मराठी वैज्ञानिक लेखन

( सूचना : मी एक सर्जन आहे, मराठी विषयाचा व्यासंग, अभ्यास, संशोधन, साहित्य लेखन यापैकी मी काही केलेलं नाही. पण मराठी माझी मातृभाषा असल्यामुळे व माझे दहावीपर्यंतचे सर्व शिक्षण मराठी माध्यमातून झाले असल्याने मराठी भाषेतून शिक्षणाबद्दल थोडेसे ‘व्यक्त होतोय’!)

सध्या नाशिक येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चालू आहे. विद्यमान अध्यक्ष श्री. जयंत नारळीकर हे स्वतः एक ख्यातनाम खगोलशास्त्र संशोधक आहेत. त्यांचा अभ्यास गाढा आहे, अनेक शोधनिबंध त्यांनी सिद्ध केलेले आहेत. पण, त्याबरोबर त्यांनी मराठी विज्ञान कथा लिहिल्या तसेच विज्ञानाधारित ललित साहित्य व कादंबऱ्या ही लिहिल्या आहेत. त्यामुळे मराठी विज्ञान साहित्य, थोडेसे का होईना, प्रकाशझोतात आले आहे. खरे तर सर्वाधिक खपाच्या मराठी पुस्तकांमध्ये निम्मी ही इंग्रजी प्रसिद्ध पुस्तकांची भाषांतरे असतात. मराठी पुस्तकांमध्ये ऐतिहासिक कादंबऱ्या, विनोदी शैलीतील लेखन व कविता खपाबाबतीत अग्रगण्य असतात. त्यामुळे विज्ञानविषयी साहित्य प्रसिद्धीस येणे खरेच कौतुकाचा विषय आहे.

पाश्चात्य देशांमध्ये science fiction म्हणजे विज्ञानाधरीत पण काल्पनिक लेखन मग ते लघुकथा असोत, कादंबरी असोत , कॉमिक्स असोत किंवा चित्रपट असोत, अगदी कविता पण, साहित्याची जितकी काही रूपे आहेत तिथे तिथे विज्ञान लेखनाने आपली अमीट छाप उठवली आहे. असिमोव , जुल्स व्हर्न , एच जी वेल्स यांना तर लोकांनी त्यांच्या लेखनामुळे लोकांनी डोक्यावर घेतले. जुरासिक पार्क, स्टार वॉर्स सिनेमांची मालिका, किंवा मॅट्रिक्स सारखे सिनेमे ज्यांत विज्ञानाचा साचा व नेहमीच्या व्यावसायिक सिनेमाच्या क्लुप्त्यांचे सारण भरून करोडो डॉलर छापले गेले. अर्थात सिनेमाच्या क्षेत्रात हॉलिवूड ची बरोबरी करणे आर्थिक गणितात न बसणारे आहे. पण साहित्य लिहिण्यास लेखकाचे स्वतः चे वाचन, प्रतिभा व ती पुस्तकरूपे प्रगट करणे हे तर शक्य आहे. पण खंत याची वाटते की मी आज व्हर्न चे अराउंड द वर्ल्ड इंग्रजीत वाचलेले आहे पण बाळ फोंडकेंचे मराठी गुडबाय अर्थ नाही वाचलेले. नारळीकरांचे एकही पुस्तक वाचलेले नाही. खरंच वाटते का असे?

  • विज्ञानाची भाषा आपण मराठी बनवू शकलो नाही. उलट स्वातंत्र्यापासून १९९० पर्यंत मराठीतून विज्ञान शिकवण्याची घडी निदान दहावी पर्यंत उत्तम बसली होती व २१ व्या शतकात तोच पायंडा उच्चशिक्षणात पाडला जाईल अशी अपेक्षा होती तर झाले उलटेच. मराठी शाळांनी हुशार मुले टिकून राहावीत म्हणून सेमी-इंग्लिश नावाचा प्रयोग केला पण नेमका तोच मराठी माध्यमावरच बूमरँग होतोय.
  • ज्या वयात मुले sci fi वाचू लागतात म्हणजे दहावी पासून वगैरे तो काळ मुलांचा अभ्यासाच्या चरकातून पिळून चिपाड बनावयाचा असतो. अवांतर वाचनास वेळ नाही !
  • पुढे जर विज्ञानाचा संबंध तुटला जसे माझा व मेकॅनिक्सचा बारावी नंतर. कारण मी मेडिकल ला गेलो आणि या गोष्टींचा विसर पडला. आता जर मी त्यावर काही वाचू लागलो व त्यात तांत्रिक भाषा ( jargon) ठासून भरली असेल तर मी दोन मिनिटांत झोपून जाईन.
  • ज्या गोष्टी आपण रोज वापरतो, पाहतो त्यांमध्ये आपल्याला रस जास्त असतो. उदाहरणार्थ विजेवरची गाडी कशी चालते, मोबाईल फोन चे जाळे कसे बनलेले आहे, चंद्र सूर्य तारे इ. पण लेखक म्हणून विचार करू लागलो तर इंग्रजी साहित्यात अनेक सरस पुस्तके असतात त्याउलट मराठीत लिहिताना मोबाईल लिहायचं की भ्रमणध्वनी इथून सुरुवात होते. व्यवहारात पारिभाषिक शब्दांची वानवा.

विज्ञानाची भाषा मराठी का बनू शकली नाही?

१८३५ साली English Education Act आला व इंग्रजी ही पूर्वनिर्धारित ज्ञानभाषा (default language of learning ) बनली.
पुढील ११२ वर्षे १९४७ पर्यंत हा पर्याय कधीही बदलला गेला नाही. त्या कायद्याचा उद्गाता लॉर्ड मेकॉले च्या अनेक उद्दिष्टांपैकी एक असेही होते की “a class of persons, Indian in blood and colour, but English in taste, in opinions, in morals, and in intellect” तयार करणे आणि त्यात त्यास घवघवीत यश प्राप्त झाले. ब्रिटिशांनी मराठीचा अभ्यास व संवर्धन केले पण ते त्यांच्यातील विद्वानांच्या हौसेसाठी आणि त्यांना फायद्याच्या गोष्टीमध्येच. मराठी ज्ञानभाषा व्हावी यासाठी भारतीय लोकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात प्रयत्न केले नाहीत असे नाही पण त्यास फारसे पाठबळ नव्हते. कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज, बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड, मिरजेचे राजे बाळासाहेब पटवर्धन यांनी त्यांच्या राज्यात मराठी साहित्य व अध्ययनाला खूप प्रोत्साहन दिले. इतर साहित्य बहरले पण महाविद्यालयीन वैज्ञानिक शिक्षण विद्यापीठात व विद्यापीठे ब्रिटीशांच्या देखरेखीखाली इंग्रजीत होती त्यामुळे विद्यापीठाची ज्ञानभाषा इंग्रजी हीच रीत रूढ झाली.

१९४७ ला स्वातंत्र्यप्राप्ती झाली. आपल्या स्वातंत्र्यसंग्रामात स्वदेशी या सूत्रास अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वातंत्र्यसंग्रामात विचारसरणी कोणतीही असो प्रत्येकाने स्वदेशी ला मान दिलाच होता. त्यामुळे स्वदेशी धोरणामुळे स्वातंत्र्योत्तर काळात स्वभाषेला एक मोकळा श्वास मिळाला. अनेक राष्ट्रभक्त ज्यांचे शिक्षण इंग्रजीत झाले होते त्यांनादेखील आपल्या मातृभाषेत विज्ञानलेखन व्हावे असे वाटू लागले. मराठी माध्यमात शिकणे महाराष्ट्रात मानाचा विषय ठरला. “दिनांक, महापौर, निविदा, न्यायालय , न्यायमूर्ती , प्रशासन” हे आपल्या रोजच्या वापरातील शब्द स्वातंत्र्यपूर्व काळात अस्तित्वात नव्हते ते १९४७-१९६० या काळात मोठ्या प्रमाणात मराठीत आले व कधी आपलेसे झाले हे कळलेच नाही. १९६० मध्ये प्रमाणलेखन नियमित करण्यात आले. या काळात तांत्रिक विषय देखील पूर्ण मराठीत आणावेत या विचारप्रवाहाने जोर धरला होता.

एक चांगले उदाहरण द्यावयाचे म्हणजे, सोलापूरचे प्रा. म. गो. टोळे यांनी चक्क Einstein’s Special Theory of Relativity वर आईन्स्टाईन चा मर्यादित सापेक्षतावाद हा ग्रंथ लिहिला. त्यात त्यांनी एकूण एक मराठी शब्द वापरलेच शिवाय derivatives च्या चिन्हांऐवजी मराठी अक्षरे प्रयोजली जिथे ग्रीक अक्षरे वापरली होती तेथे मोडी लिपीतली अक्षरे वापरली. १९५६ साली लिहिलेल्या या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लेखकाने स्पष्ट केलेली भूमिका खरोखरीच उद्बोधक आहे. वाचकांनी कृपया वाचावी.

 

प्रा. टोळे यांच्या “आईन्स्टाईन चा मर्यादित सापेक्षतावाद” च्या प्रस्तावनेतून साभार

एव्हडे सगळे चांगले चालू असताना खीळ कोठे बसली?

मला वाटते : STEM ( गणित, विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान) व वैद्यकीय क्षेत्रांमध्ये पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम हा इंग्रजी सोडून मराठी सोडून इतर एतद्देशीय भाषांमध्ये उपलब्ध झाला नाही.  एकाच वेळी बालवाडी ते पदव्योत्तर सर्व शिक्षण मराठीत कधीच केले गेले नाही. दहावी पर्यंतचे शिक्षण मराठीतून चांगल्या प्रकारे स्वीकृत झाले कारण ते शिकण्यास, शिकवण्यास व उजळणी करण्यास उपयुक्त होते. कितीही झाले तरी मातृभाषेतील शिक्षण हो ते! पण जेव्हा शाळा मराठीतून झाल्या तेव्हा विज्ञान विषयाची महाविद्यालयीन शिक्षणाची सोय तुटपुंजी झाली. मेडिकल व इंजिनियरिंग (वैद्यकीय व अभियांत्रिकी हमखास म्हणू शकलो असतो मुद्दामून टाळतोय) कायमच इंग्रजीत शिकवण्यात आले त्यात मराठी पर्याय कधीच नव्हता त्यामुळे १०वी पर्यंत शिकलेले मराठी विज्ञान 1ST MBBS च्या ANATOMY PHYSIOLOGY च्या रट्ट्यात कापरा सारखे कधी ‘संप्लवन’ पावले कळतच नाही. BSc च्या बाबतीत ते मराठीत करता येते का हे मला माहीत नाही. थोडक्यात वापर नाही तर मागणी नाही व मागणी नाही म्हणून वापर नाही हे दुष्टचक्र चालू झाले ते सुरवातीला बैलगाडीच्या वेगाने फिरत होते आता मोटारगाडीच्या वेगाने फिरतंय.

असा पर्यायाचा विचारच का केला गेला नाही ही खरोखरी खेदाची गोष्ट आहे. डॉक्टर बनावे म्हणून आज लोक १ वर्ष रशियन भाषा शिकून रशियात रशियन मधून वैद्यकीय शिक्षण घेतात. जर महाराष्ट्रात पूर्ण मराठीत शिक्षण देणारे वैद्यकीय महाविद्यालय असते व त्याची पदवी सरकारमान्य असती; तर हमखास लोकांनी त्यास प्रवेश घेतला असता. पण इंग्रजीने चालतंय तर सगळ्यांचा रोष ओढवून, सगळी भाषांतरे करायचे कष्ट करून फक्त एक महाविद्यालय कोण काढणार? भावनाशून्य व पूर्ण व्यावसायिक विचार केल्यास ही गोष्ट “बाजूला चाक तयार असताना परत चाकाचा शोध लावणे आहे”. त्यामुळे जोपर्यंत इंग्रजी वैद्यकीय महाविद्यालय आहे तोपर्यंत असे महाविद्यालय तयार झाले नाही व सहजपणे होऊ शकणार नाही.

दुसरा एक मुद्दा मराठीवर कितीही प्रेम असले तर आपण विसरू शकत नाही. १९९० नंतरचा भारत globalization चा भारत आहे. १९९० च्या दशकात IT क्षेत्रात क्रांती सुरु झाली. मराठी माणूस बेंगळुरू पासून सॅन होजे पर्यंत जगाच्या पाठीवर व्यवसायासाठी फिरू लागला. मेडिकल क्षेत्रात देखील चेन्नई, हैदराबाद, व बेंगळुरू यांनी मोठाली centres of excellence चालू केली त्यामुळे मराठी डॉक्टर्स ही तेथे मोठ्या प्रमाणात जाण्यास सुरुवात झाली. एकविसाव्या शतकात दळणवळण सुलभ झाले, क्रयशक्ती वाढली त्यामुळे मराठी बांधव पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात पुण्यामुंबई पलीकडे विचार करू लागले आहेत.त्या प्रांतामध्ये मराठी पेक्षा इंग्रजी वर प्रभुत्व अधिक असेल तर आपणास प्राधान्य मिळेल, माझी मुले तिथे गेली तर इंग्रजीत शिकत असतील तर शाळा लगेच मिळतील हा व्यावहरिक विचार कोणही करेल त्यामुळे मराठी माध्यमाचे सुगीचे दिवस संपले. इंग्रजी भाषा तिला इतके दिवस लगाम बसला होता ती मराठीवर डोईजड ठरली व तिचा मराठीवरील दाब दिवसागणिक वाढतो आहे.

नोकरी देणारी भाषा व्हावी :

कितीही सोंगे काढली तरी पैशाचे सोंग काढता येत नाही, पैसा कमवण्यास जर इंग्रजी माध्यमात शिकल्यामुळे अधिक संधी मिळत असतील तर पालकांना तुम्ही इंग्रजी माध्यमातून मुलांना का शिकवता असे विचारणे व्यर्थ आहे! असा विचार करावा की, मराठी मध्यम घेतल्याने व्यावसायिक संधी अधिकाधिक कशा उपलब्ध होतील.आज महाराष्ट्रात सरकारी क्षेत्रात नोकरी हवी आहे ना तर मराठीची एखादी परीक्षा ठेवा. तेवढी मराठी आल्याशिवाय हुद्दा स्वीकारता येणार नाही. आपोआप मराठी शिकण्याचा कल वाढेल. पण ही सक्ती वैज्ञानिक क्षेत्रांत करणे किती व्यावहारिक आहे? मराठी सिनेनिर्मितीस जशी सरकार ने प्रोत्साहक भूमिका घेतली तशीच विज्ञान साहित्याबद्दल ही घ्यावी. राजमान्यता मिळाल्यावर लोकमान्यता आपोआप मिळते. 

अपप्रचार थांबवा 

मराठी माध्यमात गणित व शास्त्र  शिकल्याने अकरावी व बारावी डोक्यावरून जाते व एंट्रन्स (प्रवेशपरीक्षा) ला मार्क कमी मिळतात अशी पूर्णपणे निराधार व अशास्त्रीय असलेली मराठी माध्यमाची नालस्ती आमच्या विद्यार्थी दशेत फार भाव खाऊन गेली. त्यामुळं झाले काय? तर मराठी शाळांमध्ये शास्त्र व गणित सेमीइंग्लिश या गोंडस नावाखाली इंग्रजीतून शिकवणे चालू झाले.  पण माझ्यासह माझ्या वर्गातील डझनभर अशी उदाहरणे आहेत की आम्ही शुद्ध मराठी माध्यमातूनही शास्त्र व गणित शिकून पुढे मेडिकल ला शिकताना कोणतीही अडचण आली नाही. 

भाषेसाठी पर्याय काय?

मान्य करा व मनाशी पक्की खूणगाठ बांधा की इंग्रजी प्राथमिक ज्ञानभाषा होती, आहे व राहील. मराठी पर्याय कसा बनू शकतो हा वेगळा विषय आहे व तो शासन व भाषातज्ज्ञ सांभाळून घेतील. 

पण तरी देखील काही सुचवावे वाटते :

  • पर्यायी शब्द निवडताना सोपे असावेत. लिहायला वाचायला व बोलायला सोपे शब्द निवडा. संस्कृत समृद्ध भाषा आहे. इंग्रजी पारिभाषिक शब्द तयार करताना जो मान लॅटिन ला मिळतो तो संस्कृतला मिळाला पाहिजे. पण मराठीचे बळजबरीने अतिसंस्कृतीकरण नको! डोळ्याला अक्ष म्हणण्यात व कुत्र्यास श्वान म्हणण्याने त्या गोष्टी बदलत नाहीत पण तद्दन कृत्रिमता जाणवते. त्याउलट दिनांक हा शब्द संस्कृत साहित्यात कोठे नाही पण तो १००% संस्कृत आहे व आज मराठीत सर्वमान्य झाला आहे कारण तो वापरायला, उच्चारास सुटसुटीत आहे. कॉम्पुटर चा संगणक सहजपणे होतो कारण उच्चार सोपा. पण पेन ला लेखणी, झरणी म्हणताना सहजता जाणवत नाही. जे सोपे ते टिकते.
  • एकदा एक शब्द ठरवला की त्यावर ठाम राहा. गेल्या वर्षी हृदयाचे कप्पे कर्णिका व जवनिका होते व पुढील वर्षी अलिंद व निलय होतात म्हणजे मुले संभ्रमात पडणार नाहीत का? आज भ्रमणध्वनी म्हणायचे व उद्या कोशिकाध्वनी 
  • तज्ज्ञांना सांगून पारिभाषिक शब्दांसाठी सूची आहेत त्यांची पुनरावृत्ती काढा. एक मुख्य शब्द व एक पर्याय एवढेच ठेवा. व या वर्षीच्या अमुक तारखेपासून तुम्ही हेच शब्द इंग्रजी शब्दांना प्रतिशब्द म्हणून वापर म्हणून प्रसारमाध्यमांना एकच शासन प्रमाणित मराठी प्रतिशब्द वापरण्याची विनंती करा.

लेखक काय करू शकतात?

जोपर्यंत पर्यायी मराठी वैज्ञानिक शब्द तयार होत नाही व मराठीत वैज्ञानिक विषयांचे शिक्षण हा मुख्य प्रवाह बनत नाही तोपर्यंत विज्ञान लेखकांनी प्रयत्न सोडू नयेत.  आपला वाचकवर्ग हा सर्वसाधारण दहावी उत्तीर्ण आहे (PhD नाही) पण वैचारिक दृष्ट्या समृद्ध (निर्बुद्ध नाही) आहे असे मानावे व त्याप्रमाणे लेखन करावे. पण काहीही करून शास्त्रीय लिखाण मराठीतून आणावे. मराठी भलेही आजमितीस प्राथमिक ज्ञानभाषा नसो पण इंग्लिश जार्गन तसेच ठेऊन मुद्द्यांचा विस्तार मराठीत खचितच होऊ शकतो. ही संपूर्ण-मराठीकरणाशी  प्रतारणा आहे, हे ठाऊक आहे, पण निदान कुठे तरी सुरुवात होईल. तेही नसे थोडके. 

जे लेखक विज्ञानरंजन (sci-fi) हाताळू इच्छितात त्यांनी  पारिभाषिक शब्द नव्याने न पाडता, सरकारी परिभाषा कोष वापरावा किंवा इंग्रजी शब्द जसे च्या तसे वापरून कथानकाचा विस्तार करण्यात भाषाप्रभुत्व दाखवावे. त्यांनी  You Tubers कडून शिकण्यासारखे खूप आहे मी स्वतः WordPress काय असते व कसे वापरतात हे  YouTube पाहून शिकलो. कधी कधी इंग्रजीपेक्षा  तेलुगू भाषेतून व हिंदीतून चांगले व्हिडियो मिळाले. जे चांगले मिळाले ते शिकलो. दहा वर्षांपूर्वी जेव्हा हे केले तेव्हा फारच थोडे मराठी YouTube channels होते, पण आता सुदैवाने मराठीत देखील असे व्हिडीयो तयार होत आहेत. ते शक्य झाले कारण jargon इंग्रजीच होती पण वापरायचे कसे हे स्थानिक भाषेत होते. अगदी सर्जरी विषय शिकवताना देखील आमची jargon इंग्रजी असते पण कृतीदर्शन व वर्णन काही वेळेस एतद्देशीय भाषांतून होते. हा नमुना साहित्यलेखनात देखील अजमावून पाहण्यास हरकत नसावी. आधी प्रसिद्ध व्हा व नंतर हळू हळू भाषाशुद्धी करा. भाषाशुद्धी पेक्षा कथानकाचा गाभा जास्त महत्त्वाचा आहे तो वाचकाला भावतो.

इंग्रजी लेखकांकडून घेण्याचा धडा: इंग्रजी लेखक बोलीभाषा व प्रमाणभाषा यांचे वर्गीकरण छान करतात. पात्रांचे संवाद लिहिताना ते बोलीभाषेतून असतात, समाज माध्यमांवर बोली भाषेतून म्हणणे मांडतात पण इतर भाग लिहिताना ते प्रमाणभाषेचे नियम काटेकोरपणे पाळतात. तसे मराठीत करण्यास हरकत नसावी.

सध्या व भविष्यात मराठी विज्ञान अनुक्रमिक पुस्तके कमी तयार होतील, पण वैज्ञानिक काल्पनिक साहित्य आणखी विकसित व प्रसिद्ध होण्यास खूप वाव आहे. जयंत नारळीकर यांच्यासारखे ज्येष्ठ शास्त्रज्ञ हा प्रयोग करतात, तर आपण का करू नये? म्हणून माझी STEM ( गणित, विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान) व वैद्यकीय क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या सर्व मराठी बांधवाना ही विनंती आहे की

  • रोज मराठीतून एक तरी स्फुट समाजमाध्यमात लिहा.
  • आपल्या तांत्रिक विषयात देखील मराठीचा वापर कसा करता येईल याच्यावर नक्की व्यक्त व्हा.

एकटा माणूस काय किंवा समाज काय भाषा बदल थांबवू शकत नाही. पन्नास वर्षानंतर मराठी नक्कीच वेगळी असेल पण जेव्हा आपल्या मातृभाषेची हेळसांड होतीये असे दिसतंय तेव्हा गप्प राहण्यापेक्षा व्यक्त झालेले कधीही चांगले.

दहा वर्षांनी हा लेख वाचताना मराठीची विज्ञानभाषा म्हणून प्रतिष्ठा वाढलेली पाहण्यास मिळेल हीच भाबडी पण प्रामाणिक आशा. इत्यलम् !

डॉ. सुधन्वा रा. पाठक
मिरज 
३ डिसेंबर २०२१  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*