इंटरनेट वर मला मिळालेली मराठी भाषा अभ्यासाची साधने
प्रथमतः सर्वाना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आज कुसुमाग्रजांचा वाढदिवस जगभरात मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो.

माहितीच्या या महाजालात आपली मराठी भाषा नेमकी कशी शोधायची ? मी जेव्हा इंटरनेट वापरायला सुरुवात केली, तेव्हा मराठी केवळ बोटावर मोजण्याइतपत वर्तमानपत्रांच्या वेबसाईट्सपुरती मर्यादित वाटायची. पण गेल्या दोन दशकांत, २००४ मधील ऑर्कुटच्या सुरुवातीच्या दिवसांपासून ते आजच्या ‘जेमिनी’ सारख्या कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. आज इंटरनेटवर आपल्या मायबोलीचा केवळ वावरच नाही, तर एक समृद्ध ज्ञानवारसा डिजिटल स्वरूपात जतन केला गेला आहे.
अनेकदा आपल्याला हवी असलेली खात्रीशीर माहिती मराठीत कुठे मिळेल हे माहित नसते. मग तो दुर्मिळ शब्दांचा अर्थ शोधणे असो, जुनी पुस्तके वाचणे असो वा विद्यापीठांचे शोधनिबंध अभ्यासणे असो; हे सर्व ज्ञान आज एका क्लिकवर उपलब्ध आहे. आपल्या भाषेची डिजिटल पाऊलखुणा अधिक गडद करण्यासाठी आणि या आधुनिक साधनांचा प्रभावी वापर करण्यासाठी, मला मराठी अभ्यासासाठी उपयोगी पडलेले १० महत्त्वाचे ज्ञानस्रोत मी आज या लेखातून तुमच्यासमोर मांडत आहे.
१. मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन संकेतस्थळ दुवा: https://marathi.gov.in/ मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासनाचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासनाने २०१० साली या विभागाची स्थापना केली. या विभागावर खालील ज्ञानस्रोत मिळतात: १. मराठी पारिभाषिक कोश: https://shabdakosh.marathi.gov.in/ (यात जवळजवळ ३ लाख शब्द आहेत.) २. जुनी मराठी पुस्तके ३. मराठी विश्वकोश: https://marathivishwakosh.org/
२. बृहदकोश संकेतस्थळ दुवा: https://bruhadkosh.org/ आदूबाळ (? खरे नाव माहीत नाही), प्रसाद शिरगावकर, ऋषिकेश खोपटीकर या मराठी तरुणांनी अनेक मराठी शब्दकोश एकत्र करून यावर प्रसिद्ध केले आहेत.
३. शिकागो विद्यापीठाची डिजिटल साऊथ एशिया लायब्ररी संकेतस्थळ दुवा: https://dsal.uchicago.edu/dictionaries/marathi/ या संकेतस्थळावर मराठीच्या खालील शब्दकोशांचे लीलया शोध घेता येईल असे सादरीकरण केले आहे: १. मोल्स्वर्थचा शब्दकोश २. दाते शब्दकोश ३. तुळपुळे यांचा जुन्या मराठी भाषेचा शब्दकोश ४. बर्नस्टन यांचा शब्दकोश या संकेतस्थळावर मराठीबरोबर भारतीय उपखंडातील प्रत्येक प्रमुख भाषेचे शब्दकोश तुम्हांस सापडतील. तसेच Linguistic Survey of India आणि इतर पुस्तकसामुग्री देखील या संकेतस्थळावर मिळेल.
४. ई-पुस्तकालय संकेतस्थळ दुवा: https://epustakalay.com/ हे हिंदी व मराठी पुस्तके ई-बुक्स रूपात शोधण्याचे ॲग्रिगेटर (Aggregator) आहे. यावरील पुस्तके इंटरनेट आर्काइव्ह किंवा गूगल बुक्सवर अपलोड केलेली असतात.
५. नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया संकेतस्थळ दुवा: https://ndl.iitkgp.ac.in/ हा केंद्र सरकारचा अधिकृत उपक्रम आहे. येथे पुस्तके पाहण्यासाठी स्वतःचे खाते तयार करावे लागते. आय.आय.टी. खडगपूर हे या संकेतस्थळाचे संचालन करते. दुर्मिळ व आताची ताजी अशी सर्व पुस्तके येथे उपलब्ध आहेत.
६. शोधगंगा संकेतस्थळ दुवा: https://shodhganga.inflibnet.ac.in/ हा देखील एक शासकीय उपक्रम आहे. भारतातील अनेक विद्यापीठांतील PhD साठी लिहिलेले शोधनिबंध या वेबसाईटवर उपलब्ध आहेत व शोधता येतात.
७. यूट्यूब संकेतस्थळ दुवा: https://www.youtube.com/ यूट्यूब इतके विस्तीर्ण आहे की सगळ्या चॅनेल्सची यादी देणे अशक्य आहे, पण शोधल्यास खूप माहिती यावर सापडते.
८. प्रसिद्ध समाजमाध्यमे फेसबुक, इंस्टाग्राम, कोरा, रेडिट, व्हॉट्सॲप, एक्स (पूर्वाश्रमीचे ट्विटर) ही प्रसिद्ध समाजमाध्यमे आहेत. यांच्यावर अनेक स्रोत उपलब्ध आहेत. पण त्यांचा विस्तार इतका अवाढव्य आहे की काही वेळा नेमकी गोष्ट सापडत नाही. अशा वेळेस आपले सामायिक मित्र किंवा अनुसरक असतात त्यांना बिनधास्त विचारावे. #हॅशटॅग हा प्रकार ट्विटरने आणला, आता प्रत्येक समाजमाध्यम त्याचा वापर करते. हॅशटॅगमुळे एखाद्या विषयावरील पोस्ट शोधणे सोपे जाते.
गेली वीस वर्षे मी इंटरनेट वापरतो आहे. इंटरनेटवर मला सुरुवातीला मराठीची उपस्थिती ठळक वर्तमानपात्रांच्या वेबसाईट्स सोडल्या तर जाणवत नव्हती. मग २००४ मध्ये तेव्हा हैदराबादमध्ये स्थायिक असलेल्या मराठीवेड्या एका मित्राने मला ऑर्कुटचे निमंत्रण ईमेलवर धाडले. तेव्हा कदाचित ‘समाजमाध्यम’ हा शब्दही तयार झाला नसेल. पण त्या ऑर्कुटमुळे मी मराठी पुस्तकांच्या एका ग्रुपमध्ये सहभागी झालो. त्या ग्रुपवरील देवाणघेवाणीत सध्याची चर्चेतील पुस्तके कोणती वगैरे बऱ्याच गप्पा होत.
९. मायबोली डॉट कॉम व त्यासारखी पोर्टल्स संकेतस्थळ दुवा: https://www.maayboli.com/ मायबोली हे स्थळ ललित वाचनासाठी खूप चांगले आहे. मराठी भाषा मराठी देवनागरीत लिहिण्यासाठी चांगली साधने यावर उपलब्ध आहेत. १९९६ च्या गणेश चतुर्थीच्या दिवशी या पोर्टलची स्थापना झाली, त्यामुळे मराठीसाठी बनवलेले पहिल्या पिढीचे पोर्टल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. याचा ‘एक्स’ किंवा फेसबुकवर मायबोली पोर्टल फार सक्रिय असल्याचे माझ्यातरी निदर्शनास आलेले नाही. मायबोलीसारखी इतर पोर्टल्स देखील असतील पण मला ठाऊक नाहीत.
१०. गूगल संकेतस्थळ दुवा: https://www.google.com/ गूगलसारखे सर्च इंजिन नाही! ‘अडले तर विचार गूगलला’ हा माझा नियम आहे. पण गूगल हाताळणे शिकणे हे देखील महत्त्वाचे आहे. हे तुम्ही गूगललाच विचारून शिकू शकता इतके ते सोपे आहे. आता गूगलबरोबर ‘जेमिनी’ हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे साधन मिळते. जेमिनीला तुम्ही काहीही विचारा, ते चुटकीसरशी उत्तर देते.

Leave a Reply