भाषांतरावर

“माणूस हा सामाजिक पशु आहे”. 

 हे माझे वाक्य नाही. महान ग्रीक तत्त्ववेत्ता ॲरिस्टॉटलचे आहे.

माणसाला पशू म्हणणे जीवशास्त्राच्या दृष्टीकोनातून खरे असले तरी शिष्टसंमत भाषेत अप्रस्तुत वाटते. मग अशा काय गोष्टी माणसाला देवाने (तुम्ही नास्तिक असाल तर निसर्गाने वाचा) दिल्या आहेत ज्या त्याचे पशुत्व घालवतात? तर त्या आहेत दोन पायावर चालणे, हाताचा अंगठा मनासारखा वाकवून इतर बोटाना स्पर्श करून दाखवणे, आणि या दोन देणग्यांच्या कृपेने विकसित झालेला प्रचंड ताकदीचा मेंदू! मेंदूचा वापर करून आपण विचार करू शकतो. ते विचार व आपापल्या भावना  भाषास्वरूपात दुसऱ्या मानवाला व्यक्त करून दाखवू शकतो. या तिन्हींतील बोलणे (व लिहिणे धरल्यास भाषा) ही देणगी माणसाला माणूस म्हणजे ॲरिस्टॉटलच्या भाषेत ‘सामाजिक पशू ‘ बनवते. 

पण पूर्वीच्या काळी प्रवास मर्यादित असल्याने बहुभाषिकत्व ही काळाची गरज नव्हती. बहुतेक लोकांचे एका बोलीभाषेवर भागायचे.व्यापारी व राजकारणी वगळता त्याचा कुणाला फारसा उपयोग नसे. आणि राजकारण व धर्म हे आदीम काळापासून एकमेकांशी घनिष्ठ संबंध ठेवून आहेत त्यामुळे धर्मप्रसारक व धर्मगुरू त्यात तिसरे या तीन समाजघटकांना दुसऱ्याची भाषा समजणे अनिवार्य झाले व त्यातून भाषांतराचा व बहुभाषिकतेचा विकास होत गेला. ख्रिश्चन समाजाचा पवित्र ग्रंथ बायबलचे लॅटिन भाषांतर करणाऱ्या सेंट जेरोम च्या सन्मानार्थ ३० सप्टेंबर आंतरराष्ट्रीय भाषांतर दिवस म्हणून २०१७ मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेने घोषित केला. अशाप्रकारे व्यापार,राजकारण व धर्मकारण यातून भाषांतराचा विकास झाला.    

भाषांतराची व्युत्पत्ती  

भाषांतर म्हणजे शब्दशः अन्य भाषा. संस्कृतात ‘अंतर’ हा प्रत्यय लावून वारेमाप नवीन शब्द बनवता येतात  जसे रूपांतर म्हणजे अन्य रूप , देशांतर म्हणजे अन्य देश, वेषांतर म्हणजे अन्य वेष तसे. पण भाषा बदलताना  एका भाषेतील मजकूर त्याचा अर्थ, शैली आणि हेतू जपून दुसर्‍या भाषेत सदर करण्याची प्रक्रिया म्हणजे भाषांतर! भाषांतराला पूर्वीच्या मराठीत तर्जमा किंवा तर्जुमा ( फारसी भाषेतून मराठीला मिळालेला शब्द आहे) पण म्हणायचे हे मला ऑनलाईन बृहद्कोषात translation हा शब्द शोधल्यावर कळले. पण आधुनिक मराठीत या प्रक्रियेसाठी सहसा भाषांतर किंवा अनुवाद हे दोन शब्द अधिक प्रमाणात आढळून येतात. हो! इंग्रजाळलेल्या मॉडर्न मराठी स्टाईल मध्ये त्याला ट्रान्सलेशन म्हणले तरी वावगे ठरणार नाही. अनुवाद म्हणजे अनु(अनुसृत्य : एखाद्याला फॉलो करून) या उपसर्गातून आणि वद् (बोलणे) या संस्कृत धातूमधून आला आहे. शब्दवाही भाषबदलास भाषांतर आणि शब्दवाही व अर्थवाही दोन्ही बदलास अनुवाद असा म्हणायचं का? हा एक वादाचा मुद्दा आहे.त्यात मी पडणार नाही.  

लिखित साहित्य भाषांतरित करणे वेळ देऊन करण्याजोगे आहे. पण बोलताना चलत भाषांतर करणे हे मात्र अधिक जिकिरीचे आहे.असे भाषांतर करणाऱ्याना interpreters किंवा दुभाषे म्हणतात. पूर्वीच्या काळी पासून ते आजतागायत हजारो वर्षे हे लोक राजनैतिक प्रकियेचा माहात्त्वाचा घटक आहेत. असो. पण या लेखात मी लिखित साहित्याच्यावर माझा रोख कायम ठेवणार आहे.

भाषांतर भिन्नभाषिक समुदायांमधील संवाद आणि समज वाढवते आणि सांस्कृतिक अंतर भरून काढण्याचे काम करते. भाषा हे माध्यम असते मूळ मानवी भावना ह्या वैश्विक असतात. पण त्या व्यक्त करण्याची पद्धत, वापरले जाणारे हावभाव, देहबोली, शब्द , उपमाने, रूपके, म्हणी ह्या वेळ, स्थान, व्यक्ती व समाज सापेक्ष थोड्याफार बदलत असतात. येणाऱ्या काळात हावभाव व देहबोली यांचे भाषांतरातलं महत्त्व वाढत जाणार आहे. कारण ईमोजी नावाची नवीन लिपी सध्याची जेन झी ( GEN Z २००० इ.स. नंतर जन्मास आलेले ) वापरते. त्यातील हावभाव समाजसापेक्ष वेगळे असल्याने अर्थ बदलतात. उदा. आपल्याकडील ज्येष्ठ मंडळी whatsapp वर 🖕🏽 ही इमोजी खूप निष्पापपणे वापरतात उदा. ” वरील मेसेज पाहा” असा अंगुलीनिर्देश करण्यासाठी पण पाश्चात्य संस्कृतीत त्या ईमोजीचा अर्थ अतिशय अपमानकारी व बीभत्स आहे व तो शरीरसंबंध दर्शवतो.

मराठी भाषांतर परंपरा

मराठी भाषेपुरते बोलायचे झाले तर आपल्या भाषेला संतवाङ्मयायचा थोर वारसा लाभला आहे. 

संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान सामान्य माणसाच्या भाषेत आणले. ती एक प्रकारची क्रांती होती. पण ज्ञानेश्वरीला भगवद्गीतेचे भाषांतर म्हणता येत नाही कारण त्यांनी भगवद्गीतेच्या श्लोकांच्या भाषांतरापुरते त्या ग्रंथास  मर्यादित न ठेवता त्यांचे निरूपण व स्पष्टीकरण केले आहे त्यामुळे ज्ञानेश्वरीला भाषांतर न म्हणता टीका असे अभ्यासक म्हणतात. वामनपंडित व गेल्या शतकात विनोबांनी भग्वदगीता मात्र भाषांतरित केली आहे असे म्हणता येईल. वामनपंडित यांनी अनेक प्रकारचे संस्कृत साहित्य मराठीत आणले. भर्तृहरीच्या शतकत्रयीचा त्यांनी समश्लोकी अनुवाद केलेला आहे. पद्याचा पद्यातून अनुवाद करण्यासाठी दोन्ही भाषांवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे व ते वामनपंडितांचे ठायी खचितच होते असे हे श्लोक वाचल्यावर जाणवते.  

ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी सोळाव्या ते एकोणिसाव्या शतकात पवित्र बायबल व इतर ख्रिस्ती धर्मग्रंथ मराठीत भाषांतरित केले.  

साधारणतः मराठी भाषेचा देवगिरीचे साम्राज्य लयास गेले ते ब्रिटिशांनी पुण्यावर कब्जा केला हा कालावधी पाहिल्यास, मुळात बव्हंश साहित्य पद्यातून व भक्तिपरायण होते. त्यामुळे संस्कृतातून तेवढ्यापुरता साहित्याचा मराठी रूपांतरण व अनुवाद दोन्ही झाले. गद्यसाहित्य विचार केल्यास खासगी व शासकीय पत्रव्यवहार, व आज्ञापत्रे सोडल्यास फार नव्हते. पण यातदेखील छत्रपती शिवाजी महाराजांनी करवून घेतलेल्या राजव्यवहारकोश या ग्रंथाचा उल्लेख विसरता काम नये. ती भाषांतराची कृती नसली तरी रूढ झालेल्या फारसी शब्दांना मराठी प्रतिशब्द देण्याचे काम त्या ग्रंथाने केले.    

या काळाचा विचार केल्यास काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. 

  1. खूपच कमी लोक शिक्षित होते. त्यामुळे ग्रंथांचे वाचन होण्यापेक्षा श्रवण अधिक प्रमाणात होई  
  2. मराठीत देवनागरीत छपाई होत नव्हती , त्यामुळे पुस्तके छापणे सहज नव्हते 
  3. राजकीय अस्थैर्य होते. त्यामुळे राजाश्रयातून ग्रंथनिर्मिती फक्त काही निवडक दशकांमध्ये झाली उदा. १६७० च्या दशकात छत्रपती शिवरायांच्या आश्रयाने ग्रंथनिर्मिती झाली  

कॅरी चे मराठी व्याकरण हा पहिला छापील मराठी ग्रंथ म्हणता येईल तो मोडी लिपीत होता.
इसवी सन १८०५ मध्ये आमच्या मिरजेत पहिला देवनागरी ग्रंथ छापला गेला, त्यानंतर मराठी ग्रंथनिर्मिती देवनागरी लिपीतून होऊ लागली. 

१८१९ मध्ये पुणे इंग्रजांच्या अमलाखाली गेले व नंतर थोड्याच वर्षात पूर्ण भारत त्यांच्या ताब्यात आला. लॉर्ड मॅकऑलेने सक्तीचे इंग्रजी शिक्षण सुरु केले. त्यामुळे या काळात मोठ्या प्रमाणात इंग्रजी व सर्व भारतीय भाषांमध्ये ग्रंथांची देवाणघेवाण झाली. मेजर कॅण्डी या लष्करी अधिकाऱ्याने स्वतःला मराठीसाठी वाहून घेतले. मोल्सवर्थ बरोबर मराठी ते इंग्रजी शब्दकोश रचला.  लहान शाळकरी मुलांसाठी इंग्रजीतून अनेक गोष्टींचे मराठीत भाषांतर केले. मराठी गद्य लेखनात पाश्चिमात्य  विरामचिन्हे वापरायला सुरवात केली. इतकेच काय तर भाषांतर कमिटीच्या देखरेखीचे काम त्यांच्याकडे होते.  कँडीच्या भाषांतर पद्धतीत एक गुण त्यांच्याच भाषेत सांगायचंच तर

“The translations from English books that have been made by myself and by the Translation Exhibitioners are not simply translations, but are adaptations of the original pieces” – Major Thomas Candy 

Ref:American Novels in Marathi Translation: The Dynamics of Appropriation during the British Period : Sunil Sawant Wai

मराठीत ‘भाषांतर’ हा शब्द हा कधी कधी निव्वळ शब्दशः भाषांतर याच्यासाठी वापरतात, तर कधी ‘अर्थवाही’ आणि ‘शब्दशः’ भाषांतरासाठी वापरला जातो.
कधी कधी वाक्यांचा अर्थ सरळसोट नसून तो अन्योक्ती, उपहास, संकेतार्थ, गूढ अर्थ या प्रकारातील देखील असतो. आता मराठी ‘दोनाचे चार हात करणे ‘ याचे भाषांतर इंग्रजीत करताना get married असे केले तर ते शब्दवाही नाही होत पण अर्थवाही व अधिक योग्य होते. पण असे वाक्प्रचार त्यांचे शब्दशः भाषांतर करून लक्ष्य भाषेत घुसडले जातात आणि अतिवापराने जनमान्यता पावते होतात. एक चांगले उदाहरण द्यायचे म्हणजे इंग्रजीत ‘as of date / as of today’s date’ ही फ्रेज आहे त्याचे मराठी लोकप्रिय भाषांतर ‘सद्यस्थितीला’ करता येते. पण आधुनिक मराठीत विशेषतः टी व्ही मीडिया वर ‘आजच्या तारखेला’ असे त्याचे नवीन रुपडे तुम्ही नक्की ऐकले असेल. मेजर कँडीचा कल ‘अर्थवाही’ भाषांतर करण्यात होता आणि माझ्यागत नवशिक्या अनुवादकांसाठी तो अनुसरण्यासारखा आहे.

जसे आपले धार्मिक साहित्य पाश्चात्य देशात गेले, तसे तेथील साहित्य भारतात आले. पण त्यातील काही साहित्य मूळचे ग्रीक आणि रोमन तत्ववेत्यांचे, इतिहासकारांचे, गणीतज्ञांचे देखील होते. म्हणजे ग्रीक अभिजात साहित्य मराठी माणूस इंग्रजी अनुवादातून शिकला. ग्रीकांबरोबर काही प्रमाणात अरबी साहित्य उदा. अरेबियन नाईटस् मराठीत आल्या. अरब साहित्यिकांनी १०व्या शतकाच्या काळात अनेक पौर्वात्य व ग्रीक साहित्याचे अरबी भाषांतर केले होते, व अरबांच्या व्यापारातून ते युरोपीय लोकांना मिळाले. आणि इंग्रजांनी परत भारतात आणले. आपले पंचतंत्र इंग्रजीत गेले तर इसापनीती मराठीत आली. इंग्रजी माध्यमातून परिचय झाल्याने Aristotle ला मराठीत अरिस्टोटल म्हणतात तर उर्दू भाषकांना त्याचा परिचय अरबी लिखाणातून झाल्याने त्याला अरस्तू म्हणतात. आणि प्लेटोला अफलातून!

सर जॉर्ज ग्रियरसन या ब्रिटिश सनदी अधिकाऱ्याने भारतीय भाषांचे प्रथम सर्वेक्षण केले. इस १८९४ मध्ये सुरु केलेला प्रकल्प पूर्ण होण्यास इस १९२८ उजाडले. त्यात इंग्रजी उतारे शिकलेल्या भारतीयांना त्यांच्या मातृभाषेत भाषांतरित करायला लावले व त्यांचा वापर बोलीभाषा एकमेकांशी ताडून पाहण्यासाठी केला. त्याच्या सातव्या खंडात मराठीची विस्तृत माहिती येते. अशाप्रकारे मराठी भाषांतर भाषाभ्यासाचे अंगच नव्हे तर कृतीचा भाग पण बनले.

अमेरिकन साहित्य कदाचित ब्रिटिश प्रभावामुळे थोडे उशिराने मराठीत भाषांतरित झाले. The Prince and the pauper चे रंक आणि राव हे पहिले मराठी भाषांतरित पुस्तक होय. वाई येथे दामोदर यांनी 1908 मध्ये त्याचा अनुवाद केला.

शालेय शास्त्र व गणित मराठीत भाषांतरित होत होते व आताही होतंय. पुस्तकांचे भाषांतर एखाद्या भाषेला ज्ञानभाषा बनवायची पहिली पायरी असते.यातूनच पुढे भाषेची त्या विषयावर पकड येऊ लागते.   इतिहास भूगोल व मानव्य विद्या या मराठी भाषेतून सशक्तपणे व्यक्त होऊ लागल्या आहेत पण मेडिकल व इंजिनियरिंगचे विषय मात्र  अजून इंग्रजीच्या तावडीतून मुक्त झालेले नाहीत व कदाचित भविष्यातही कधी होणार नाहीत. ( विषयांतर टाळतोय , मराठी वैज्ञानिक लेखनावर मी मागे एकदा लेख लिहिला होता. खाली X दुवा आहे त्यावर टिचकी मारून तो आपण पाहू शकता.)

https://twitter.com/pathaksudh/status/1469698437297807365?s=20

बहुभाषक लेखकामुळे केवळ भाषांतरमार्गे ज्ञानाची देवाणघेवाण होत नाही तर भाषाही एकमेकांत मिसळतात. अर्थात भाषाप्रदूषण की भाषासमृद्धी हे वेळच ठरवतो. आधुनिक कादंबरी, लघुकथा, रहस्यकथा हे गद्य प्रकार पूर्वी मराठीत रुढावलेले नव्हते. ते इंग्रजीच्या प्रभावाने आले. सुनीत सारखे वृत्त मराठीला लाभले. गजल हे वृत्त उर्दू मधून मराठी काव्यात आले. अनेक शब्द, वाक्प्रचार आणि म्हणी मराठीत आल्या. भाषांतराच्या मदतीनेच १९व्या शतकात संस्कृतचे पुनरुज्जीवन होऊ शकले. भाषांतराने पुनरुज्जीवित झालेली संस्कृत आता आधुनिक आंग्लशिक्षितांची अभ्यासाची भाषा बनली. त्यामुळे जसे इंग्लिश लोक नवशब्दनिर्मितीसाठी लॅटिन वापरतात तसे भारतीय विद्वान संस्कृत वापरू लागले, पण त्याची किंमत काही अंशी प्राकृत व देशज शब्दांना मोजावी लागली.संस्कृतप्रभावामुळे अनेक प्राकृत तद्धिते जाऊन त्यांची जागा तत्सम शब्दांनी घेतलीं उदा. मुगुट च्या जागी मुकुट, प्रगटणे च्या जागी प्रकटणे. गेल्या शतकात जे संस्कृतमुळे घडले ते सध्या इंग्रजी व हिंदी मुळे घडतंय.  

प्रगटावे इंग्रजीतून 

इंग्रजी भाषा प्रत्येक शिक्षित भारतीयाला कळली नाही तरी कळल्याचा आव तर नक्कीच आणला जातो. इंग्रजी भाषेला एक वलय अलीकडच्या काळात प्राप्त झालेलं आहे. याहून सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे आपण इंटरनेट युगात आहोत. दिक्कालाच्या भिंती आपण समाजमाध्यमांवर मांडलेले विचार थोपवू शकत नाहीत आणि भाषासेतू  म्हणून बहुभाषक जगात इंग्रजीने स्वतःचे स्थान  निर्माण केले आहे. गेल्या वर्षी मी मनाचे श्लोक रोज एक याप्रमाणे ट्विटर वर पोस्ट करत असे. माझे शिक्षक डॉ. जी. वी. राव मला लातूरला एका कॉन्फरन्समध्ये भेटले होते. तेव्हा ते सहज बोलून गेले : “ अरे ते इंग्रजीत लिहीत जा, म्हणजे मलाही कळेल. तू रोज एक श्लोक पोस्ट करतोयस म्हणजे महत्वाचे साहित्य असणार” मग मी नंतर मूळ तेलुगूभाषक त्यांना मनाच्या श्लोकांचे इंग्रजी भाषांतर इंटरनेट वर उपलब्ध होते, ते पाठवले. त्यामुळे लीलया व नैसर्गिकपणे मराठीतून  आपण व्यक्त झालो तरी, समाजमाध्यमांवर त्याची पार्श्वभूमी परभाषकांना समाजवण्यास तसेच प्रसिद्धी करण्यास इंग्रजी भाषेला पर्याय नाही. 

भारतात सर्वात जास्त खपाची इंग्रजी कादंबरी म्हणजे पाउलो कोएल्हो यांची दि अल्केमिस्ट! पण मुळात ती इंग्रजी कादंबरी नसून त्यांच्या पोर्तुगीज भाषेतील O Alquimista या कादंबरीचे भाषांतर आहे. अशाप्रकारे एक पोर्तुगीज भाषेतील ब्राझिलियन लेखक इंग्रजी भाषांतरामुळे भारतात बेस्टसेलर होतो. २०२१ साली या पुस्तकाच्या सव्वा लाख प्रती भारतभर खपल्या1. भारतातील प्रत्येक प्रमुख भाषेत या कादंबरीचा अनुवाद झालेला आहे.

भारतात पुस्तकाच्या खपानुसार पाहिल्यास इंग्रजी सर्वात लोकप्रिय भाषा आहे, पाठोपाठ हिंदी आहे. त्यामुळे प्रादेशिक भाषेतील लेखकास ‘ प्रगटावे इंग्रजीतून’ असे वाटले तर आश्चर्य का वाटून घ्यावे? ज्या मराठीभाषी लेखकांना इंग्रजी देखील चांगली अवगत आहे असे लेखक या कारणामुळे इंग्रजीतून साहित्यनिर्मिती करतात. 

भाषांतराचे मूळ भाषेतील पुस्तकांवर अतिक्रमण


इंग्रजी प्रकाशक हे पैशाने खूप मजबूत असतात, ब्रॅण्डिंग व मार्केटिंग बाबतीत त्यांच्याशी स्पर्धा करणे इतरांना कठीण जाते. त्यामुळे इंग्रजी पुस्तक गाजणार याची खात्री झाली की लगेच  ते त्याची मराठी भाषांतरित आवृत्ती काढतात. वाईट याचे वाटते की, हे लोक भाषांतर करणाऱ्याचे नाव देखील मुखपृष्ठावर छापत नाहीत. उदा. ऍटोमिक हॅबिट्स ची मराठी आवृत्ती पाहा. मी जर पुढेमागे मराठी अनुवाद केला तर माझे नाव नक्कीच मुखपृष्ठावर छापेन.  जर आपण १० सर्वाधिक खपाची मराठी पुस्तके पहिली तर निम्मी तर भाषांतरेच निघतात.

https://twitter.com/i_sandypedia/status/1410499500666331141

भाषांतरातून होणारे गोंधळ

भाषांतरित पुस्तके बऱ्यापैकी मुरलेले लेखक लिहितात त्यामुळे त्यांमध्ये चुका कमी होतात. पण भाषांतराचे सगळ्यात जास्त गोंधळ कोण घालत असतील तर चढत्या क्रमाने प्रेस, टी व्ही  मीडिया आणि जाहिरातवाले. हल्ली गूगलमुळे टिचकीवर भाषांतर होते व chatGPT आणि तत्सम ऍप्स मुळे तयार मजकूर मिळतो पण या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या सोयीची पोहोच मराठीत इंग्रजी एवढी नाही हे त्या जाहिरातवाल्याना कोण सांगणार? आणि मराठी माणूस याबद्दल काही बोलत नाही. त्यामुळे हे सगळे गोंधळ आरामात खपून जातात. असा प्रकार आढळला की मला स्वस्थ बसता येत नाही व मी पूर्वाश्रमीचे ट्विटर म्हणजे सध्याचे X या समजमध्यामावर माझे विचार व्यक्त करत असतो. त्यातील काही उदाहरणे वेळ व विस्तार वाचवण्यासाठी पेरली आहेत. वाचक वाचू शकतात किंवा पुढे सरकू शकतात.

खालच्या उदाहरणात पाहा सर्व्हायकल कँसर साठी मानेचा फोटो लावलाय.

आणखी एक भाषांतर महाभयानक चा नमुना दाखवतो

आता हा अगम्य प्रकार दाखवतो

लिप्यन्तरातील गोंधळ तर एका वेगळ्या लेखाचा विषय आहे म्हणून येथे टाळतोय.

काही वाक्प्रचार व शब्द येताना शब्दशःआले व नंतर त्यांचा अर्थच समग्र बदलला.


पहिल्यांदा शब्दाचे उदाहरण. अफलातून कल्पना याचा ग्रीक तत्वज्ञ प्लेटोशी संबंध आहे असे सांगितले तर तुम्हास आश्चर्य वाटेल पण विकिपीडिया किंवा दाते शब्दकोश पाहिल्यास तुमची खात्री होईल. अफ़लातून हे ग्रीक प्लेटो चे आरबी रूप आहे. प्लेटो खूप हुशार होता पण अफलातून चा अर्थ विपर्यास होऊन तो शब्द आता मराठीत विलक्षण या अर्थी देखील वापरतात.  

दुसरे उदाहरण म्हणजे वामनपंडितांनी भर्तृहरिकृत शातकत्रयीचे समश्लोकी मराठी भाषांतर केलेलं आहे. त्यातील ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे!’ हा नितीशतकतील ५व्या श्लोकातील पहिला चरण असून, पूर्ण श्लोकाचा संदर्भ पाहता त्याचा अर्थ अतिशयोक्तीमय उपाहास आहे. पण आता ते स्फूर्तिवचन झाले आहे.  

लभेत सिकतासु तैलमपि यत्नतः पीड्यन्पिबेच्च मृगतृष्णिकासु सलिलं पिपासार्दितः ॥
कदाचिदपि पर्यटञ्शशविषाणमासादयेन्नतु प्रतिनिविष्टमूर्खजनचित्तमाराधयेत् ॥५॥

प्रयत्ने वाळूचे कणरगडिता तेलहि गळे ।
तृषार्ताची तृष्णा मृगजळ पिऊनीहि वितळे ॥
सशाचेंही लाधे विपिन फिरतां शृंगही जरी ।
परंतु मूर्खाचें हृदय धरवेना पळभरी ॥५॥

बॅक ट्रान्सलेशन 

आमच्या मेडिकल क्षेत्रात पेशंटच्या संमतीपत्रास अनन्यसाधारण महत्त्व आहे व ते पेशंटच्या भाषेत असावे असा दंडक आहे त्यामुळे असे भाषांतर करताना एक व्यक्ती इंग्रजीतून त्याचे मराठी भाषांतर करते. मग ते भाषांतर अनेक मराठी लोकांना दाखवले जाते व त्यातील न समजणारा भाग सोपा केला जातो. नंतर हेच भाषांतर दुसऱ्या तज्ज्ञास इंग्रजीत भाषांतरित करायला लावतात. मग दोन इंग्रजी दस्त एकमेकांना किती जुळतात हे पाहिले जाते व नंतरच भाषांतरावर शिक्कामोर्तब होते. जाहिरातवाले हा सोपा प्रकार का करत नाहीत खरंच कुतूहलाचा विषय आहे.    

 भाषांतरकाराना मिळणारा दुजाभाव 

भाषांतर करणे म्हणजे फक्त शब्दशः शब्दाला शब्दांची जोडणी करणे नसते. भाषांतरकारास प्रथमतः मूळ कृतीतील न बदलता येणारी येणारी तथ्यांची बीजे  कोणती व बदलता येण्याजोगी शब्दसजावट कोणती याची जाण हवी. मग मूळ कृतीतून सूक्ष्मपणे ही बीजे वेचून बाजूला ठेवावी लागतात. त्यांना मग नवीन भाषेत अलगद व अचूकपणे मांडावे लागते. त्यानंतर या बिजांच्याभोवती नवीन भाषेच्या शब्दाची सजावट रचावी लागते. हे करताना एकीकडे मूळरूपाशी एकरूपता टिकवायची असते तर दुसरीकडे नवीन भाषेतील वाचकाला कृत्रिमतेची जाण होऊ द्यायची नसते.त्यामुळे गुगल चे भाषांतर व मुरलेल्या भाषांतरकाराचे भाषांतर यात जामीन आस्मानचा फरक जाणवतो.

Nonfiction चे भाषांतर करताना काही फार नुकसान होत नाही. त्यात भाषालंकार, माधुर्य यास महत्त्व कमी असून विषयाच्या गाभ्यास महत्त्व जास्त असते. पण कादंबरीत मानवी भावना ओघवत्या भाषेने मूर्तरूपात मांडायच्या असतात.पद्य भाषांतर तर त्याहूनही कठीण त्यात तर गेयता व वृत्ताचे भान पण राखले पाहिजे. कदाचित भाषांतर विरुद्ध अनुवाद या वादाचे मूळ कादंबरी दुसऱ्या भाषेत उतरवताना करावे लागणारे परिश्रम हे आहे. एस एल भैरप्पा यांची ओळख मराठी वाचकाला उमा कुलकर्णी यांनी करून दिली, इंग्रजी जगातला महादेव देसाईंनी My Experiments with Truth मधून महात्मा गांधीजींची वेगळी ओळख करून दिली. पण पाश्चात्य पुस्तकांचे प्रकाशक कधी कधी अनुवादकांच नामोल्लेख करायची पण तसदी घेत नाहीत.

गद्य लेखकांत माझ्या किशोरवयात मला आवडणारे कादंबरीकार म्हणजे भा. रा. भागवत! त्यांचे रॉबिन हूड आणि त्याचे रंगेल गडी हे Robin Hood and his merry men वर आधारित पुस्तक खूप भावले. नंतर मोठे झाल्यावर मी इंग्रजी पुस्तक वाचले पण मराठीच जास्त खिळवून ठेवणारे होते. त्याउलट The Godfather, Coma या दोन्ही कादंबऱ्या मी प्रथम इंग्रजीत वाचल्या अगदी त्यांचा अथ पासून इति पर्यंत फडशा पाडला. नंतर दोन्हीची भाषांतरे मराठीत वाचण्यास घेतली. खर सांगू दोन्ही काही पाने पलटवल्यावर बाजूला ठेवली. यात दोष भाषांतराचा नसून , पहिल्यांदा वाचलेले पुस्तक अधिक परिणामकारक असते या कॉन्फरमेशन बायस चा आहे ,असे मला वाटते. त्यामुळे भाषांतरकारांना हा दुजाभाव देणे टाळले पाहिजे. 
मला सर्वात भावलेले पद्य भाषांतर म्हणजे मिरजेच्या डॉ. कृष्णानंद गोगटे यांनी एडगर गेस्ट या इंग्लिश कवीच्या डॉक्टर या कवितेचे चिरायू या नियतकालिकात छापलेले भाषांतर.

समारोप

भाषांतरे वाचताना वाचकाने व करताना लेखकाने पुढील वाक्य कायम लक्षात ठेवावे

“अनुवाद करणार्‍याने एका कुपीतले अत्तर दुसऱ्या कुपीत आले आहे एवढेच पाहावे. दोन्ही बाटल्यांचा आकार आणि काच सारखीच हवी असा आग्रह धरू नये”
– श्री.म.माटे

  1. https://www.allaboutbookpublishing.com/9284/record-year-for-print-book-sales-in-india/ ↩︎

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*