एका लिपीची जन्मकथा
गोष्ट कूपरे नावाच्या पॅरिस जवळील खेड्यातील १८१२ सालची आहे.

एक तीन वर्षाचा मुलगा वडलांच्या कारखान्यात खेळत होता. खेळता खेळता अचानक एका आरीचे टोक त्याच्या एका डोळ्यात घुसले व त्या डोळ्याची दृष्टी कायमची गेली. व पुढील सहा महिन्यात दुसऱ्या डोळ्याची दृष्टीही पूर्णपणे गेली. (एका डोळ्यास इजा झाल्यामुळे चांगल्या डोळ्याची देखील दृष्टी अंधुक होणे याला वैद्यकीय भाषेत sympathetic ophthalmia म्हणतात)
“हल्ली उजाडत नाही का? मला कायम अंधारच का वाटतोय?” त्या मुलाचा निरागस प्रश्न त्याच्या आईवडिलांना आणखीनच अपराधीपणाची बोचणी देत होता. त्या आईवडिलांनी ठरवले आपल्या मुलास शिक्षण द्यायचे. त्यांनी त्याला काठीच्या आधारे चालावयास शिकवले. लहान मुलांची पुस्तके वाचून शिकवली.
पुढे त्यांच्या लक्षात आले की त्याची ज्ञानपिपासा तृप्त करण्यासाठी त्यासाठी चांगली शाळाच हवी. म्हणून वयाच्या दहाव्या वर्षी त्याला रॉयल इन्स्टिटयूट फॉर ब्लाइंड युथ पॅरिस येथे प्रवेश घेतला. तेथील शिक्षकांना माहित होते की केवळ वाचून दाखवण्याने शिक्षण पूर्ण होत नाही.त्यासाठी विद्यार्थ्यांना लिहिता वाचता आले पहिजे.
त्या शाळेच्या प्रमुखांनी लॅटिन लिपीतील अक्षरे उठावदार पद्धतीने कोरून मुलांना वाचावयास शिकवण्यासाठी वापरली. ती शाळेचे संस्थापक वॅलेंटिन ओयी यांची सिस्टम म्हणून प्रसिद्ध होती.पण ज्यांनी डोळस असताना अक्षरे कशी दिसतात हे पाहिले नव्हते, त्या अंध मुलांसाठी ती अत्यंत कठीण होती. दिसण्याची लिपी स्पर्शाने उलगडायचे अवघड असते.
चार्ल्स बार्बियर नावाचा एक लष्करी अधिकारी होता. त्याने लष्करासाठी १२ बिंदूंची एक सांकेतिक लिपी तयार केली होती – एका ध्वनीसाठी २×६ आकाराचा संच. त्याला वाटले की, ही लिपी थोडी सुधारून अंधांसाठी उपयोगी पडेल.

या कथेचा नायक आता १५ वर्षांचा झाला होता आणि तो उत्तम पियानोवादक बनला होता. बार्बियरची लिपी त्याच्यापर्यंत पोहोचली. बार्बियरची लिपी १२ बिंदूंची होती (२ रांगा × ६ ओळी). त्याला या लिपीबाबत एक गोष्ट खटकली की, एका बोटाच्या टोकावर ती एकाच वेळी स्पर्शाने व्यवस्थित जाणवत नव्हती. त्यामुळे त्याने ह्या लिपीत सुधारणा करण्याचे ठरवले.
त्याने ६ बिंदूंचा वापर करायचे आणि ध्वनीऐवजी थेट लॅटिन वर्णमालेची अक्षरे ह्या लिपीतून उमटवायची असे ह्या लिपीत बदल केले. १८२९ मध्ये त्याने ही लिपी प्रकाशित केली. सुरवातीला त्याने ४ बिंदूंचे १० अक्षरांचे एक दशक बनवले व खालची ओळ फक्त दशक क्रमांक निर्देशित करण्यासाठी वापरायची. अशाप्रकारे ४० अक्षरे तयार झाली व त्यात २६ अल्फाबेट सहज मावली

ज्या आरीने त्याचे डोळे गेले त्याच आरीचा वापर करून ही उठावदार (एम्बोस्ज्ड) लिपी जन्मली व या लिपीचा जनक म्हणजे लुई ब्रेल. आज लुई ब्रेल यांचा वाढदिवस ब्रेल डे म्हणून प्रसिद्ध आहे व ज्ञानाची कवाडे या महान व्यक्तीने अंध लोकांसाठी उघडली.
ब्रेल हे अंध मुलांचे शिक्षकही होते. वयाच्या ४३व्या वर्षी क्षयरोगाने त्यांचा मृत्यू ६ जानेवारी १८५२ मध्ये झाला. त्यांच्या हयातीत त्यांची लिपी फ्रान्समध्ये अधिकृतपणे स्वीकारली गेली नव्हती, पण मृत्यूनंतर दोन वर्षांनी म्हणजे १८५४ मध्ये फ्रान्समध्ये ती अधिकृतरीत्या अंधलिपी म्हणून मान्य झाली आणि नंतर युरोपात तसेच जगभर पसरली.

ब्रेल लिपी फक्त लॅटिन पुरती मर्यादित न ठेवता इतर भाषांनी देखील तिचा अंगीकार केला. भारतीय भाषांसाठी जी ब्रेल वापरतात त्याला भारत ब्रेल लिपी म्हणतात
https://en.wikipedia.org/wiki/Bharati_Braille

पुढच्या खेपेस जेव्हा एखाद्या लिफ्टमध्ये ही उठावदार लिपी बोटांना जाणवेल तेव्हा ब्रेलचे अतुलनीय योगदान नक्की आठवेल . आपण आपल्या ओळखीत अंध असतील त्यांना जरूर मदत करा. अंध मुलांना अंध शाळेत प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहित करा. दृष्टी नसणे म्हणजे शिक्षण कुंठणे हे जुने समीकरण ब्रेल ने मोडले, म्हणून जन्मदिनी त्यांना त्रिवार वंदन.
डॉ. सुधन्वा रा. पाठक
पाठक हॉस्पिटल मिरज
दि. ४-१-२०२३
मुद्रितसंशोधन व सुधार दि . ४ -१ -२०२६
(पूर्वी X या समाजमाध्यमावर लिहिलेल्या थ्रेड वरून )
माहिती स्रोत : विकिपीडिया https://en.wikipedia.org/wiki/Louis_Braille
चित्रश्रेय: Wikimedia Commons
Images licenced with creative commons.

Leave a Reply