एका विवेचनाचे विश्लेषण
‘छद्मवैद्यक आणि आम्ही भारतीय लोक’ या विषयावर डॉ. शंतनू अभ्यंकर यांचे व्याख्यान आज ऐकण्यास गेलो होतो. या वर्षीच्या वसंत व्याख्यानमालेतील दहावे पुष्प.
इतके दिवस वाईचे एक ख्यातकीर्त स्त्रीआरोग्य तज्ज्ञ , रॅशनॅलिस्ट, व साहित्यिक अशीच त्यांची मला असलेली ओळख, तसेच ट्विटर वर थोडेफार वैचारिक आदानप्रदान झालेले होते. पण आज कार्यक्रमाच्या सुरवातीला मिरज विद्यार्थी संघाचे तरुण कार्यकर्ते व पर्यावरणसंवर्धक हिमांशू लेले यांनी त्यांच्या उत्कृष्टपणे करून दिलेल्या परिचयात काही नवीन बाबी समजल्या : त्यात सर्वात आश्चर्याचे म्हणजे ते स्वतः होमियोपॅथी विषयाचे पदवीधर आहेत, ही गोष्ट नवीन होती.
वातावरण थोडे पावसाळी होते पण सुदैवाने पाऊस पडला नाही त्यामुळे खरे मंदिराच्या प्रांगणात हे ‘विवेचन’ ऐकता आले. अर्थात वरील स्त्रीआरोग्य (स्त्रीरोग या बदली ) आणि विवेचन(व्याख्यानास बदली) हे शब्द वक्त्यांचे स्वतःचे.
या विवेचनाच्या अध्यक्षस्थानी प्रो. श्री. अनिल आगाशे होते.
पूर्वपीठिका
विवेचन सुरु झाल्यावर प्रथमतः डॉक्टरांनी संयोजकांचे आभार व्यक्त केले, त्या औपचारिकतेनंतर विषय सुरु करताना एक पूर्वपीठिका तयार केली. डॉक्टर अभ्यंकर हे स्वतः होमियोपॅथी औपचारिक पणे महाविद्यालात शिकलेले आहेत आहेत त्यामुळे ‘तुम्हाला त्यातलं काय कळतंय?’ हा प्रश्नच खुडून काढला. त्यांनी हे ही स्पष्ट केले की छद्मविज्ञान हे देश, काळ, आणि पॅथी या तिन्हीना पुरून उरले आहे, पण ते प्रामुख्याने आधुनिक विज्ञानाशी तुलना करताना छद्मविज्ञानाची उदाहरणे घेताना ते होमियोपॅथी निवडतायत कारण होमियोपॅथी त्यांनी अभ्यसली आहे व त्याचा एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून ते वापर करणार आहेत.
माणूस पटकन छद्मविज्ञानाचा स्वीकार का करतो याचे विवेचन
भाषणात डॉ. अभ्यंकरांनी माणसाच्या या सवयीमागे मानवी मेंदुची दोन लक्षणे सांगितली आहेत. प्रथम म्हणजे उत्क्रांतीने जीवरक्षण सर्वप्रथम याला प्राधान्य दिल्याने ज्या गोष्टी केल्याने जीव वाचायची शक्यता अधिक अशा कृती माणूस करतो त्यामुळे तार्किक विचार न करता ‘बाबा वाक्यंम प्रमाणं ‘ याला मानवी मेंदू कायम प्राधान्य देतो. थोरांचे, म्हणजे लहानपणी आई वडलांचे व मोठेपणी पुढाऱ्यांचे ऐकल्याने फायदाच होतो ही कल्पना आदिम काळापासून मानवी मेंदूवर कोरली गेली आहे व बव्हंशी खरी आहे. तसेच समजा एक माणूस रात्रीच्या अंधारात चालतो आहे आणि झाडीत हालचाल जाणवली तर माणसाची पहिली प्रतिक्रिया तेथून थेट न जाता दुरून पळून जाऊन जीव वाचवायची असते, न की ती हालचाल नेमक्या कोणत्या श्वापदाची आहे याचा शोध लावण्याची. यालाच पटकन बचावात्मक निर्णय घेणे याची मेंदूची क्षमता म्हणतात. नेमक्या या दोन कारणांनी मेंदू तत्पर निर्णय घेताना रॅशनल म्हणजे विवेकी निर्णय घेईलच असे नाही. म्हणजे डॉ. अभ्यंकर म्हणतात ‘मुळात मानवी मेंदू विवेकी विचारासाठी तयार झालेला नाही’ .
छद्मविज्ञान भडक दावे का करु शकते याचे विवेचन
१. आधुनिक विज्ञानात कोणतेही नवीन औषध किंवा प्रक्रिया आणायची असेल तर सुरुवातीला प्रयोग करावे लागतात. असे सिद्ध करावे लागते की या अमुक गोष्टीने पडलेला फरक हा खरोखरीच खरा फरक आहे आणि निव्वळ योगायोग नाही. एखादे औषध बाजारात जरी आले तरी त्याचे विपणन पश्चात निरीक्षण चालूच असते व काही वावगे परिणाम आढळले तर त्वरित ते औषध बाजारातून काढून घेतले जाते. थोडक्यात पुराव्यासह सिद्ध केल्याशिवाय कोणताही उपचार मार्केट ( जाहिरातबाजी व विपणन) करता येत नाही. याविरुद्ध भारतीय कायद्यांच्या चौकटीनुसार पर्यायी उपचार पद्धतीना हा निकष नसतो. त्यात फक्त एकच गरज असते की त्या वैद्यकाच्या प्रमाण ग्रंथात त्या औषधाचा उल्लेख हवा. त्यामुळे ही अनफेअर रेस ठरते. तसेच छद्म वैद्यक पुड्या बांधून कन्टेन्ट न लिहून औषधे देऊ शकतात हा अनिर्बंधपणा आधुनिक वैद्यकाच्या वाट्यास नाही त्यामुळे आधुनिक वैद्यकाची औषधे पर्यायी म्हणून बांधली तर काय आश्चर्य. हेच सर्वांत मोठे कारण छद्मविज्ञान फोफावण्याचे आहे.
२. साईड इफेक्ट्स म्हणजे औषधाचे दुष्परिणाम याबाबत आधुनिक वैद्यक प्रांजळ असते व ते मान्य करते याउलट छद्म विज्ञान असा दावा करू शकते की आमच्या उपचारांना साईड इफेक्ट्स नाही. पण ज्याचा इफेक्ट हाच मुळी तर्कदुष्ट व प्लासिबो स्वरूपाचा आहे त्याचा साईड इफेक्ट होणेची शक्यता शास्त्रीय दृष्ट्या देखील कमी असते. पण साईड इफेक्ट्स ची भीती नसणे हा लोकांना मोठा मुद्दा वाटतो.
३. जुनाट व आधुनिक वैद्यकाने न बरे होणारे आजार यांवरच छद्मवैद्यकांचा भर असतो. तसेच या आजारांचा उपचार करताना आधुनिक औषधे चालूच ठेवा असा सल्ला असतो. त्यामुळे यश आले की त्याचे पितृत्व आमचे व अपयश आले तर मुळातच असाध्यपणाचा बाऊ केल्याने अपेक्षा कमी व अगदीच विचारले तर खापर फोडायला आधुनिक वैद्यकी आहेच.
४. पेशंटची लक्षणे पेशंटला पूर्ण वेळ देऊन ऐकणे यामुळे पेशंटला बरे वाटते त्यामुळे मनोकायिक आजार लगेच बरे होतात. सहसा असे आढळते की गर्दीमुळे आधुनिक वैद्यक तज्ज्ञ पुरेसा वेळ पेशंटला देत नाहीत.
५. Holistic approach हे छद्म वैद्यक लोकांचे आवडते वाक्य असते, आधुनिक वैद्यक देखील कसे holistic असते असे डॉक्टरांनी व्यवस्थित समजावले.
६ आधुनिक वैद्यकात अनेक लोकांवर प्रयोग आणि सांखिकिक परिणामकता याला महत्त्व असते तर छद्म विज्ञानाच्यासाठी बरे झालेल्या रुग्णाचे testimonial किंवा anecdotal evidence पुरेसा असतो.
७. डॉक्टर मी का तुम्ही? हा प्रश्न छद्मवैद्यकात हमखास विचारला जाऊ शकतो पण आधुनिक वैद्यकात असे विचारणे कमी होऊ लागले आहे.
८. शरीर रचना, शरीरक्रिया, जीवरारसायान या शास्त्रीय दृष्ट्या भिन्न असूच शकत नाहीत, जसे भारताचे दोन नकाशे असू शकत नाही पण छद्मवैद्यकात स्वतःची वेगळी शरीरक्रिया शिकवली जाते.
९. अज्ञानाचे अस्तित्व मानणे हा विज्ञानाचा मोठा गुण आहे, छद्मवैद्यकात सर्वज्ञपणाचा दावा आहे.
समन्वयसाधू बोके
आधुनिक वैद्यक आणि छद्म वैद्यक वादामध्ये तीन पक्ष आहेत असे डॉक्टरांचे प्रतिपादन होते. पहिला छद्मवैद्यक लोकांचा पक्ष ज्यात ते दावा करतात की आमच्या पॅथी ला वैज्ञानिक निकषांवर बसवायची गरज नाही, कारण तुमचे विज्ञान सध्या इतके तोकडे आहे की तुमचे विज्ञान प्रगत झाल्यावर त्याला कळेल. दुसरा पक्ष पॅथी वगैरे काही नसते फक्त आधुनिक वैद्यक हे खरे वैद्यक असून इतर पॅथी ही फॅड्स आहेत त्यामुळे ती छद्मी असून त्वरित बंद केली पाहिजेत. तिसरा पक्ष अशा लोकांचा असतो की जे म्हणतात की तुम्ही दोघे बरोबर आहात, पेशंटना त्यांना काय हवे ते ठरवू द्यात. डॉ. अभ्यंकर या तिसऱ्या गटाची समन्वयसाधू बोके अशी टिंगल करतात कारण त्यांच्या अशा स्टँड मुळे विज्ञानिष्ठा व पेशंटहित दोन्ही साधत नाही पण अशा मंडळींना वाईटपणा देखील येत नाही. अशास्त्रीय, अप्रभावी उपचारांनी रोग बळवणे, अपुरा उपचार होणे व साईड इफेक्ट ने धोका होणे हे होते हे लोकांनी लक्षात घेतले पाहिजे.
विज्ञानाचं ठेचकळणे
कोव्हिड काळात, आधुनिक वैद्यकाच्या बदलत्या गाइडलाईन्स चा गोंधळ अख्ख्या जगाने पहिला, बऱ्याच लोकांना त्यातली अशाश्वतपणा खटकला. पण डॉ. अभ्यंकर यांनी त्यालाच नित्यनवे राहण्यासाठी गरज असे समजावले, व असेही सांगितले की विज्ञान चूक मान्य करते अशा ठेचा लागल्यावर त्यातून शिकते व सावरत पुढे जाते त्यामुळेच अशास्त्रीय गोष्टींचा त्याग होऊन परिणामकारक उपाय जसे इन्सुलिन इ. यांचा शोध लागू शकला. अशा प्रगतीमुळे सर्वसाधारण आयुष्मान सुधारले, बालमृत्यू कमी झाले. विज्ञानाचा प्रवास असाच आहे, त्यात अजूनही अनेक गोष्टी प्रकशात न येता काजळकोपऱ्यात दडलेल्या आहेत. हे काजळकोपरेच छद्मविज्ञानाचे आवडते विषय आहेत, जसे जसे हे काजळकोपरे विज्ञानाच्या पूर्ण उजेडात येतील तसतसे लोकच छद्मविज्ञानाचे तेथील स्तोम कमी करतील त्यासाठी त्यांनी एडस् च्या उपचारांचे उदाहरण दिले
शासनाच्या धोरणाबाबत
डॉ. अभ्यंकर असे म्हणाले की शासन आयुष डॉक्टरांना आवश्यक वैद्यकीय मनुष्यबळ म्हणून पाहते. देशात आधीच आधुनिक वैद्यक तज्ज्ञांचा तुटवडा आहे, त्यामुळे हे मनुष्यबळ जे खेडोपाडी दुर्गम भागांत देखील पोहचते त्यास उत्तेजन देण्याची सरकारची भूमिका आहे.
भाषणाचे इतर पैलू
डॉ. अभ्यंकर यांनी जवळजवळ सर्व technical jargon साठी सुटसुटीत मराठी शब्द वापरले हे खरोखरीच वाखाणण्यासारखे आहे. कोणतेही वाक्य संदर्भरहित अटकळ नव्हती. भाषेची फेक देखील प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी होती, नर्मविनोद विषयाचे गांभीर्य कमी होऊ न देता वापरला होता आणि शेवटी श्रोत्यांच्या प्रश्र्नास उत्तरही दिले. एका तासात पाल्हाळ न लावता नेमके मुद्द्यास धरून केलेले भाषण असे म्हणता येईल.
डॉ. प्रियदर्शिनी नेने यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
माझे विचार
आतापर्यंत मी डॉक्टरांनी केलेल्या विवेचनाचा गोशवरा सादर केला. आता त्यावर व एकंदरित या विषयावर थोडे मतप्रदर्शन करतो.
१. EBM पुराव्यावर आधारलेले वैद्यक ही कल्पना तशी १९७०-८० च्या दशकातील, त्याआधी जे होते ते Eminence based medicine म्हणजे वैद्यक क्षेत्रातील दादा लोक जे धोरण ठरवतील ते त्यांची शिष्यमंडळी पुढे राबवत. डॉक्टरांचे म्हणणे असे आहे की आधुनिक वैद्यकाने आता EBM चा स्वीकार केला आहे. पण माझे म्हणणे असे आहे की वैद्यकाची theory पुराव्यावर उभी आहे पण execution of helath care अजूनही Eminence बेस्ड आहे, सुदैवाने बहुतेक eminent लोक evidence वर विश्वास ठेवतात म्हणून EBM तगले आहे. त्यामुळे Eminence हा आधुनिक वैद्यकात वगळता येत नाही.
२. EBM च्या बाबी प्रॅक्टिस मध्ये आणताना त्यातील गृहितके ताडून पाहिली पाहिजेत त्यासाठी p value, sample size, types of error ह्या आणि इतर संकल्पना मुळात विद्यार्थ्यांना माहिती हव्यात, तसेच caveats (अटी व शर्ती लागू) चा विचार करणे उदा. युरोप,अमेरिकेतील किमती आणि भारतातल्या किमती वेगळ्या असतात. गोळी, इंजेक्शन एकाच प्रमाणाचे जगभर उपलब्ध असते पण व्यक्तीसापेक्ष प्रक्रिया (subjective intervention) असेल तर करणाऱ्याचा अनुभव व कौशल्य हे देखील लक्षात घेतले पाहिजे. आपण क्लिनिशन आहोत, निव्वळ सांखिकी तज्ज्ञ नाही याचे भान विद्यार्थ्यांमध्ये राखून या सर्व गोष्टी शिकवल्या गेल्या पाहिजेत. कदाचित सर्वसामान्य श्रोत्यांच्या पुढे या गोष्टींचा उल्लेख केला असता तर भाषणास पूरक ठरले असते असे मला वाटते.
३. आता समन्वयसाधू बोका हे बिरूद मिळवण्याचा धोका पत्करून काही सांगतो. भारतातील विद्यापीठ डिग्री प्राप्त व नोंदणीकृत आयुष (AYUSH ayurved yoga unani siddha homeopathy) डॉक्टरांची संख्या खूप आहे या सर्वांना सरसकट छद्मी म्हणणे चुकीचे वाटते. (डॉ. अभ्यंकर यांनी असे थेट विधान काल केले नाही). कारण भारत सरकारनेच त्यांना डॉक्टर हे बिरुद लावायचा अधिकार आणि पेशंट तपासायचा अधिकार दिला आहे.
त्यांच्या आधुनिक विज्ञानाच्या उपचारांचा वापर करण्यावर बंदी घाला म्हणणे म्हणजे त्यांना विज्ञाननिष्ठ वैद्यक हाताळायला बंदी करणे होय. त्यांनी खेडोपाडी दुर्गम भागात आधुनिक उपचार पोचवले आहेत त्यामुळे त्यांचे योगदान अव्हेरणे हेही चुकीचे आहे. त्यांना त्यापेक्षा ३-४ महिन्याचा ब्रीज कोर्स न देता व्यवस्थित तीन वर्षाचे प्रशिक्षण देऊन MBBS ला बसण्याची मुभा द्यावी. त्याही पुढे जाऊन मी म्हणेन भविष्यात आयुष फक्त postgraduate level ला ठेवावे व एमबीबीएस कम्पल्सरी करावे. म्हणजे आयुष मध्ये संशोधन वाढेल आणि हे pathy युद्ध थांबेल. म्हणजे आयुष चा वापर आधुनिक वैद्यकाच्या प्रॅक्टिसची मुभा मिळवायचा पर्यायी मार्ग न राहता, खरोखरी आयुष प्रेमीच त्यात शिरतील. थोडक्यात forking>>>bridging. विद्यार्थ्यांची प्रतारणा थांबवण्यासाठी हे करावे लागेल.
मतभेद आहेत व ते प्रगट व्हावेत पण हे होताना आधुनिक वैद्यक चा डॉक्टर विरुद्ध आयुष्य चा डॉक्टर असे व्यक्तिगत भांडण असे स्वरूप त्यास येऊ नये. pathy युद्ध झाले तर काही साध्य तर होत नाही, डॉक्टरांमध्ये दुही येते आणि पेशंट लोकांचा गोंधळ होतो. त्यामुळे वेगवेगळ्या pathy चे कोर्स सरकारने भविष्यात फक्त स्नातकोत्तर अभ्यासासाठी ठेवावेत.
४. AYUSH ला काही सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, राष्ट्रीय संदर्भ आहेत जे आधुनिक वैद्यकास सध्याच्या काळात नाहीत. बऱ्याच वेळा त्यावर होणारी टीका ideology मुळे या संदर्भातील बाबींवर जो रोष व पूर्वग्रह त्यातून होते. आणि असेही घडते जेव्हा त्यातील चुकीच्या वाटणाऱ्या बाबी एखादा आधुनिक वैद्यक डॉक्टर सांगत असतो तर त्यास या संदर्भांचा दुस्वास असे चित्र रंगवून विषयांतर केले जाते. त्यामुळे हा उहापोह होताना या संदर्भांच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे व कालच्या विवेचनात ते भान राखल्याचे जाणवले.
५. आयुर्वेदाचे एक प्राध्यापक डॉ पटवर्धन यांनी नुकताच ट्विटर वर एक thread लिहिला होता https://twitter.com/Kishor_Ayu/status/1655839382002372613?t=8yWlodtO2dz9u-8JZl1lyg&s=19 तो नक्कीच वाचनीय आहे, व आयुर्वेदात शास्त्रीय पद्धतीने कसे संशोधन करता येते याचा उत्तम नमुना आहे. पण आधुनिक वैद्यकाचा माणूस आयुष वर काही असेच बोलला असता व समन्वयाचा सूर काढत असता तर लगेच त्याला सोयीस्कर भुमिकावादी म्हणायचे का?
६. अप्रिय कठोर तत्वे जी शास्त्रीय आहेत अशी बोलण्यासाठी धारिष्ट्य लागते. लोकांची मने दुखावतात कधी कधी व्यक्तिगत टीका ही होते. गोड गोड बोलून हलक्या फुलक्या पद्धतीने गोंजारत विषय मांडून आणखी टाळ्या व कौतुक खेचता आले असते. पण तो मार्ग डॉ. अभ्यंकर यांनी पोलिटिकल करेक्टनेस चा मार्ग निवडला नाही.
Note to myself : स्वयंबोध
डॉक्टरने आपणास कनवाळूपणे पाहावे (with empathy) ही प्रत्येक रुग्णाची रास्त अपेक्षा असते पण त्याला मिळणारी वैद्यकीय सेवा जर परिणामकारक व सुरक्षित नसेल तर तो कनवाळूपणा फोल आहे हा प्रामाणिकपणा महत्त्वाचा. आणि हाच प्रामाणिकपणा डॉक्टर पेशंट नात्याचा पाया आहे असे मला वाटते. तो नसेल तर ती पेशंटची प्रतारणा आहे आणि तो प्रामाणिकपणा टिकवणे माझे कर्तव्य आहे.

वा हा गोशवारा आणि त्यावरची तुझी टिप्पणी, संयमीच
खूप खूप धन्यवाद