मराठीचे नेमके वेगळेपण
मराठीचे नेमके वेगळेपण : एक लेख
मराठी माझी मातृभाषा आहे. मला मराठी व्यतिरिक्त इंग्रजी ही एकमेव भाषा आहे जी व्यवस्थित कळते, लिहिता-बोलता-वाचता येते. हिंदी व तेलुगु कामचलाऊ बोलता येते, पण ऐकताना बऱ्यापैकी सर्व कळते. कन्नड समजते पण फारसे बोलता येत नाही. संस्कृत बोलायला नाममात्र येते पण व्याकरण बरंच वाचलंय.
पण या पाच सहा भाषांच्या अभ्यासात मला मराठी भाषेमध्ये एक विशेष गुण आढळला तो म्हणजे सामान्यरूप. आणि दुसरे एक वैशिष्ठ्य म्हणजे देशी व प्राकृत शब्द जे अकारांत स्त्रिलिंगी व आकारान्त पुल्लिंगी आहेत . पहिले वैशिष्ठ्य मराठी भाषेला फारच वेगळे ठरवते पण संस्कृतात देखील हा प्रकार आढळतो व दुसरे वैशिष्ट्य तिचे संस्कृतपासून वेगळेपण ठसवते.
त्यामुळे मला कोणी मराठीचे नेमके वेगळेपण विचारले तर मी सामान्यरूप हे उत्तर बिनधास्त देईन. व मराठी नंतर शिकून अस्खलित बोलणारा कितीही पट्टीचा असो, तोही नेमका कुठे अडखळतो तर त्याचे उत्तर “अकारांत स्त्रिलिंगी शब्दांच्या सामान्यरुपात” असे देईन.
सामान्यरूप मराठी सोडून इतर भाषांतही नाही असे नाही, इच्छुकांनी विकिपीडिया वर Declension वाचावे.
इंग्रजीचे कसे अगदी सोपंय! शब्दाला प्रत्यय लावताना शब्द किंवा शब्दाला अपोस्ट्रोफी लावलं की काम झालं. e.g. cat, cat’s, to cat, from cat.
हिंदी मध्ये पण शब्दाला प्रत्यय लावताना फार काही बदल होत नाही, अगदीच आकारांत पुल्लिंगी असेल तर त्याचे अनेकवचन करून त्याला प्रत्यय लावले जातात. उदा. मन मे , मन के , मन की किंवा चुल्हे मी , चुल्हे से.
आता मराठीत आपण कसे म्हणतो याचा विचार करा. ‘मन’ला मनच म्हणतो पण शब्द चालवताना मनास, मनाला, मनातील असे करतो. हे जे मन चे मना होते ते म्हणजे सामान्यरूप (declension).
संस्कृतमध्ये अकारांत म्हणजे पुल्लिंगी आणि आकारांत म्हणजे स्त्रीलिंगी असा सर्वसाधारण दंडक आहे. उदा. मनुष्य, देव, राक्षस हे सगळे पुल्लिंगी आहेत. वामा, पश्चिमा, क्षमा हे सगळे स्त्रीलिंगी आहेत. पुल्लिंगी आकारांत आला म्हणजे शक्यतो तो अन्नन्त, अन् , अस् किंवा ऋकारांत ने संपणाऱ्या पुल्लिंगी चा प्रथमा एकवचनी असतो उदा. राजा, सुधन्वा किंवा चंद्रमा, दुर्वासा, नचिकेता, दाता, कर्ता. स्त्रीलिंगी अकारांत संस्कृत मध्ये सापडायला महाकठीण अपवाद अम्ब म्हणजे अंबा चे संबोधन.
पण देशी मराठी शब्द ( ज्यांचे संस्कृत, किंवा इतर भाषांत मूळ सापडत नाही असे शब्द त्यांना व्याकरण शास्त्रात देशी किंवा देशज शब्द म्हणतात त्याचा भौगोलिक किंवा राजकीय अर्थ कृपया घेऊ नये ) किंवा प्राकृत मधून मराठीत आलेले असतात त्यात आकारांत असेल तर पुल्लिंगी असतो उदा. डोळा, हातोडा, घोटाळा, घोडा, कंटाळा, खिळा, मोळा; व अकारांत असेल बरेच वेळा स्त्रिलिंगी पण असतो उदा. वाट, नड, शेंग, मेख, खोड, तिफन, नाव.
अकारांत स्त्रिलिंगी शब्द हे संस्कृत च्या तुलनेत मराठीत तुलनेने खूप अधिक आहेत. संस्कृत मध्ये अकारांत स्त्रिलिंगी शब्द खूप प्रमाणात आढळत नाहीत. यातच मराठीचे संस्कृत शब्द मराठीत येताना त्यांची हाताळणी कशी होते यात वेगळेपण आहे.संस्कृत मधून हिंदी मध्ये येताना देखील काही स्त्रीलिंगी शब्द आकारांत चे अकारांत होतात जसे की पूर्वा (दिशा ) चे पूरब व पाश्चिमा चे पश्चिम होते.
पण मजेची गोष्ट अशी आहे की मराठीत विभक्तिप्रत्यय लागताना त्यांची सामान्यरूपे मूळ संस्कृत रूप काय आहे त्यावरून ठरतात. हिंदीत किंवा इंग्रजीत नामाचे/विशेषणाचे सामान्यरूप होणे हा प्रघात नियमापेक्षा अपवादाने आढळतो , तर मराठीत तो नियम असतो व विशेषनामे, तांत्रिक संज्ञा असे अपवाद सोडल्यास प्रत्येक नामास हा पाळावाच लागतो. एव्हडेच काय हाडाचा मराठी माणूस इंग्रजीतून घेतलेल्या शब्दांना देखील सामान्यरूप देऊन टाकतो उदा. “मास्तरांनी गणित शिकवले, डॉक्टारांचे प्रश्न, पँटेच्या खिशात पैशाचे पाकीट आहे पाकिटात लायसन्स आहे. माझा मित्र विंगेतून मला प्रॉम्प्ट करत होता त्यामुळे प्रयोग निभावला”
त्यामुळे जे लोक हिंदी भाषिक आहेत त्यांच्या मराठीत ‘सूर्य पश्चिमला मावळला’ (सूरज पश्चिम को ढला।) येते . पण मराठी माणूस आपसूकपणे ‘सूर्य पश्चिमेला मावळला’ म्हणतो. अर्थात आता मॉडर्न मराठी वातावरणात , ज्यात आपण बाहेर इंग्रजी व हिंदी बोलतो व घरी दिवसभर दूरचित्रवाणीवर हिंदी कार्यक्रम पाहतो, व मराठी पुस्तके अपवादाने वाचतो , त्या मराठीत सामान्यरूप न करण्याची फॅशन येऊ लागली आहे.
इंग्रजी शब्दांना कसे हो तुम्ही सामान्यरूपात बदलता? प्रश्न रास्त आहे कारण इंग्रजीत ही भानगड नाही . मान्य ! त्यांना सामान्यरूपात न करता हाताळू उदा. “सरना सांगू , पॅण्टमध्ये वॉलेट ठेऊ, पैसे ‘पाकिटात’ न ठेवता ‘वॉलेटमध्ये’ ठेवू.” एवढेच काय त्यांचे मराठमोळे अनेकवचन न करता इंग्रजी करू ” उदा. IMA ही डॉक्टर्स ची संघटना आहे , प्यांटी इस्त्रीवाल्याकडे न देता पँट्स इस्त्री साठी देऊ ” पण सामान्यरूप अगदीच हद्दपार करू नका हो. उदा. “१. मी त्या माणूसला सांगितले, २. गोवरचे रुग्ण , ३. नाशिक पुण्याचा उत्तरला आहे (उत्तरेला नाही) “.
जसे articles इंग्रजीचे व्यवच्छेदक लक्षण आहे त्याप्रमाणे सामान्यरूपाचा सर्रास वापर हा मराठी बाज आहे तो जपला पाहिजे. मराठी माणूस इंग्रजी बोलता-लिहिताना a, an आणि the वापरताना बऱ्याच वेळा गोंधळतो कारण आमच्या भाषेत article हा प्रकारच अस्तित्वात नाही तर तो कशाशी लावून खातात आम्हाला शिकविल्याशिवाय कसा कळणार? तद्वत इतर भाषकांचे ते जेव्हा मराठी बोलतात तेव्हा सामान्यरूप हा विषय त्यांना विस्ताराने शिकविल्याशिवाय कसा कळणार? त्यामुळे ‘नमनाला घडाभर तेल’ वाया घालवून आता अकारांत सामान्यरूपाकडे वळू.
मराठी भाषेत सहसा मूळरूपात अकारांत शब्दात जे शेवटून दुसरे अक्षर असते त्यावरती बोलताना जोर असतो त्यामुळे ते बऱ्याच वेळा दीर्घ लिहितात उदा. माणूस, कणीस. पण आता विचार करा ते नाम ( प्रत्यक्षात काहीही असो ) एक व्यक्ती आहे त्याला कसे बोलावणार? ‘अरे माणसा, अरे कणसा’ हो ना ? यात काय होतंय तर उपांत्य अक्षर कमी जोराचे होऊन शेवटच्या अक्षरावरचा जोर वाढतोय. जेव्हा तुम्ही पुल्लिंगी किंवा नंपुसकलिंगी नामाचे सामान्यरूप करता तेव्हा नेमके हेच करता उदा. माणसाचे मन, मनाला लागले, कणसाचे दाणे सोलले. थोडक्यात शेवटच्या अ चा आ झाला व उपांत्य अक्षर सौम्य झाले. आणि यात अनेकवचनात हा प्रयोग करायचा असेल तर त्यावर एक अनुस्वार लावावा. उदा. माणसांना, लोकांना.
आता अकारांत स्त्रीलिंगी शब्दांकडे वळू .अकारांत स्त्रीलिंगी शब्द हे संस्कृत च्या तुलनेत मराठीत तुलनेने खूप अधिक आहेत. संस्कृत मध्ये अकारांत स्त्रीलिंगी शब्द खूप प्रमाणात आढळत नाहीत. यातच मराठीचे संस्कृत शब्द मराठीत येताना त्यांची हाताळणी कशी होते यात वेगळेपण आहे. पण मजेची गोष्ट अशी आहे की मराठीत विभक्तिप्रत्यय लागताना त्यांची सामान्यरूपे मूळ संस्कृत रूप काय आहे त्यावरून ठरतात.उदा. ओळ हा शब्द त्याचे मूळ संस्कृत आवली मध्ये आहे त्यामुळे त्याचे सामान्यरूप ओळी होते. उदा. “एका ओळीत उभे राहा” आता तार हा शब्द घेऊयात तो मूळ संस्कृतात तारा या शब्दापासून आला आहे त्यामुळे त्याचे सामान्यरूप तरी न होता तारे होते उदा. ” तारेतून विद्युतप्रवाह जातो.”
ज्या शब्दांना काही संस्कृत रूप नाही त्यांना मात्र ए लावायच की इ हे वापरून व ऐकूनच शिकावे लागते. पण जेव्हा शंका असते तेव्हा ए ऐवजी इ वापरावे. उदा. बंदुकीची गोळी. खरंच हे इतके किचकट आहे की जे माझ्यासारख्या मराठी मातृभाषा असणाऱ्याला सहज जमते पण नियमात लिहून दाखव म्हणले की अडचण येते. एबनेझेर बरगेस या अमेरिकन माणसाने इंग्रजीतून मराठीचे व्याकरण १८५४ मध्ये जेव्हा लिहिले तेव्हा चक्क त्याने २७३५ अकारांत स्त्रीलिंगी शब्दांची यादी बनवली आणी ए प्रत्यय लागणारे २३५ शब्द बाजूला काढून वाचकास चक्क सांगून टाकले की उरलेल्या शब्दांना इ लावा. अर्थात उरलेल्या शब्दांमध्ये देखील ५०० वर थोड्या शब्दांना इ किंवा ए दोन्ही सामान्यरूपे चालत होती व २३६ शब्दांची पक्की नव्हती. थोडक्यात अकारांत स्त्रीलिंगी शब्द चालवून दाखव ही खरी मराठीपणाची चाचणी आहे की नाही?
डॉ. सुधन्वा रा. पाठक
मिरज २०/११/२२

Leave a Reply