एका व्याख्यानाने घडवलेले विचारमंथन
बऱ्याच दिवसांनी खरे मंदिर येथील प्रांगणात वसंत व्याख्यानमालेतील एक पुष्प ऐकण्याचा योग आला. तशी मिरजेतील वसंत व्याख्यानमालेस जवळजवळ शतकाची परंपरा ( मी आज ऐकणार होतो ते ९७व्या मालेतील आठवे पुष्प) असल्याने मिरजेच्या संस्कृतीची ती एक अविभाज्य घटक बनली आहे. विषय पण आवडता होता “ स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी भाषेचा प्रवास ” वक्त्या होत्या डॉ. नीलिमा गुंडी एम.ए., पी. एच. डी ., डी .एच. ई . त्यांनी रामनारायण रुईया महाविद्यालय मुंबई व नंतर स. प. महाविद्यालय पुणे येथे मराठीचे अध्यापन केलेलं आहे व माराठीत विपुल लेखन देखील. मराठी भाषेवर संशोधन आहेच शिवाय वेगवेगळ्या भाषाविषयक समित्या, अभ्यासगट यांत ही सहभाग घेतला आहे. त्यामुळे त्यांचे व्याख्यान ऐकणे ही माझ्या सारख्या मराठीभाषाप्रेमीस सुवर्णसंधीच होती.
भाषणास सुरुवात संध्याकाळी ७ ला झाली, अध्यक्षस्थानी डॉ. बी. टी. कुरणे होते.
भाषण खूप मुद्देसूद, कोणतेही पाल्हाळ न लावता झाले. त्यात कविता, कवी साहित्य लेखक यांचे संदर्भ खूप सहजतेने व मुबलक प्रमाणात पेरले होते , अर्थात अनेक वर्षांच्या संशोधनाने व सरावानेच वक्त्यास ही सिद्धी प्राप्त होते. भाषण तल्लीनपणे ऐकले पण रेकॉर्ड केले नाही. चोरून भाषण ध्वनिमुद्रित करणे यात मजा नाही व नैतिकपणाचे ही नाही. पण काही मुद्दे पटकन मोबाईलवर टिपून घेतले. त्याआधारे माझ्या ज्ञानात जी भर पडली किंवा काही मुद्दे लक्षवेधी वाटले त्यांना या लेखाच्या माध्यमातून एका मराठीप्रेमी कडून दुसऱ्या मराठीप्रेमीला या भूमिकेतून त्यांचे वाटप करावेसे वाटते. पुढील शब्द माझे आहेत पण त्यामागे असणारे मुद्दे डॉ. गुंडी यांनी त्यांच्या भाषणात व्यक्त केलेले आहेत. त्या मुद्यांना अवतरण चिन्हात व ठळक छाप वापरले आहेत. इतर शब्द माझे असून हे शब्दशः माननीय वक्त्यांचे भाषण आहे असा ग्रह कृपया वाचकाने करून घेऊ नये, तसेच खालील मांडलेली सर्व मते वक्त्याची नसून काही मते माझीही आहेत.
या वैचारिक मंथनाची मांडणी करताना मी खालील सदारांखाली त्यांची मांडणी केली आहे.
१. या भाषणातून मी कोणकोणत्या नवीन गोष्टी शिकलो त्यांचा गोषवारा
२. मराठीपुढील सध्याची आव्हाने कोणकोणती आहेत या व्याख्यानात काळजी त्यांच्याबाबत
३. मराठीचे भवितव्य काय असेल याबाबत व्याख्याती महोदयांनी मांडलेली मते. यातील काही व्याख्यानानंतरच्या प्रश्नोत्तरे झाली त्यात मंडळी गेली.
४. माझी मते. ही मते निव्वळ माझी आहेत.
भाषणातून मी नवीन काय शिकलो?
“मराठी भाषा एक शब्दसमृद्ध भाषा आहे“
मराठीचे शब्दभांडार खूप मोठे आहे. मराठी भाषेचे इतके शब्दकोश आहेत की एतद्देशीय आंग्लेतर भाषांमध्येपण आढळणार नाहीत.
प्रसिद्ध शब्दकोशांमध्ये अनेक आहेत.
मराठी मध्ये विश्वकोश ही कल्पना नवी नाही व आता मराठी विश्वकोश महाजालावर ही उपलब्ध आहे. डॉ. केतकर यांचा कोश देखील प्रसिद्ध आहे. स्वातंत्र्योत्तर काळात मराठी व्यवहार भाषा बनवण्यासाठी पारिभाषिक शब्दकोशांची निर्मिती महाराष्ट्र शासनाने तज्ज्ञांद्वारे करून घेतली आहे, ते कोशही महाजालावर उपलब्ध आहेत.
“मराठी भाषा अभिजात भाषा आहे”
अभिजात भाषेचे काही निकष भारत सरकारने बनवले ते सर्व निकष मराठी भाषा उत्तीर्ण होते हे पठारे समितीने त्यांच्या अहवालात खूप सशक्तपणे व पुराव्यानिशी मांडले आहे. अभ्यासकांनी हा अहवाल नक्की पाहावा. त्यामुळे अभिजात मराठी ची मागणी रास्त असून त्यामुळे मराठी संवर्धनास मदत होईल.
“मराठी साहित्यनिर्मितीचे लोकशाहीकरण”
सवातंत्र्योत्तर काळात नवसाक्षरांचा एक मोठा वर्ग तयार झाला , त्यामुळे मराठी साहित्यिक एका ठराविक परंपरागत चौकटीबाहेर साहित्यनिर्मिती करू लागला. काही प्रवाह विद्रोही देखील होते. पण हे विद्रोह विचारसरणीचे होते, भाषेविरुद्ध विद्रोह कधीही झाला नाही त्यामुळे मराठी साहित्य आणखी समृद्ध तर झाले पण त्याहून महत्त्वाचे सर्वसमावेशक देखील झाले. सध्याच्या काळत समाजमाध्यमे या लोकशाहीकरणास अधिक बळकट बनवतायत. त्यांनी रिपोर्ताज ब्लॉग यासारखे नवीन साहित्यप्रकार मराठीला दिले. महाजालामुळे प्रांत,देश या पलीकडे जाऊन मराठीचे जागतिकारण सुलभरीत्या होतंय.
“प्रमाणभाषा व बोलीभाषा यांचे महत्त्व”
दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत व डावलता येत नाही.
भाषेच्या प्रामाणिकरणामुळे आदानप्रदानाचा संयुक्त व सुटसुटीत दुवा तयार करता येतो. त्यामुळे १९६०-६२ च्या काळात मराठी शुद्धलेखनाचे (खरेतर प्रमाणलेखनाचे ) नियम तज्ज्ञानी बनवले व सरकारने शालेय अभ्यासक्रमात राबवले. हे नियम सर्वाना तोंडपाठ आहेत पण या भाषणातून एक नवीन गोष्ट मला कळली म्हणजे २००९ साली महाराष्ट्र शासनाने भाषाप्रमाणीकरणासाठी आणखी पुढची पावले टाकली व एक सुधारित नियमावली प्रसिद्ध केली आहे.
मराठीत अनेक बोलीभाषा आहेत व काही भाषातज्ज्ञ या बोलीभाषांचे सर्वेक्षण, व्याकरण, व साहित्यनिर्मिती यांत व्यग्र आहेत. त्यामुळे बोलीभाषांचे संवर्धन होईल.
“भाषेतील वाक्प्रचार व म्हणी हे आपल्या पूर्वजांचे उच्छवास आहेत ”
संस्कृती व भाषा यांचे नाते अतूट असते. प्रत्येक वेळची सामाजिक स्थिती भाषेला म्हणी व शब्दप्रयोग यांच्या रूपात आपल्या पाऊलखुणा मागे सोडत असते. त्यांच्या रूपाने जणू आपण आपल्या पूर्वजांच्या स्थितीशी जोडले जातो. उदाहरण देताना डॉ. गुंडी यांनी “मुसळधार पाऊस पडणे” चा उल्लेख केला. आज मुसळ घरातून हद्दपार झाले आहे किती लहान मुलांना माहीत पण नसेल ते कसे दिसते ते. पण मुसळधार पाऊस काय ते सर्वाना चांगले कळते.
मराठीच्या पुढील आव्हाने याबाबत
डॉ गुंडी यांनी भाषणात मराठीचे केवळ कौतुक न करता मराठी पुढील भाषेची आव्हाने देखील विशद केली.
“इंग्रजीचे अतिक्रमण “
मराठी माध्यमाशी इंग्रजीची स्पर्धा होतेय व इंग्रजीची ह्यात सरशी होताना दिसत आहे. इंग्रजी हीच जगाची भाषा हा समज इतका दृढपणे सर्व पातळ्यांवर झाला आहे की तो नाकारणे अशक्यप्राय झाले आहे. १९९० च्या दशकात जेव्हा इंग्रजीचे स्तोम वाढत होते तेव्हा कायद्याच्या जोराने मराठी सर्व शाळात अनिवार्य केले गेले नाही व यामुळे मराठीची पीछेहाट झाली. इंग्रजी शब्द मराठीत घेण्याबद्दल वाईट नाही पण जेव्हा गर हा सोपा शब्द असताना लहान मुलगा “मला आंब्यातील फ्लेश काढून दे म्हणतो” तेव्हा दोष त्याचा नसतो कारण त्याला गर हा शब्द माहीतच नसतो. मराठीचे शिक्षणातून असे हद्दपार होणे ही धोक्याची घंटा आहे.
“भाषातज्ज्ञ तयार होत नाहीत व त्याना वापरले जात नाही”
“ज्याप्रमाणात साहित्यनिर्मिती होत आहे त्याप्रमाणात मराठी भाषेत भाषातज्ज्ञांचा वापर केला जात नाही.विशेषतः जाहिरात क्षेत्रात मराठीची जेवढी मोडतोड होते तिथे कोणताही माध्यमसमूह भाषातज्ज्ञाची मदत घेत नाही.” डॉ. गुंडी यांच्या मते भाषाशास्त्रास आणखी प्रोत्साहन दिले पाहिजे त्यात तज्ज्ञ बनवले पाहिजेत त्यामुळे दर्जेदार, सुलभ शब्दनिर्मिती होइल व प्रमाणभाषेचे सरकारनेच बनवलेले नियम काटेकोरपणे पळले जातील. भाषातज्ज्ञाची वानवा असल्याने मराठीत जे पारिभाषिक शब्दनिर्मितेचे उदंड कार्य झाले आहे त्याची कार्यवाही त्या प्रमाणात होत नाही.
“वाचनसंस्कृतीचा ऱ्हास”
मराठीला जशी समृद्ध लेखनपरंपरा आहे तशी एके काळी वाचनपरंपरा ही होती. पण सध्याच्या पिढीचा कल जेवढा इंग्रजी वाचनाकडे आहे तेवढा मराठी वाचनाकडे नाही. भाषा टिकवायची असेल तर मराठी वाचक वर्ग तयार करणे ही गरजेचे आहे. तंत्रज्ञानाने लिखाण व त्याचे प्रकाशन सोपे केले आहे पण वाचणारेच कोण नसेल तर हा उत्साह निघून जाईल.
“व्यवहारभाषा इंग्रजी/हिंदी व भावनांची भाषा मराठी”
ह्या स्थितीमुळे मराठीची वाढ मराठी ज्यांची मातृभाषा नाही अशा समूहात कधीच होणार नाही त्यामुळे रोजच्या व्यवहारात व विपणात(trade) मराठीचा हा वापर कमी होतोय. ही गोष्ट समाजवताना डॉ. गुंडी यांनी श्री द. भा. धामणस्कर यांच्या एका कवितेचा सुरेखपणे संदर्भ दिला.
मराठीचं भवितव्य काय? याबाबत
डॉ. गुंडी यांनी भाषा कशी टिकून राहते त्यास तीन भाषेचे गुणधर्म सांगितले “१. भाषेचा सशक्तपणा २. भाषेची रग ३. भाषेची लवचिकता”
१. भाषेचा सशक्तपणा: मराठी भाषेचा सशक्तपणा पूर्वविदित आहे
२. भाषेची रग: माणसाची जशी रोगप्रतिकारक्षमता असते तशी भाषेला रग असते. परभाषिक प्रभाव मराठीला नवीन नाही आज जे इंग्रजी व हिंदी करतायत ते पूर्वी संस्कृत, फारसी, अरबी यांनी मराठीवर केले आहे मराठीने त्यांचा मुकाबला करताना त्यांच्यातील शब्द मुबलक प्रमाणात स्वीकारले पण मराठीचा मूळ गाभा तोच राहिला त्यामुळे मराठीमध्ये रग आहे.
३. भाषेची लवचिकता: परिस्थितीबरोबर अनुकूलन करणे मराठीने अॅ व ऑ हे दोन नवीन स्वर घेऊन लवचिकता सिद्ध केली आहे अशी अनेक उदाहरणे आहेत.
हे तिन्ही गुणधर्म मराठीत आहेत त्यामुळे मराठी टिकून राहील.
पण त्यासाठी प्रत्येकाने कोणीतरी येईल आणि हे आव्हान पेलेल ह्याची वाट न पाहता आपापल्या परीने प्रयत्न हा केलाच पाहिजे. मराठीला व्यवहार व विपणन भाषा बनवले पाहिजे. अशी पाऊले काही संस्था टाकतायत. काही मराठी वर प्रेम करणारे अमराठी विद्वान विदुषी आहेत त्यांचेही कार्य वाखाणण्या जोगे आहे. मुंबई विद्यापीठाच्या जर्मन भाषा प्रमुख डॉ. विभा सुराणा यांनी “मराठी शिकू या” हा अभ्यासक्रम तयार केला आहे त्याचा अनेक लोकांना फायदा झाला आहे.
माझी मते
१. मला तर असे वाटते की टीव्ही वरील बातम्या देणाऱ्या वाहिन्यांनी, वृत्तपत्रांनी, प्रकाशकांनी भाषातज्ज्ञ ही बाब गंभीरतेने घ्यावी व आपापल्या वृत्तवाहिनीवर, प्रकाशकांनी मुद्रितशोधन करण्यास पगारी भाषातज्ज्ञ नेमावेत त्यांना सहज शक्य आहे. त्यामुळे भाषेची मोडतोड थांबेल व धूळ खात पडलेले परिभाषाकोश परत वापरात येतील.प्रमाणभाषा अधिक अभिव्यक्ती-प्रमाण होतीये ती तज्ज्ञ-प्रमाण राहिली पाहिजे. गुगल वर २००९ च्या मराठी लेखन सुधारणा या सहज उपलब्ध आहेत त्याची अंमलबजावणी करावी. https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/English/20091106130447001.pdf
२. फेसबुक ट्विटर व्हाट्सअप ही आजची माध्यमे आहेत फक्त पुस्तके वर्तमानपत्रे नव्हेत. या माध्यमांवर इतकी सारी मराठी भाषेसाठी काम करणारी सरकारी , निमसरकारी व सेवाभावी मंडळे आहेत त्यांची उपस्थिती नगण्य आहे व जी हजार आहेत ती शांत निपचित पडून आहेत. त्यांनी आपली उपस्थिती या माध्यमांवर अधिक ठळक व प्रभावकारी ठेवावी.
३. जोपर्यंत मेडिकल व इंजिनियरिंग चे शिक्षण मराठीतून चालू होत नाही तोपर्यंत इंग्रजीला मराठी सक्षम पर्याय ठरू शकत नाही. (माझे याबाबत विस्तृत मत या ब्लॉग मध्ये आहे) शिक्षणच खुंटले तर वाचन खुंटते, शब्दवैविध्य नष्ट होते व कोणत्या ठिकाणी नेमका कोणता शब्द वापरावा हे प्रयोजन देखील कळत नाही.
४. भाषाशास्त्र याबाबत मराठीच्या पुस्तकात एकही धडा आमच्या काळी नव्हता आताची परिस्थिती माहित नाही पण पाठ्यक्रमात भाषाशास्त्र, व्याकरण, व्युत्पत्ती यांची गोडी लहान मुलांना लावा.
५. भाषा तज्ज्ञांनी देखील फक्त सरकार, विद्यापीठ पुरवतील ते या चाकोरीबद्ध संसाधनांवर अवलंबून न राहता तुमचा ‘एन्ड युझर’ मराठी कशी वापरतोय हे पाहण्यासाठी ट्विटर फेसबुक मायबोली सारखी पोर्टल्स यांच्यावर जास्त देवाणघेवाण करावी त्यामुळे त्यांची विद्वत्ता पुस्तकाच्या बाडात कैद न होता भाषेच्या लोकशाहीकरणाच्या प्रवाहास आणखी बळ देईल.
६. तुमच्या माझ्या सारख्या हौशी लेखकांनी देखील मराठी प्रमाणलेखनाचे सरकारी नियम काय आहेत त्याचा अभ्यास करावा त्यास फार वेळ लागत नाही, ते अवघडही नाहीत व त्यांचे पालन करावे.
७. दैनंदिन व्यवहारात आवर्जून मराठी वाचा, मराठी लिहा , मराठी बोला.

सुधन्वा तू जी काही म्हणून माहिती मिळवली आणि इथे लिहिली आहे, तिचे जेवढे कौतुक कराव तेवढ कमीच आहे . थोडक्यात बोलायचे तर ….. मराठी भाषा पहिला आपापल्या घरातून सुरु (म्हणजे बोलली आणि लिहिली गेली पाहिजे ) व्हायला पाहिजे . तरच ती पुढे जाऊन टिकेल आणि वाढेल .
अतिशय कळकळीनं आणि सूक्ष्म विचार करून लिहिलेलं आहे.
नीलिमा गुंडाच्या भाषणाचा उत्तम आणि नेटका, मुद्देसूद गोषवारा.
तुम्ही सुचवलेले सर्व मार्ग आचरणीय, अनुकरणीय. पण ते प्रत्यक्षात कसे उतरणार!