाच प्रकार झालाय, काहींना पुस्तके वाचण्यापेक्षा ऐकणे आवडणे त्यांच्यासाठी तर तो खूप उपयोगी.

पुस्तके नीट बाळगावीत यासाठी मेहनतही लागते. अशावेळेस आता गुडरीडस किंवा माय लायब्ररी सारखी मोबाईल ऍप आहेत जी वापरून पुस्तकांचे तुम्ही जलद कॅटलॉगिंग करू शकता.

काही लोक पुस्तके वाचण्यापेक्षा त्यांचा वापर आपल्या दिवाणखान्याची शोभा वाढवण्यासाठी करतात म्हणजे लोकांना वाटावं “अबब! किती ते वाचन!”. आणखी एक प्रकार म्हणजे ‘त्सुनदोकू’ : खंडीभर ग्रंथ जमवायचे व मोजकेच वाचायचे. हे लोक पुस्तकप्रेमी असतात पण काय आणि किती किती वाचू असे त्यांना होते.

वाचनाच्या तऱ्हा , अधोरेखन करणे, टिपणे काढणे , नंतर मला आवडलेली पुस्तके यावर लिहीत बसलो तर दिवस पुरायचा नाही. त्यामुळे इथेच थांबतो! वाचक म्हणून मला वाचनाचा आनंद देणाऱ्या सर्व लेखकांचे आभार. माझी स्वतःची लेखक म्हणून कामगिरी म्हटल्यास, दोन वैद्यकीय शोधनिबंध आणि काही स्फुट लेख; या ब्लॉगवरचे लेख व अनेक ट्विट्स सोडल्यास फारशी नाही. पण एखादे तरी पुस्तक आपण लिहावे ही इच्छा जरूर आहे.

पुस्तक दिनाच्या पुनश्च शुभेच्छा! वाचत राहा, लिहा, टिपणे काढा, लेखकास अभिप्राय अवश्य कळवा आणि वाङ्मय चौर्य रोखा.

डॉ. सुधन्वा रा. पाठक
मिरज
२३-४-२०२३


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*