एक जाणीव समृद्ध करणारा अनुभव
सनाथ चा माहेरवाशिणी मेळावा
उन्हाळ्याची सुट्टी लागली की मुलांची ओढ लागते मामाच्या गावाला जायची. मग त्या मुलांबरोबर त्यांच्या आयांना देखील माहेरपण अनुभवायला मिळते. तेवढीच त्यांना वर्षभाराच्या संसाराच्या दगदगीतून थोडीशी विश्रांती. त्यामुळे माहेरवाशिणी या शब्दाला आणि या माहेरवासाला भारतीय आणि विशेषतः महाराष्ट्राच्या संस्कृतीत एक वेगळे आपुलकीची ऊब असलेले महत्त्व आहे. पण सगळ्याच मुलींना एवढे भाग्य नसते. थोडा विचार करून पाहा की ज्यांच बालपण अनाथालय, निराधार वसतिगृह, बालसुधारगृह अशा ठिकाणी गेलंय त्यांनी कोणत्या माहेराला जायचे? सुदैवाने अशा मुली व महिला संख्येने कमी आहेत पण त्यांची ही सल सहजगत्या तिऱ्हाइतास उमगण्याजोगी नाही. पण महाराष्ट्रातील अशा सर्व माहेरवाशिणींना एकवटून मागील वर्षी गायत्री व तिचा नवरा माझा वर्गमित्र वैभव पटवर्धन यांच्या सनाथ संस्थेने माहेर मेळावा दापोली जवळ आयोजित केलेला होता. त्याला लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून ह्याही वर्षी सनाथ संस्थेने हा मेळावा आयोजित केलेला होता.
गेल्या आठवड्यात मला गायत्री पाठक-पटवर्धन हिने सनाथ संस्थेद्वारे आयोजित केलेल्या महेर मेळाव्याच्या सांगता समारंभास अतिथी म्हणून आमंत्रित केले होते. मेळाव्याच्या व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.सुनीलकुमार लवटे, प्रमुख पाहुणे डॉ.मुकुंदराव पाठक, प्रमुख पाहुणे ऍड.राजेंद्र अनुभुले, प्रमुख पाहुण्या सी.ए. कल्पना दाभाडे उपस्थित होत्या. फर्गसन रस्त्यावरील विद्यार्थी साहाय्यक समितीच्या सुसज्ज आपटे सभागृहात हा कार्यक्रम होता. स्वागत गीतानंतर गायत्री पाठक-पटवर्धन यांनी त्यांचे मनोगत प्रास्ताविकात व्यक्त केले. सनाथबद्दल माहिती दिली. नंतर वर उल्लेख केलेल्या प्रत्येक मान्यवरांचे भाषण झाले.श्री. श्रीरंग पटवर्धन यांनी आभारप्रदर्शन केले. त्यानंतर या मेळाव्यास साह्यभूत अनेक संस्था व व्यक्ती यांचा सत्कार करण्यात आला.
जाणिवेची समृद्धी
या सर्व भाषणांमधून एक महत्त्वाचा मुद्दा मला प्रकर्षाने जाणवला. म्हणजे वयाच्या अठराव्या वर्षी अचानक संपणारी संस्थांची जबाबदारी व जगास तोंड देण्यासाठी एकटे बाहेर पडणारे हे नवयुवा. खरेच अठराव्या वर्षी माणूस इतका प्रगल्भ असतो का? हा प्रश्न मला त्या कार्याक्रमात स्वस्थ बसू देत नव्हता.
अनाथाश्रम, बालकाश्रम, बालसुधारगृह या सर्व संस्था उत्कृष्ट काम करतच असतात. हा दोष त्यांचा नाही. कारण त्यांच्या कार्यक्षेत्रास कोठेतरी मर्यादारेषा आखलीच पाहिजे आणि कायद्याने ती १८ वर्षे पूर्ण ला आखली आहे कारण तेव्हा माणूस पूर्ण सज्ञान होतो असे कायद्याने गृहीत धरले जाते. एकदा त्यांचा पाल्य १८ पूर्ण झाला/झाली की या संस्थांची जबाबदारी संपते. आणि संस्थेला कितीही इच्छा, ममत्व असो तरी कायद्याने त्यांना १८ वर्षावरील पाल्य ठेऊन घेता येत नाही, इतके की तसे केल्यास त्यांच्या मान्यतेवर गदा येऊ शकते.
मी जेव्हा १८ वर्षांचा होतो तेव्हा MBBS च्या प्रथम वर्षास होतो. एखादा पदवीच्या प्रथमवर्षात शिकणारा मुलगा/मुलगी विचारात घ्या जिचे बालपण पण मध्यम ते उच्चमध्यमवर्गीय सुरक्षित वातावरणात व बुद्धीजीवी घोळक्यात गेले आहे.अन्न वस्त्र निवारा यांच्यासाठी विचार करण्याचीही गरज नाही इतक्या त्या त्या गृहित धरल्या असतात.घरी एकवेळ खूप सधनता, सुबत्ता असो किंवा नसो पण यांच्या पाल्याने चार पैसे नाही कमावले तर चूल पेटणार नाही अशी अवस्था नक्कीच नसते. उलट आपल्या पाल्यास चुकून अशी गरज असेल तरीही स्वतः जास्त कष्ट उपसून, अर्धपोटी राहून त्यांच्यावर आईवडील ती वेळ येऊ देत नाहीत.इतके आईवडिलांचे लाड असतात.या युवा अवस्थेत त्या मुलास/मुलीस मिळणारे विशेषाधिकार त्यांची पुसटशी पण जाणीव मनाला होऊ देत नाहीत.
याच्या विरुद्ध अनाथाश्रमाच्या बाहेर अठराव्या वर्षी पाऊल ठेवणारी युवती ध्यानात घ्या : पाठीमागे आईवडिलांचे पाठबळ नाही; कोणतीही आर्थिक पुंजी नाही; रोजची अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करण्याची धडपड; त्याशिवाय समाजकंटकांना धैर्याने सामोरे जाऊन त्यांच्यापासून आपला बचाव करण्याची जबाबदारी. या सर्व चक्रव्युहास भेदले तर पुढे कुठे शिक्षणाचा विचार करता येइल.
त्या दिवशी माझ्या समोर ह्या चक्रव्यूहास भेदून विजयी झालेल्या एक दोन नव्हे तर तब्बल साठ ते सत्तर मुली होत्या आणि ह्याही पुढे जाऊन उच्चशिक्षण घेतलेल्या आठ दहा मुली होत्या. मला माझे शिक्षण किंवा आयुष्य विनाअडथळ्यांचे, आव्हानशून्य सुरळीत होते किंवा आहे असे मुळीच म्हणायचे नाही. उलट त्या आव्हानांस सामोरे जाऊन जे जी मी मिळवले त्याचा मला सार्थ आभिमान आहे.पण ते अडथळे व ती आव्हाने यांच्याशी मी जेव्हा दोन हात करत होतो तेव्हा मला साहाय्यभूत झालेली माझी प्रिव्हिलेजेस जी मी फारच गृहीत धरलेली होती ती तेव्हा ठसठशीतपणे माझ्या मनाच्या पडद्यावर व्यक्त होत होती. अशी जाणीव हळूच आपल्या दांभिकतेच्या फुग्याला (ज्याला इंग्रजीत एंटायटल्डनेस म्हणतात) टाचणी लावते व पाय जमिनीवर घट्ट ठेवण्यास मदत करत असते.
त्यामुळे त्यादिवशी मला माझ्या प्रिव्हिलेजेसची नव्याने उजळणी झाली व सुस्थितीत सुरक्षित बालपण दिल्याबद्दल माझ्या आईवडिलांचे व घरातील सर्वच वडीलधाऱ्यांचे मनापासून आभार मानावेसे वाटले. एवढेच नाही तर त्यांनी ती सुरक्षितता पाठक बालकाश्रमातील प्रत्येक मुलामुलीस देण्यास झटले याचे आणखीनच कौतुक वाटले.
जेव्हा संस्थेतून मुले मोठी होतात आयुष्यात स्थिरस्थावर होतात. त्यांच्या पुढील पिढीस अधिक बळकट बनवतात तेव्हा त्यांचे होणारे कौतुक का यथार्थ आहे याची पूर्ण जाणीव आता येत होती.सर्वसामान्यतः ज्याला गोष्टी सहज किंवा आपसूक घडत असतात त्या प्रत्येक बाबतीत बालकाश्रमातील मुलास संघर्ष अटळ असतो. मग ते स्वतःचे शिक्षण असो, नोकरी असो किंवा लग्न. अशा प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर निघून इतरांना देखील मदत करणे हेही महत्त्वाचेच होते. त्यामुळे लवटे सर, कल्पना दाभाडे ताई किंवा गायत्री पाठक-पटवर्धन यांची झालेली भेट माझी जाणीव समृद्ध करणारी होती असे वाटले.

आत्मबोध : A note to myself.
या तिघांनीही बालपण बालकाश्रमात घालवले व स्वकर्तुत्वाने आपला ठसा उमटवला. आणि माझ्या वडिलांनी म्हणजे डॉ. मुकुंदराव पाठक यांनी बोलताना व्यक्त केलेली सर्वात भावलेली गोष्ट म्हणजे “ओळख करून देताना श्री.लवटे सरांचा परिचय अनाथाश्रमात राहून मोठा झालेला किंवा सी.ए. दाभाडे यांचा परिचय केवळ बालगृहात राहून मोठी झालेली असा सीमित न करता त्यांनी त्याच्या पलीकडे जाऊन खूप गोष्टी केल्या आहेत. उदा. लवटे सर एक सिद्धहस्त साहित्यिक आहेत, खांडेकरांच्या साहित्याचा त्यांचा व्यासंग दांडगा आहे. सी.ए. दाभाडे या आज अनेक मुलींना स्वतः च्या पायावर उभ्या करताना मदत करत आहेत. त्यांचा ह्या कामाचा देखील परिचय असावा. म्हणून त्यांची ओळख त्यांच्या अनाथाश्रमाच्या/ बालगृहाच्या पुरतीच मर्यादित ठेवणे संकुचितपणाचे आहे.”
कारण नुसतेच अनाथाश्रमातील मुलांचे नाही तर त्यांना आधार देणाऱ्या पाठक ट्रस्ट असोत, सनाथ असो, विद्यार्थी साहाय्यक समिती किंवा त्यासारख्या अनेक संस्था महाराष्ट्रात आहे त्यांचे महत्त्व त्यादिवशी पुन्हा एकदा माझ्यालेखी अधोरेखित झाले.
या परिस्थतीत स्वतःच्या व्यवसायास सांभाळून देखील सर्वात मूल्यवान मानवी संसाधन म्हणजे वेळ ह्या कामासाठी लावणाऱ्या ऍड. राजेंद्र अनुभुले, श्री श्रीरंग पटवर्धन या सर्वांच्या बद्दल व त्याच अनुषंगाने अशा संस्था निस्पृहपणे चालवणाऱ्या सर्व व्यक्ती व त्यांचे सहकारी ज्यात पाठक ट्रस्ट ही आला यांच्याबद्दल आदर दुणावला व त्यांच्या भेटीने पुढे जाऊन अनाथ मुलामुलींच्या सबलीकरणाच्या क्षेत्रात काम करावे की नाही याबद्दल जो छोटासा किंतु-परंतु होता तो पण दूर झाला. म्हणून मी या भेटीस ‘एक जाणीव समृद्ध करणारा’ अनुभव असे म्हणेन.

Leave a Reply