मराठीचिये नगरीतून एक फेरफटका

सायंकाळी ६ ते ९ शहरातून एक फेरफटका मारायचा ठरवलं तर काय आठवतं? डोळ्यांसमोर काय चित्र उभं राहतं?
गाड्यांचे कर्णकर्कश भोंगे, लोकांची घरी परतायची धांदल, गर्दीचा गलबलाट. हो ना?  

पण हा फेरफटका आपल्या व्यावहारिक जीवनातल्या शहरात नसून, साहित्यिक विश्वातील मराठीभाषानगरातील होता. या फेरफटक्यात माणसांची-वाहनांची  गर्दी नसून, छंदांची-अलंकारांची दाटी होती. मराठी नगरीच्या  संतसाहित्य , पंतसाहित्य , तंतसाहित्य  अश्या  इतिहाससमृद्ध पेठा एकामागून एक ओलांडून विस्तीर्ण फोफावलेल्या आधुनिक मराठीच्या गद्य पद्याच्या टुमदार इमारतींचे नवीन उपनगर पाहिले. हा प्रवास घडवताना आम्हा श्रोतृवृंदाच्या वाटाड्या होत्या सौ. वंदना बोकील. त्या स्वतः  प्राध्यापिकाक, लेखिका, संपादिका, आणि मराठीच्या साहित्य समीक्षिका आहेत . त्यांनी संत ज्ञानेश्वरांचे “इये मराठीचिये नगरी। ब्रह्मविद्येचा सुकाळ करी” च्या शतकभर आधीपासूनपासून तीन वसंतरावांनी गाजवलेल्या “इये मराठीचिये नगरी. राम राम मंडळी, या हो या हो अमुच्या घरी” च्या अर्धशतकभरनंतर पर्यंत हा प्रवास सुखकर व संस्मरणीय करून दाखवला त्यांच्या चार साथीदारांनी. मी जागर मराठी या व्याख्यानमालेच्या शेवटच्या दिवशी ठेवलेल्या  “इये मराठीचिये नगरी” या कार्यक्रमाने तीन तास असा पूर्ण भारावून गेलो होतो. 

 एक निवेदिका/सूत्रसंचालिका, दोन अभिवाचक आणि दोन गायक असा पाच कलाकारांचा संच ही साहित्यकृती सादर करतो.
अभियाचन – गिरीश दातार आणि गौरी देशपांडे करतात तर गायन- नेहा देशपांडे आणि पार्थ उमराणी करतात. कार्यक्रम प्रभावी होण्यामागे मला वाटले की निवेदन, अभिवाचन आणि गायन हे आलटून पालटून सादर होतात त्यामुळे कार्यक्रमातील रंगत शेवटपर्यंत टिकून राहते. व त्याचबरोबर कार्यक्रमातील करमणूक अभ्यासपूर्ण संहितेवर बोजड ठरत नाही. वाद्यवृंद नसणे, त्याच्या नसण्यातून कार्यक्रम भाषा व साहित्यविषयक असून संगीतविषयक नाही याची हळुवारपणे जाणीव करून देते. नेपथ्य मराठमोळ्याला शोभणारे साधे आहे.

कार्यक्रमाची संहिता लिहिताना गाहा सत्तसई ते आधुनिक काळापर्यंतचे २०००-२५०० वर्षांचे साहित्य ३ तासामध्ये बसवणे खचितच अवघड गेले असेल. कोणते कवी व लेखक निवडावेत ह्याबरोबर कोणते वगळावे व वगळू नयेत हा लेखकाचा हक्क जरी असला तरी त्यातील तोल सांभाळणे महाकठीण असते. त्यामुळे काही अनुल्लेख जाणवले तरी मला त्याबद्दल आश्चर्य वाटत नाही. 

साधारण एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध व विसाव्या शतकाचा पूर्वार्ध हा स्त्रियांच्या, समाजातील उपेक्षितांच्या शैक्षणिक विकासाचा परमावधी होता. समाजसुधाराचे फार महनीय काम त्या काळात महाराष्ट्रात घडले व त्याच्या अमीट पाऊलखुणा त्या काळातील मराठी साहित्यात उठलेल्या आहेत. हा कार्यक्रम त्या खुणा दाखवतो व ज्या महान प्रभृतींनी त्या सोडल्या त्यांचे चरित्र वाचण्यास उद्युक्तही करतो.हे वेचे, पत्रे व गीते निव्वळ भाषेवर प्रकाश न टाकता बदलता समाजदेखील समर्थपणे प्रतिबिंबित करतात. भाषा व समाज यांचे घट्ट नाते त्यामुळे अधोरेखित होते.

अभिवाचन करताना शब्दांचे स्पष्टोच्चारण, लेखकाला अनुसरून  आवाजाचा पोत बदलणं वाचन खुलवते.
काव्य सादर करताना  म्हणून रसग्रहण न करता त्यातील भाषाशास्त्रीय बारकावे योग्य ठिकाणी बोकील ताई स्पष्ट करतात उदा. होनाजी बाळाच्या एका लावणीत सोज्वळपणा शृंगारावर कसा वरचढ ठरतो किंवा यमक जुळवण्यासाठी कोल्हटकर “राधाधरमधुमिलिंद जय जय’मध्ये मराठीत प्रचलित नसलेले पुलिंद,कुविन्द,अलिंद हे संस्कृत शब्द उपयोजितात. मर्ढेकर त्यांच्या कवितांमध्ये, किंवा  नेमाडे कादंबऱ्यात भाषेचे नवप्रयोग कसे करतात ते समजावतात.  

लिहिण्यासारखी उदाहरणे या कार्यक्रमासाठी खूप देता येतील पण विस्तारभयाचा विचार करून एकच देतो. 

माझ्यासाठी नाट्यसंगीतातील खालील पद त्याच्या नादमधुर्याबरोबर आता ह्या कार्यक्रमामुळे शब्दांसाठी पण लक्षवेधक बनलं आहे 

राधाधरमधुमिलिंद । जयजय रमारमण हरि गोविंद ॥ कालिंदी-तट-पुलिंद-लांच्छित सुरतनुपादारविंद, जयजय ॥उद्‌धृतनग मध्वरिंदमानघ सत्यपांडपटकुविंद, जयजय ॥गोपसदनगुर्वलिंदखेलन बलवत्स्तुतितें न निंद, जयजय ॥

आमच्या विषयाच्या Clinical Surgery या प्रसिद्ध पुस्तकात लेखक के. दास एकेठिकाणी  म्हणतात The eyes see what the mind knows (मनाला ठाऊक असलेल्याच गोष्टी डोळे पाहत असतात).मनाची मशागत करण्यासाठी मराठी साहित्यातील अनेक जागा या कार्यक्रमाने दाखवून दिल्या, जेणेकरून  पुढे एखादे पुस्तक वाचताना त्यातील रसग्रहणाच्या जागा आपसूक दृग्गोचर होतील. 

वसंतराव देशपांड्यांनी गायलेल्या, वसंत देसाईंनी संगीतबद्ध केलेल्या  वसंत कानेटकरांच्या “इये मराठीचिये नगरी” गाण्याने कार्यक्रमाची सांगता होते व त्या गाण्यात वर्णिल्याप्रमाणे  कृष्णेच्या पाण्याला गंगेची माधुरी कशी आहे हे कार्यक्रमांती कळून जाते. 

हा कार्यक्रम पाहण्याची संधी मिळाल्यास अवश्य पाहा. 

डॉ . सुधन्वा रा . पाठक
८ /२ /२०२५
मिरज

2 Comments on “मराठीचिये नगरीतून एक फेरफटका

  1. डॉ.पाठक

    नमस्कार .
    आपण ही लिंक पाठवून खूप दिवस झाले आहेत, याची जाणीव आहे. कामाच्या गडबडीत वाचायचे राहूनच गेले होते. शिवाय प्रवास ही बराच झाला या काळात…असो..ही काही करणे असली तरी उशीर झालाच आहे त्यासाठी आधी दिलगिरी.
    आपण अतिशय मनापासून कार्यक्रम ऐकला आणि त्यावर सविस्तर अभिप्राय लिहिला त्यासाठी आपले मनापासून आभार.
    आपण म्हणता ते खरे आहे, काय घ्यावे, काय वगळावे, याचा फारच पेच पडला होता. म्हणून आम्ही एक वाट शोधली आहे. संकलन तर बरेच आहे. त्यामुळे आलटून पालटून उतारे आणि गाणी बदलून घेतो.
    आत्ता नुकताच पुण्यात जो प्रयोग केला त्यात बरेच बदल होते.
    असो…दोन तासांची मर्यादा मान्य करूनच करावा लागतो. पण हेही नसे थोडके.

    पुनश्च धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*